घुबडांच्या डोळ्यांची घडण अशी असते की त्यांना डोळ्यांची बुबुळे गोलाकार किंवा आजूबाजूला फिरवता येत नाहीत. म्हणूनच त्यांना आजूबाजूला असलेली एखादी गोष्ट पाहण्यासाठी संपूर्ण मान वा डोके त्या दिशेने फिरवावे लागते. जवळपास २७० अंशापर्यंत त्यांना डोके वळवता येते. माणसाच्या मान फिरवण्याच्या क्षमतेच्या जवळजवळ दुप्पट अधिक ही क्षमता आहे. मानवी शरीरापेक्षा त्यांच्यात अधिक लवचीकता दिसून येते, कारण त्यांचे डोके फक्त एकाच खोबणीवजा साच्यात बसवलेले असते. तसेच हालचालींसाठी पूरक अशी त्यांच्या मणक्याची रचना असते. वेगाने मागे-पुढे वळण्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दुखापतीचा सामना करण्याची नैसर्गिक, शारीरिक क्षमताही त्यांच्यात निसर्गत:च असते.