21 October 2019

News Flash

विज्ञानवेध : कचरा इथेही!

गेली साठ-सत्तर र्वष वेगवेगळे देश अवकाशात यानं, कृत्रिम उपग्रह, प्रोब्स सोडत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मेघश्री दळवी

कचऱ्याच्या समस्येने अख्खं जग हैराण आहे हे तर तुम्हाला माहीत आहे. आणि आता हे लोण पृथ्वीच्या बाहेर पसरत चाललं आहे. हो, अवकाशातदेखील!

गेली साठ-सत्तर र्वष वेगवेगळे देश अवकाशात यानं, कृत्रिम उपग्रह, प्रोब्स सोडत आहेत. त्यांचं काम संपलं की या वस्तू अवकाशात फिरत राहतात. काही पृथ्वीभोवती, तर काही भरकटत कुठेही चाललेल्या!

कॅसिनीसारखी इतर ग्रहांच्या दिशेने पाठवलेली यानं बऱ्याचदा त्या त्या ग्रहांवरच नष्ट केली जातात. काही जुने कृत्रिम उपग्रह योग्य प्रकारे समुद्रात उतरवून घेतले जातात. पण यानांचे काही भाग, बिघडलेल्या उपकरणांचे घटक, एखादा निखळलेला तुकडा हे सगळं अवकाशातच वेगाने फिरत राहतं. मग नवी यानं, नवे उपग्रह यांच्यावर हा कचरा कधीही धडकू शकतो. त्यात अंतराळवीर असतील तर आणखीनच कठीण. ग्रॅविटी या चित्रपटात असाच प्रसंग दाखवलेला आहे. अलीकडे नवी यानं सोडताना अवकाशातल्या कचऱ्याचा विचार करून त्यांची कक्षा आखावी लागते आहे.

यातला एखादा मोठासा तुकडा कक्षेतून निसटून थेट पृथ्वीवर आदळू  शकतो. त्याने जगात काय हाहा:कार माजेल याची कल्पनादेखील नकोशी वाटते! चीनची अवकाश प्रयोगशाळा टियानगोंग-एक ही एप्रिल २०१८ मध्ये पृथ्वीवर कोसळण्याचा धोका होता हे तुम्हाला आठवत असेल. ती शेवटी पॅसिफिक महासागरात पडली म्हणून ते संकट त्यावेळी टळलं. पण दर वेळी इतक्या सहज सुटका होणे शक्य नाही.

यावर उपाय एकच म्हणजे हा सगळा कचरा वेचून परत पृथ्वीवर आणणे. त्यातून अनेक मौल्यवान धातू मिळवता येतील. काही भाग पुन्हा वापरता येतील. जून २०१८ मध्ये पहिल्यांदाच रिमूव्हडेब्री नावाचं एक खास यान यासाठी सोडण्यात आलं आहे.

एका अंदाजानुसार असे एकूण सतरा कोटी लहान-मोठे तुकडे पृथ्वीभोवती भ्रमण करत आहेत. जवळजवळ आठ हजार टन वजनाचे! नकोशा झालेल्या या वस्तूंचं प्रमाण असं वाढत चाललं, तर उद्या पृथ्वीभोवती या सगळ्यांची कडी दिसायला लागतील- शनीसारखी!

meghashri@gmail.com

First Published on December 9, 2018 12:02 am

Web Title: article about garbage in space