26 March 2019

News Flash

विज्ञानवेध : पोहणारी मधमाशी

या मधमाशीत चिमुकले चिमुकले नॅनो घटक आहेत.

तुम्ही कधी मधमाशीला पाण्यात पोहताना पाहिलंय? कधी तिला झपकन् पाण्यात सूर मारताना पाहिलंय?

नाही ना? मग तुम्हाला सांगितलं, की आहे अशी एक मधमाशी तर विश्वास बसेल तुमचा? गंमत म्हणजे अशी मधमाशी खरोखरीच आहे. ती उडते, मग उडता उडता थेट पाण्यात झेप  घेते, मजेत पोहते आणि मग आपोआप बाहेर येऊन पुन्हा हवेत भरारी घेते. मात्र, ही मधमाशी खरी नाही, तर यांत्रिक आहे. तिचं नाव- हायब्रिड रोबोबी.

या मधमाशीत चिमुकले चिमुकले नॅनो घटक आहेत. तिला इवलाले कृत्रिम स्नायू आहेत. ऊर्जा मिळवण्यासाठी छोटुशी गॅस चेंबरची रचना आहे. तरंगण्यासाठी इटुकले फ्लोट्स आहेत. आणि तिचं वजन फक्त १७५ मिलिग्रॅम इतकं ंआहे, फुलाच्या एका पाकळीपेक्षाही कमी!

नेहमी आपण यंत्रांमध्ये स्क्रू, नट्स, बोल्ट्स बघतो. पण रोबोबी बनवताना असं काहीही वापरलेलं नाही. मग कसं बरं तिला घडवलं असेल? तर शास्त्रज्ञांनी तिथे चक्क ओरिगामीसारख्या तंत्राचा वापर केला आहे. हो. ओरिगामीत आपण कागदाला वेगवेगळ्या प्रकारच्या घडय़ा घालतो. तसे इथे धातूचे अगदी पातळ पत्रे घेऊन त्यांना घडय़ा घालून ही अजब रोबोबी तयार झालीय.

हार्वर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी बारा र्वष काम करून ही अद्भुत मधमाशी बनवली आहे. तिला उडण्यासाठी, पोहण्यासाठी जी रचना केली आहे, त्यामागे अनेक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आहे. ती नाजूक दिसत असली तरी मजबूत आहे. पर्यावरणाचं निरीक्षण करण्यासाठी तिचा वापर होणार आहे. शिवाय पाण्याखालच्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करताना तिचा उपयोग होईल.

meghashri@gmail.com

First Published on March 4, 2018 12:32 am

Web Title: article on bee