20 September 2018

News Flash

लिंबूटिंबू चटकदार : फंडू फालुदा

सर्वप्रथम आंब्याचं किंवा मागल्या लेखात सांगितल्याप्रमाणे केळ्याचं आईस्क्रीम तयार करूनच ठेवा.

आमच्याकडे दोन दिवसांपूर्वी पाऊस पडून गेला. तुमच्याकडे पडला का? पावसामुळे थोडा, अगदी किंचितसा उन्हाळा कमी झाला असेलही, पण या उन्हाच्या झळांनी आणि उकाडय़ाने जीव हैराण होतो हे खरंच. अशा वेळी काय हवं सांगा? काहीतरी गारेगार हवंसं वाटतं की नाही? मागल्यावेळी आपण सोप्पं आईस्क्रीम शिकलो, आज त्यापासूनच नवा पदार्थ करायला शिकू. मुंबईकडे फालुदा, तिकडे पुण्याला मस्तानी अशा नावांनी ओळखला जाणारा हा भन्नाट, गारेगार पदार्थ आज आपण शिकणार आहोत. या पदार्थाची एक गंमत आहे. भारतात प्रामुख्याने मुसलमानी राजवटीमुळे आलेला हा मूळ पíशयन पदार्थ त्यातल्या जवळजवळ आपल्याकडच्या जिन्नसांमुळे इतका आपल्यात सामावून गेला आहे की आज त्याच्या मूळ पíशयन उगमाविषयी कुणाला खरंदेखील वाटायचं नाही.

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 25000 MRP ₹ 26000 -4%
  • Panasonic Eluga A3 Pro 32 GB (Grey)
    ₹ 9799 MRP ₹ 12990 -25%
    ₹490 Cashback

सर्वप्रथम आंब्याचं किंवा मागल्या लेखात सांगितल्याप्रमाणे केळ्याचं आईस्क्रीम तयार करूनच ठेवा. साधारण चार गोळे तयार होतील इतकं छोटय़ा प्रमाणात केलंत तरी चालेल. मग खाली दिलेल्या साहित्याप्रमाणे तयारी करा.

चार जणांकरिता साहित्य : खीर करण्याकरिता दूध ४ वाटय़ा, एक वाटी भाजलेल्या बारीक शेवया, पाव ते अर्धी वाटी साखर आणि जायफळ पूड एक चिमूट. प्रत्येक व्यक्तीकरिता एक मोठा चमचा सब्जाच्या बीया आणि त्यांना भिजवण्याकरिता साधारण एक वाटीभर पाणी, अर्धी वाटी रोझ सिरप, आंब्याचा रस एक-दीड वाटी आणि प्रत्येकी एक चॉकलेट बिस्कीट सजावटीकरिता.

उपकरणं : खिरीकरिता गॅस किंवा इतर कुठली शेगडी, एक मोठंसं जाड बुडाचं पातेलं किंवा नॉनस्टिक भांडं आणि डाव. फालुदा बनवण्याच्या साहित्याकरिता सब्जा भिजवण्याकरिता एक वाटी, आंब्याचा रस काढण्याकरिता एक छोटं पातेलं आणि सर्व जिनसा थंड करण्याकरिता फ्रीज.

