15 December 2017

News Flash

फुलांच्या विश्वात ; अग्निशिखा

पावसाळ्यात अग्निशिखाच्या कंदांना मोड येतो व त्यातून पुढे वेल वाढतो.

भरत गोडांबे | Updated: August 13, 2017 1:57 AM

पावसाळ्यात अग्निशिखाच्या कंदांना मोड येतो व त्यातून पुढे वेल वाढतो.

आपल्या रंग आणि रूपाने मानव आणि कीटक दोघांना भुरळ घालणारं सुंदर फूल म्हणजे ‘अग्निशिखा’! भारतातील सदाहरित तसेच वर्षांवनात आढळणारी वर्षांयु भारतातील वेलवर्गीय वनस्पती. पावसाळ्यात अग्निशिखाच्या कंदांना मोड येतो व त्यातून पुढे वेल वाढतो.

Gloriosa Superba (ग्लोरिओसा सुपरबा) हे तिचं शास्त्रीय नाव. तिच्या नावातदेखील तिच्या सौंदर्याबद्दल वर्णन आलंय. साधारण ३ ते १० मीटर लांबी असणाऱ्या या वेलीचे खोड हिरव्या रंगाचे असते. अग्निशिखाच्या फुलांचा रंग हा अग्नीच्या ज्योतीसारखा दिसतो. कळी हिरव्या रंगाची असते. कळी जमिनीकडे तोंड करून असते. उमलायला लागली की तिच्या पाकळ्या पूर्ण उमलून वरच्या दिशेने वळतात; त्याचा रंग खाली पिवळा तर वरच्या बाजूला गडद लाल असतो. एका फुलात ६ पाकळ्या असून ६ पुमंग असतात. त्यांच्या टोकाशी परागकण असलेल्या परागकणांच्या पिशव्या असतात. फुलाला गंध नसतो, परंतु त्याच्या सुंदर भडक रंगामुळे कीटक त्याच्याकडे आकृष्ट होतात. जंगलात किंवा कुठेही अग्निशिखाची फुले उमलली असली तरी ती लक्ष वेधून घेतात. फूल उमलले की ते ४-५  दिवस ताजे राहते. फुलांचा पिवळा-लाल रंग जाऊन नंतर तो पूर्ण लालभडक होतो. याच्या सुंदर फुलांमुळेच या वेलीची शोभेची वनस्पती म्हणून लागवड करतात. फुले आकाराने मोठी असतात. जुलै ते ऑक्टोबर या काळात वेलीला फुले येतात. फुले सुकली की फुलाचा खालचा भाग फळात रूपांतरित होतो.

कॅप्सूल प्रकारातील या फळात साबुदाण्याच्या आकाराच्या लाल रंगाच्या बिया असतात. ‘अग्निशिखा’ हे भारतातील तामिळनाडू या राज्याचे ‘राज्यफूल’ आहे. फुले, पाने, साल, कंद, बिया या प्रत्येकाचा औषधात वापर केला जातो.

अग्निशिखाची पाने पोपटी रंगाची असून त्यांच्या टोकाला लांब स्प्रिंगसारखा एक भाग असतो. ही स्प्रिंग इतर कोणत्याही गोष्टीवर, झाडावर गुंडाळून ही वेल वाढते. Lily moth नावाच्या पतंगाची ही खाद्य वनस्पती आहे.

अग्निशिखाच्या फुलांची महाराष्ट्रातील काही भागात विशेषत: ठाणे जिल्ह्यत ‘गौरी’ म्हणून पूजा केली जाते. कोकणात आणि गोव्यात गणपतीच्या वर जी आरास करतात तिला माटोळी/मंडपी असे म्हणतात. या माटोळीत वेगवेगळ्या प्रकारची फुले, पाने, भाज्या, फळे बांधल्या जातात. त्यात अग्निशिखाच्या फुलांचा अग्रक्रमाने समावेश असतो.

प्रसूतीच्या वेळी महिलेला जर प्रसूतिकळा येत नसतील तर तिच्या पाठीखाली या अग्निशिखाची पाने ठेवली जातात. काही वेळातच त्या महिलेला प्रसूती कळा सुरू होतात. कळा यायला मदत करते म्हणून अग्निशिखाला ‘कळलावी’ असे गमतीदार नाव आहे. अग्निशिखाची संपूर्ण वेल ही विषारी आहे. पण कंद सगळ्यात जास्त विषारी. हिच्या प्रत्येक भागात  कोलचिसाईन (colcticine) नावाचे द्रव्य आढळते. हे द्रव्य अत्यंत विषारी आहे. परंतु या द्रव्याचा वेगवेगळ्या रोगव्याधी निवारण्यात खूप मदत होते. साप, विंचू यांच्या दंशावर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. मूळव्याध, अल्सर, सांधेदुखी, किडणी विकार, त्वचेचे विकार, कुष्ठरोग, कर्करोग, पोटाचे विकार यासारख्या विकारांवर कळलावी गुणकारी आहे. वैद्याच्या किंवा जाणकार  व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय कळलावीच्या कोणत्याही भागाचा औषधात वापर करू नका ही आपणा सर्वाना अत्यंत कळकळीची विनंती.

कळलावीच्या औषधी गुणांमुळे हिला जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे. जंगलातून मोठय़ा प्रमाणात हिची काढणी होते. परंतु नवीन लागवड कोणीही करत नाही, त्यामुळे ही वनस्पती सध्या दुर्मीळ / नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या गटात समाविष्ट करण्यात आली आहे.

कळलावीची लागवड फांदी किंवा बियांपासून करतात. कंद उपलब्ध झाल्यास त्यापासून देखील याची लागवड करता येते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात येथील काही शेतकरी आता व्यापारी तत्त्वावर कळलावीची शेती करीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये हिचे पीक घेता येऊ शकत असल्याने शेतकऱ्यांनी हिचा लागवडीसाठी विचार करण्यास हरकत नाही.

अग्निशिखाच्या सुंदर फुलाचं चित्र असलेलं तिकीट भारतीय पोस्ट खात्याने प्रकाशित केलेलं आहे. अशी ही बहुगुणी, सुंदर अग्निशिखाची वेल शहरात पाहायला मिळणं थोडं कठीणच, परंतु मुंबईकरांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ती पाहता येईल. अग्निशिखाच्या संवर्धनाची अत्यंत गरज असून संशोधन संस्था, महाविद्यालये यांनी पुढाकार घेऊन याबाबत काम करणे गरजेचे आहे. अग्निशिखाच्या औषधी गुणधर्मावर अनेक संशोधने झालेली आहेत. अनेक संस्था आणि वन विभाग या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. जगजागृती करीत आहेत. ही मोठी आशेची गोष्ट आहे.

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

First Published on August 13, 2017 1:50 am

Web Title: article on glory lily
टॅग Glory Lily,Lily