मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कधी स्वयंपाकघरात लुडबुड केली आहे? आई किंवा पोळ्या करणाऱ्या मावशी पोळ्या करायला लागल्यावर एक कणकेचा गोळा घेऊन त्याचा पोळी करण्यापासून क्लेपर्यंत कशाहीसाठी वापर केला आहे? आईने स्वयंपाकात मदत नको म्हटलं तर स्वयंपाकघरात तिच्या भोवती भोवती घुटमळला आहात? बाबाने स्वयंपाकघराचा ताबा घेतल्यावर ‘तुला काही माहीत नाही, आई इथे ठेवते,’ म्हणत मदत केली आहे?

नक्कीच केली असणार!

आई आणि बाबा कुणीही स्वयंपाकघरात काही करीत असेल तर तुम्हालाही त्यांना मदत करावीशी वाटते. बरोबर ना! आणि मदत केलीच पाहिजे. स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला तर आईवर त्याचा ताण येत नाही. आणि स्वयंपाकघरात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकता येतात. वेळेचं, वस्तूंचं नियोजन कसं करायचं इथपासून स्वच्छता आणि आपण जे अन्न खातो त्याविषयी आदर, ते अन्न निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी आदर आपोआपच तयार होतो. त्यामुळे मुलगा असो नाही तर मुलगी, तुम्ही प्रत्येकाने स्वयंपाक शिकलाच पाहिजे.

आता म्हणाल, या सगळ्याचा सर्फिंगशी संबंध काय?

तर सांगते!

तुम्हाला आई-बाबा स्वयंपाकघरात लुडबुड करू देत नाहीत या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारून मुलांना निरनिराळ्या रेसिपीज् शिकवण्याचा विडा एका दहा वर्षांच्या मुलाने उचलला आहे. त्याचं नाव आहे जुलिअन फ्रेडरिक. तर जुलिअन तीन वर्षांचा होता तेव्हा वाढदिवसाचा केक मीच बनवणार असा हट्ट त्याने आईकडे धरला. आईनेही त्याला परवानगी दिली आणि तीन वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा कुकिंग केलं. तीन वर्षांच्या चिमुकल्या जुलिअनला त्यात मज्जा आली. मग तो सातत्याने काही ना नाही बनवायला लागला. त्याच्या आईच्या लक्षात आलं. जुलिअनला स्वयंपाकाची नुसती आवड नाहीये, त्यात त्याला विलक्षण गती आहे. मग आईनेही त्याला अडवलं नाही. लुडबुड का करतोस म्हणत टोकलं नाही. आणि बघता बघता जुलिअनने स्वत:ची वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटचं वैशिष्टय़ म्हणजे यात दहा वर्षांचा जुलिअनच मुलांना निरनिराळे पदार्थ शिकवतो.

एका मुलाने मुलांसाठी चालवलेली साइट!

आहे की नाही भन्नाट प्रकार!

जुलिअनच्या या साइटवर रेसिपीज् आहेत, निरनिराळ्या भांडय़ांची माहिती आहे, ती कशी वापरली पाहिजेत याविषयी तपशील आहेत. सुरीचा वापर न करता कोणते पदार्थ बनवता येऊ शकतात याची माहिती आहे. ब्रेकफास्टपासून डिनपर्यंत आणि स्नॅक्सपासून डेझर्टपर्यंत विविध प्रकारच्या रेसिपीज् आहेत. तुम्हाला हवं असेल तर ऑनलाइन क्लासेस आहेत. कोस्रेस आहेत. त्याचा स्वत:चा ब्लॉग आहे. त्यात तुम्हाला स्वयंपाकाच्या एकदम सोप्या सोप्या टिप्स आणि युक्त्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पदार्थाच्या डिटेल रेसिपी तर आहेतच, पण प्रत्येक स्टेपचे फोटोही त्याने टाकलेले आहेत; जेणेकरून तुम्हा मुलांना त्या रेसिपीज् बघून पदार्थ बनवणं सोप्पं जाईल.

जुलिअन त्याच्या एका मुलाखतीत म्हणतो, ‘‘मी पहिल्यांदा केक बनवला तेव्हाच मला माहीत होतं की मला कुकिंग करायचं आहे. आई-बाबा आम्हा मुलांना स्वयंपाकघरात शिरू देत नाहीत, हे मला बदलायचं आहे. मला जगभरातल्या पालकांना हे दाखवून द्यायचं आहे की, आम्ही मुलं स्वयंपाकघरात आत्मविश्वासाने वावरू शकतो. स्वयंपाकामुळे आमचा आत्मविश्वास वाढतोच, पण आम्ही स्वावलंबीही बनतो. शिवाय स्वयंपाक आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य देतो.’’

किती महत्त्वाचं सांगतोय जुलिअन! एखादा पदार्थ बनवताना आपण कोणकोणते घटक वापरणार आहोत, काय वापरलं की काय होऊ शकतं.. अशा प्रत्येक निर्णयांतून आपण निवड कशी केली पाहिजे हे शिकत असतो. एखादा पदार्थ करताना वेळेचं गणित पक्कं असावं लागतं, नाही तर पदार्थ चांगला होत नाही. म्हणजेच आपण आपोआप वेळेचं नियोजन करायला शिकतो. आहे की नाही गंमत!

स्वयंपाक ही कुणा एकाने करण्याची गोष्ट नाही, तर तो प्रत्येकाला आलाच पाहिजे आणि प्रत्येकाने करण्याचा आनंदही घेतलाच पाहिजे. शिवाय मदतीला जुलिअनच्या वेबसाइटचा पत्ता देतेच आहे. त्यावर जाऊनही तुम्ही नवीन पदार्थ शिकू शकता. शिवाय यूटय़ूबवरही पुष्कळ चॅनल्स आहेत, ज्यावर मुलांना सुरी, गॅस न वापरता पदार्थ कसे बनवता येतील याचे व्हिडीओज् आहेत, ते तुम्ही बघू शकता. मग आता आई आणि बाबाला सांगा, आणि त्यांची मदत घेऊन तुम्हाला आवडतात ते पदार्थ करून बघा! स्वयंपाकातली गंमत अनुभवा!

जुलिअन फ्रेडरिकच्या वेबसाइटसाठी http://www.stepstoolchef.com या लिंकचा वापर करा.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about junior chef julian frederick cooking
First published on: 23-09-2018 at 01:04 IST