सर्वप्रथम खीर करण्याची पद्धत सांगतो. मात्र नेहमीप्रमाणेच खीर बनवण्याकरिता मोठय़ांची मदत घ्या, नाही तर फालुदा राहायचा बाजूला आणि तुमची फजिती व्हायची. सर्वप्रथम मोठय़ा जाड बुडाच्या भांडय़ामध्ये एक-दीड चमचा साजूक तूपावर शेवया साधारण अर्धा मिनीट मध्यम आचेवर भाजून घ्या. बाजारातून पूर्ण भाजलेल्याच शेवया आणल्या असतील तर मंद आचेवर फक्त तुपाचा स्वाद लागेतोवर त्या मिसळून घ्या. सतत परतत राहणं महत्त्वाचं बरं का, नाही तर शेवया चटकन् करपून जातील. शेवया भाजून झाल्या म्हणजे त्यामध्ये दूध ओतून सतत ढवळत राहा. दूध आणि शेवया खाली भांडय़ाला लागता नयेत. आच मंद किंवा मध्यमच ठेवा. दूध उकळलं आणि किंचितसं आटून खमंग सुवास दरवळला म्हणजे त्यात एक चिमूट जायफळाची पूड घालून आच बंद करून आणखी सात-दहा मिनिटं ढवळत राहा. दूध पटकन् थंड व्हायला मदत होते. खीर झाली. आता ती झाकून ठेवून द्या. तुम्ही म्हणाल, साखर विसरली की? अजिबात नाही दोस्तहो. आता इतर कामं करा. सब्जा किंवा ज्याला तुमच्याकडे तुळशीचं बी म्हणून ओळखत असतील, ते थोडय़ा पाण्यामध्ये भिजत घाला. एखाद् दोन आंब्यांचा रस काढून तो चांगला हातानेच कालवून गीर्र करून घ्या, त्यात गठ्ठे राहायला नकोत. मग हे सारं फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्या. आता खीर कोमट झाली असेल, आता त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत हलवा. यामुळे खिरीतलं दूध फाटणार नाही, शिवाय खीर पटकन् थंड व्हायला मदत होईल. आता खीरदेखील फ्रीजमध्ये ठेवून द्या.

ही सगळी तयारी आदल्या रात्री केलीत तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार-पाच सुमारास घरच्यांच्या चहावेळी किंवा रात्रीच्या जेवणावेळी तुम्हाला छान फालुदा करता येईल. शक्यतो काचेच्या, नाही तर सरळ स्टीलच्या पेल्यांमध्ये किंवा ग्लासमध्ये फालुदा करायला घ्या. जेवढय़ा माणसांकरिता करायचे तेवढे पेले एका रांगेत मांडून ठेवा आणि पंगतीला ताटं वाढतो त्याप्रणाणेच ते भरायला घ्या. सर्वप्रथम खाली मोठा चमचाभर रोझ सिरप घाला, त्यावर थोडी शेवयांची खीर, त्यावर पाण्यातून काढून ठेवलेला सब्जा, मग पुन्हा खीर, आंब्याचा रस, मग खीर, पुन्हा थोडं रोझ सिरप आणि वर खासम् खास आईस्क्रीमचा घनगोल गट्ट सोडा. त्यावर चॉकलेट असलेल्या बिस्किटाचे हातानेच तुकडे करून घाला आणि थंडगार, गारेगार सर्वाना प्यायला द्या.

मित्रांनो, या सगळ्या पाककृतीत तुम्हाला लक्षात आलं असेलच की रोझ सिरप, घट्टशी शेवयांची खीर आणि सब्जाच्या भिजवलेल्या बिया घरी फ्रीजमध्ये तयार ठेवल्या की अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही बेसिक फालुदा तयार करू शकता. मग त्यावर आईस्क्रीम कोणतं घालायचं हे तुम्ही ठरवा! रोझ सिरपसोबत चॉकोलेट सिरपदेखील वापरू शकता. मला मध आवडतो. कधी सांगली-कोल्हापूर-सोलापूरकडे मिळणारी काकवी वापरतो. फळांमध्येही वैविध्य आहेच. हापूस आंब्याचा रस, पायरीचा थोडा पातळ, पण गोड रस, सीताफळाचा गर, चिकूच्या बारीक फोडी असं वैविध्यही आणता येतं. मूळ फालुद्यामध्ये सुका मेवा- काजू, अक्रोड, बदामाचे काप, बेदाणे, चारोळ्या घालतात. मला शेवयांच्या खिरीऐवजी गाजर किंवा दुधीहलवा, दूध किंवा सायीमध्ये कालवून फालुद्यामध्ये घातलेला आवडतो. एका फालुद्यात पोट भरून जातं. तुम्ही असेच छान प्रयोग करून पाहा आणि तुमचा आवडीचा, खास तुमची छाप असलेला रंगीबेरंगी फालुदा करून घरच्यांना खाऊपिऊ घाला. आणि हो, ‘बालमफल’ला त्याचे फोटो किंवा तुमच्या फालुद्याची गोष्ट सांगायला विसरू नका.

वाट पाहतो.

contact@ascharya.co.in

First Published on April 22, 2018 1:01 am

Web Title: article on falooda