श्रीपाद

मला सांगा, आपल्यासारख्या छोटय़ा किंवा स्वयंपाकघरामध्ये नुकताच काही अनुभव घेतलेल्या बाल-बल्लवांकरिता आणि बाल-सुगरणींकरिता एक छान, सुरक्षित आणि सुटसुटीत उपकरण कोणतं? माझ्या मताने तरी- प्रेशर कुकर. वापरायला सोप्पा. एकदा तंत्र जमलं की अगदी हुकमी छान पदार्थ जमवून देणारा. शिवाय नीट वापरला तर निर्धोक असा हा स्वयंपाकघरामधला आपला साथी आहे. आज याच आपल्या मित्राच्या मदतीने एक छान, आपल्या सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आपण करणार आहोत- दुधी हलवा!

साहित्य : मोठा दुधी भोपळा (किंवा एक किलो लाल गाजरं किंवा दीड किलो लाल भोपळा). एका किलोला एक मोठी वाटी किंवा २००-२५० ग्रॅम काजूची पूड आणि एक ते सव्वा वाटी साखर. पाव ते अर्धा लिटर दूध. तुम्हाला आवडेल तो सुका मेवा. जसं- बेदाणे, बदामाचे काप, लाल भोपळ्याच्या वाळवून सोललेल्या बिया. दोन-चार मोठे चमचे तूप. एक चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड. दोन चिमूट केशर. एक-दोन चिमूट मीठ.

उपकरणं : दुधी भोपळा किंवा लाल भोपळा सोलण्याकरिता सालकाढणं. त्याचे तुकडे करण्याकरिता आणि बियांचा भाग वेगळा करण्याकरिता विळी किंवा सुरी-पाट, किसणी आणि आपला दोस्त प्रेशर कुकर. आचेकरिता गॅस किंवा इंडक्शन शेगडी. वेलची पूड आणि काजूची पूड करण्याकरिता खलबत्ता किंवा मिक्सर ग्राईंडर. हलवा ढवळण्याकरिता मोठा, लांब दांडय़ाचा झारा किंवा पळी.

सर्वप्रथम घरातल्या मोठय़ा माणसांच्या देखरेखीखालीच स्वयंपाक करायचा आहे हे लक्षात ठेवा. सुरी, सालकाढणं, विस्तव, वाफ भरलेला प्रेशर कुकर अशा उपकरणांशी काम करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा मदतीला मोठं, अनुभवी माणूस असलेलं बरं. दुधी स्वच्छ धुऊन घ्या. दोन्ही देठाकडच्या चकत्या काढून त्यांची चव पाहा. चव गोड हवी; कडू असेल तर तो दुधी कामाचा नाही. आता दुधीचे साधारण एक-दोन गोल तुकडे करा. मग ते उभे धरून कापा. आता आतला बियांचा भाग कापून काढा. हा भाग सुरीनेच नाही तर थोडय़ा तीक्ष्ण कडा असलेल्या चमच्यानेही आरामात निघतो.

आता इतर तयारीला लागा. काजूची बारीक पूड करून घ्या. चार-आठ हिरव्या वेलच्या सोलून त्यातल्या दाण्यांची पूड करून घ्या. मिक्सरमध्ये पूड करत असाल तर त्यामध्ये थोडी साखर बारीक करून घ्या, जेणेकरून वेलचीची छान पूड होईलच, त्याचा सुगंधही जायचा नाही. जायफळाला किसणीच्या धारदार बाजूने किसून त्याची पूड करा. केशर दुधात भिजवून ठेवा.

आता प्रेशर कुकर हाताशी ठेवा. आता दुधी किसायला घ्या. एकेक दुधीचा मोठा तुकडा किसणीने किसून त्याचा कीस लागलीच कुकरमध्ये  टाकत सगळा दुधी किसून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये इतर सगळं साहित्य घाला. तूप, दूध, काजूची पूड, साखर.. सगळं. डावाने चांगलं हलवा. चव पाहून त्याप्रमाणे साखर वेलची पूड वगरे अधिक घालावं वाटलं तर घाला. या मिश्रणामध्ये दूध एवढं हवं की मिश्रण चिंब ओलं व्हावं, मात्र खिरीसारखं दूध दिसायला नको. कुकरमध्ये खाली दूध असायला हवं, वाटलं तर अधिक दूध घाला.

