02 March 2021

News Flash

हितशत्रू : नेहमी माझंच चुकतं?

मित्रांनो, या सदराची सुरुवात मी माझ्या स्वत:च्या हितशत्रूपासून केली होती आणि आजही मी माझा अजून एक हितशत्रू सांगणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मेघना जोशी

मित्रांनो, या सदराची सुरुवात मी माझ्या स्वत:च्या हितशत्रूपासून केली होती आणि आजही मी माझा अजून एक हितशत्रू सांगणार आहे. मी तुमच्यासारखी छोटी होते ना, तेव्हा मला कोणी काही समजावून सांगायला गेलं की मी हात-पाय आपटत म्हणायचे, ‘‘सांगा, तुम्ही सगळे मलाच सांगा. मला माहीत आहे नेहमी माझंच चुकतं.’’ बरं, समजावणं पुढे चालू असेल तर मी लगेचच माझं मुख्य अस्त्र काढायचे, ते म्हणजे भोकाड पसरायचं. नंतर जसजशी मी मोठी होऊ लागले, तसतशी विचार हाच करायचे म्हणजे ‘नेहमी माझंच चुकतं?’ फक्त माझ्या प्रतिक्रिया बदलल्या म्हणजे चिडणं, वैतागणं, हातातली वस्तू आपटणं, मुसमुसणं, कुरकुरणं वगरे वगरे. थांबा, थांबा, हसू नका. तुम्हीही असंच करता म्हणून तुम्हाला गालातल्या गालात हसू येतंय हे माहीत आहे मला. कारण माझ्यासारखा अनेक जणांचा हा हितशत्रू आहे. कोण माझ्याप्रमाणे तो बोलून किंवा हावभावातून व्यक्त करतो, तर काहीजण त्याचा विचार करत स्वत:चं मन पोखरत राहतात. पण मित्रांनो, हा विचार तुम्ही व्यक्त करा किंवा मनातल्या मनात करा. हा विचारच तुमचा मोठ्ठा हितशत्रू आहे. मी जेव्हा बरीच मोठी झाले, म्हणजे आई वगरे झाले त्यावेळी मला समजलं बरं का ते! आपण ‘नेहमी’ हा शब्द विनाकारण वापरतो. कारण नेहमी आपण चुकतो असं कोणीही म्हणतच नाही. आपण अधेमधे चुकतो हे पहिलं आणि फक्त ‘मी’च चुकत नाही, मी चुकतो तसे इतरही चुकतात आणि इतर चुकतात तसा मीही चुकतो. मग काय करायचं, जेव्हा उद्विग्नतेने तुमच्या मनात ‘नेहमी माझंच चुकतं?’ हा हितशत्रू डोकावेल त्यावेळी त्याला म्हणायचं ‘अधेमधे मीही काही काही गोष्टी चुकतोच. आज मी जे काही चुकलोय, ते मला मान्य आहे, ती चूक मी जमल्यास दुरुस्त करेन वा पुन्हा करणार नाही.’ हळूहळू याचा फायदा नक्कीच होतो आणि उद्वेगाला आवर बसतो.

बरं का मित्रांनो, आपलं काय चुकतं तर आपले विचार चुकतात तेच आपले हितशत्रू! गेले वर्षभर आपण यामधले काही विचार पाहिले जे आपले हितशत्रू असतात. आणि बरं का, आपण हे हितशत्रू कधीच दडपून टाकायचे नाहीत. हा प्रत्येक हितशत्रू कधी ना कधी तुमच्या मनात डोकावणारच, त्याला फक्त मित्राच्या रूपात बदलायचा म्हणजे त्या जागी योग्य तो विचार आणायचा. तो कोणता, तो त्या त्या हितशत्रूबाबतच्या विवेचनात दिलेला आहे. पहिल्यांदा थोडे दिवस ही कसरत वाटेल, पण जेव्हा तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसू लागतील तेव्हा ती कसरत न वाटता खेळ वाटेल. चला तर मग, आपला हितशत्रू मित्राच्या रूपात बदलण्याच्या कसरतीला सुरुवात झालीच आहे. आता हा खेळ थांबवू नका. खूप खूप शुभेच्छा!

joshimeghana231@yahoo.in (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:15 am

Web Title: article about always my mistake
Next Stories
1 सर्फिग : मेमरी बँडा
2 नवा मित्र
3 हितशत्रू : काही अर्थ नाही!
Just Now!
X