21 March 2019

News Flash

रोजा

दिवसात एक वेळ जेवून आम्ही दिवस ढकलत असतोच.

फारूक एस.काझी

रमजान महिना सुरू झाला आणि मोहल्ल्यात लगबग सुरू झाली. सेहरी, रोजे, तरावी, इफ्तारी या सर्व गोष्टींची धूम होती. काही घरांवर रंगीत लाइटच्या

माळा चमकू लागल्या. रेश्मा आणि अम्मीचे रोजे सुरू होते. घरात एक-दोन दिवसांतून एकदा काहीतरी गोडधोड बनत होतं. रेहानाला आपणही रोजा करावा असं वाटू लागलं होतं. रोजे असून शबाना कामाला जायची. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती. रेश्माला माहीत होतं अम्मी एवढी खूश का असते ती.

‘‘दिनभर खानेपिने नै मिल्या तबी सुकून मिलता जान को.’’ अम्मीचा डायलॉग तिला तोंडपाठ होता. घरात जाताना रेश्माला काहीतरी आठवलं.

‘‘आम्मे, कुणी जुने कपडे दिले तर घेऊ  नको. घेतले तर आमी घालणार न्हाय. आम्मे, गरीब हाइं करके क्या हुया? आपने को भी आपनी इज्जत हैच तो.’’

अम्मीला रेश्माच्या या वाक्याने हसू आलं. कुठल्या तरी सिनेमातला डायलॉग मारलाय तिने. पण तिनेही ठरवलेलं.. कुणी दिलेले जुने कपडे नाही घ्यायचे. आपण माजलोय असं कुणी म्हटलं तरी चालेल. पोरींना नवीन कापडं घेऊ  औंदा.

‘‘आम्मे, सहरी को क्या बनानेवाली हाय तू?’’ रेश्माने प्रश्न केला.

‘‘बघू, चपाती आणि दाळकांदा करू.’’ रेश्मा खूश झाली. तिचा आवडता दाळकांदा. मगरीबची नमाज झाली आणि अम्मी दुवा करू लागली.

‘‘या अल्ला, आमाला उपवास नवीन नाहीत. दिवसात एक वेळ जेवून आम्ही दिवस ढकलत असतोच. कधी तर एक वेळचंही मिळत नाही. रोज्यांचा जो काय सवाब (पुण्य) मिळायचा असेल तर तो माझ्या लेकरांना मिळू दे. ये म्हैना सुखात जाऊ  दे.’’ रेश्माने रेहानासाठी दुवा केली. अम्मीसाठी दुवा केली.

‘‘आम्मे, मजे कल उटा. मै बी रोजा करनेवाली.’’ लहानी रेहाना गाल फुगवून बोलली.

‘‘अरे मेरी लाडो, तू अभी छोटी हाय. नै सोसने का तुजे. थोडी बडी हुई तो कर.’’ अम्मीच्या बोलण्याचा रेहानाला रागच आला.

‘‘आम्मे, करंदे उसे रोजा. लहान पोरांचं चुकलं तर अल्ला माफ करतोच की. मई उटाती तुजे. पन किरकिर नै करने की. क्या?’’ रेहानाने मान डोलवली. ती बाहेर पळाली. आता गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणींना ही बातमी पोचवायची होती तिला.

‘‘रेश्मे, तिला नाही झेपायचं. मरनाचं ऊन पडतंय. ऐन उन्हाळ्यात रोजे आल्यात. रोजा तुटय़ा तो गुनाह शिरपर.’’ अम्मी काळजीत बोलली.

‘‘आम्मे, तू नको काळजी करू. तिजे सगळे गुनाह मी माझ्या डोक्यावर घिन. अल्लाला माहिती आहे की ती लहान हाय. तरी तिला रोजा ठेवायचा हाय.’’

पहाटे उठून अम्मी आणि रेश्माने स्वयंपाक आटोपला. रेहानाही उठली होती. सेहरी झाली. दिवस वरवर चढू लागला तसं ऊन वाढू लागलं. रेहाना कासावीस होऊ  लागली. तिला चैन पडेना. तिच्या मैत्रिणींनी रोजे केले नव्हते. त्या काहीबाही खात फिरत होत्या. रेहानाला ते पाहिजे असायचं. रेश्माने घरातली सफाई सुरू केली होती. अम्मी कामाला गेली होती. रोजे असूनही. नाहीतर घर कशावर चालणार होतं? रेश्माही कामाला येते म्हणत होती आता सुटी सुरू होती म्हणून. पण अम्मीने तिला दटावून घरीच ठेवलं होतं. ‘घरातलं काम कर,’ असं सांगून ती गेली होती. दुपार होऊ  लागली आणि रेहाना अजूनच कासावीस झाली.

‘‘रेश्मे, मजे प्यास लगीय. थोडा पानी पिऊ क्या?’’ रेहानाच्या या बोलण्यावर रेश्मा हसली.

‘‘तेरा रोजा? उसका क्या करने का?’’ रेश्माच्या प्रश्नाचं उत्तर रेहानाकडे नव्हतं. ती गडबडली. रेश्माने तिला पाणी दिलं. अजून मोठा दिवस समोर होता. रेहाना दम काढू शकणार नाही हे रेश्माला माहीत होतं. पण रेहानाला रोजा करायचा होता. रेहाना पाणी प्याली. तिला थोडी हुशारी आली. ती झोपी गेली. रेश्माही झोपली. दुपार टळून गेली. अम्मी घरात आली. रेश्मा उठली. रेहाना अजून झोपलेली होती.

‘‘आम्मे, रेहानाला मी पानी दिलं. ती तानेजलेली. तिचा आजचा खातापिता रोजा.’’ अम्मी यावर हसली.

‘‘आम्मे, खरंच अल्ला तिला सजा देईल का? तसं आसल तर मी ती सजा मला मागून घिन. तीनी लहान हाय. तिला काय कळतंय?’’

अम्मी बोलली, ‘‘रेश्मे, अल्ला खूप दया करतो. तो तुलाही सजा नाही देणार. अल्ला म्हणतो, ‘सगळ्यावर प्रेम करा.’ आपलं-परकं कुणीच न्हाय.’’ रेश्मा अम्मीकडे टक लावून पाहत होती. इतक्यात रेहाना उठली. रेश्माने आपले दोन्ही हात अम्मीच्या गालावरून फिरवून आपल्या कानशीलावर कडाकडा बोटं मोडली.

‘‘मेरी गुनाकी आम्मी.’’ रेहानानेही तसंच केलं. अम्मी, रेश्मा खळाळून हसू लागल्या. अम्मीने दोघींना कवटाळलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.

‘‘या अल्ला.. माज्या लेकरांना सदैव खूश ठेव. त्यांचे सगळे गुनाह माझ्या हिश्श्यात येऊ  दे. आन् माझं सारं सुख त्यांना मिळू दे.’’

रेश्मा असंच काहीसं मनातल्या मनात अल्लाकडे मागत होती. ती अजूनच अम्मीला बिलगली. उपाशीपोटी मनात सुख दाटून आलं होतं.

farukskazi82@gmail.com

First Published on June 3, 2018 12:29 am

Web Title: article on roza in loksatta