आता मध्यम आचेवर प्रेशर कुकर ठेवा. वाफ भरली की आच मंद करा आणि साधारण आठ-दहा मिनिटं वाफेच्या दाबावर शिजू द्या. हलव्याचा गोड, खमंग वास घरभर दरवळेल. आता आच बंद करून, प्रेशर कुकरच्या शिट्टीवर एखादा जाड नॅपकीन ठेवून प्रेशर कुकर बाजूला थंड जागी उतरवून ठेवा. गॅसच्या शेगडीवर दुसऱ्या शेगडीवर काही शिजवलेलं नसेल, ती थंड असेल तर तिथे ठेवा. असं केल्याने खालून आच लागून हलवा करपायचा नाही आणि शिट्टीवर नॅपकीन ठेवल्याने कूकर हलवताना त्या झटक्यांनी भरलेल्या वाफेने शिट्टी अचानक वाजून तुम्हाला भाजणार नाही.

कुकर थंड झाला, त्यातला वाफेचा दाब नाहीसा झाला की तो उघडून पाहा. हलवा थोडा पातळ असेल तर कूकर पुन्हा मोठय़ा आचेवर ठेवा. हलव्यातलं दूध आटेतोवर, साधारण १०-१२ मिनिटं, हलवा सतत हलवत शिजवा. तुमच्या आवडीनुसार हलवा घट्ट झाला की आच बंद करून हलवा थंड होऊ द्या किंवा तसाच गरम गरम वाटीमध्ये वाढा. बदामाच्या कापांनी हलवा सजवा आणि गोड गोड हलवा गट्ट करा.

कृती अगदी अश्शीच ठेवून तुम्ही गाजर, लाल भोपळा, बीट यांचाही हलवा करू शकता. मात्र, गाजर हलवा करताना गाजरं लाल घ्या. केशरी गाजरं फार रसरशीत नसल्याने त्यांचा हलवा फारसा चविष्ट होत नाही. किंवा त्याला दूध अधिक घालावं लागतं, ज्यामध्ये गाजरं शिजतात आणि मग फार वेळ हलवत हलवत ते दूध आटवावं लागतं. बिटाचा हलवा करताना बीट मोठं किसून घ्या. बिटाच्या हलव्यामध्ये अर्थातच केशर घालायची आवश्यकता नाही. शिवाय, साखरही किंचितशी कमीच लागते. नवरात्रीच्या पर्वामध्ये लाल भोपळ्याचा हलवा केलात तर एक छान गोडाचा आणि तरी उपवासाला चालणारा मिठाईचा पदार्थ तुम्ही केलात याचं कोण कौतुक होईल.

या पाककृतीमधली ग्यानबाची मेख म्हणजे, साधारणपणे हलव्यामध्ये खवा किंवा मावा वापरतात. बाजारात सणासुदीला किंवा इतरवेळी मिळणारा मावा बरेचदा नकली आहे, त्यामध्ये भेसळ आहे, त्यामुळे विषबाधा झाली अशा बातम्या आपण वाचतो. घरी झटपट हलवा बनवताना अनेक पाककृतींमध्ये बाजारात तयार मिळणारं कण्डेस्ड मिल्क अर्थातच आटवलेलं साखरेचं दूध वापरतात. सगळीकडे ते सर्रास मिळेलच असं नाही. शिवाय, या पद्धतीमध्ये गोडावर फार नियंत्रण ठेवता येत नाही. गोड कमी हवं म्हणून कण्डेस्ड मिल्क कमी वापरावं तर दुधाची स्निग्ध चव मिळत नाही, ती मिळावी म्हणून कण्डेस्ड मिल्क जास्त घालावं तर हलवा गोडमिट्ट होतो. त्याकरिता मी काजू पूड आणि दुधाची शक्कल शोधून काढली. सणासुदीला घरामध्ये काजू असतातच आणि ते बाजारात सहजपणे उपलब्धही होतात. काजू तुकडा घेतला तर तो अख्ख्या काजूपेक्षा स्वस्तही मिळतो. हा हलवा पौष्टिक देखील होतो. तेव्हा आता लवकरात लवकर हा कुकर हलवा करून पाहाच आणि सणासुदीला तोंड गोड करा.

contact@ascharya.co.in