12 July 2020

News Flash

कार्टूनगाथा : शिनोसुके बच्चन!

जपानमध्ये सर्वच लहान मुलांच्या नावापुढे चॅन लावलं जातं, म्हणून ‘शिनचॅन’!

(संग्रहित छायाचित्र)

श्रीनिवास बाळकृष्णन

योशितो उसाई यांनी लहान मुलांना मध्यवर्ती ठेवून ५६ भागाची विनोदी मालिका (मांगा कॉमिक) रेखाटली. फुटाबाशा प्रकाशनानं १९९० व्या वर्षी जपानी भाषेत ते प्रकाशित केलं. १९९२ ला टीव्हीवरील कार्टून मालिका आणि १९९३ ला सिनेमागृहात फिल्म.. असे विद्युत वेगाने लोकप्रसिद्ध झालेले कार्टून पात्र म्हणजे..

आपल्याला वेड लावणारा आणि आपल्या शिक्षक, पालकांना घाम फोडणारा शिनोसुके.. म्हणजे नोहाराचा थोरला मुलगा- शिन. जपानमध्ये सर्वच लहान मुलांच्या नावापुढे चॅन लावलं जातं, म्हणून ‘शिनचॅन’!

एकूण ८६६ टीव्ही मालिका असणारे हे कार्टून जपानसह भारत, स्पेन, इंडोनेशिया, मलेशियात विशेष प्रसिद्ध आहे. जपानमध्ये याच्या चित्रांची एक ट्रेनच रंगवली आहे. यावरून हे किती प्रसिद्ध आहे हे लक्षात येईल. अनेक भाषांतील कॉमिक पुस्तके, २३ मोठय़ा लांबीच्या फिल्म असा याचा डोलारा होता. आपल्याकडे भारतात हिंदी, तेलगू आणि तामिळ या तीन भाषांत २००६ मध्ये ‘हंगामा’ चॅनेलवर हे प्रसारित झालं आणि अल्पावधीत तरुणांमध्ये लोकप्रिय झालं. शाळा संपवून कॉलेजमध्ये आलेल्यांनी शिनचॅनला खऱ्या अर्थानं डोक्यावर घेतलं. त्याचं टी-शर्ट, की-चेन, बॅग इत्यादीही बाजारात आले. सिनेमातल्या हिरोप्रमाणे त्याचे डायलॉग पाठ करायचे.

..तर हा पाच वर्षीय शिनोसुके आणि त्याचं पाच जणांचं कुटुंब या कथेचा मुख्य भाग आहे. जपान आणि भारताची संस्कृती एकसमान जुनी असल्याने कुटुंबप्रमुख हा पुरुषच असतो, तसा इथेही आहे. नोकरीला असणारा ३५ वर्षीय बाबा हॅरी थोडा शिनचॅनवर गेलाय. म्हणजे त्यालाही देखण्या तरुणी आवडतात. सुटीत आराम करायला आवडतो. टीव्ही पाहत लोळायला आवडतं. मसाज करून घ्यायला आवडतं. हाही रात्री झोपेत चालतो, पण एकटा कमावता असल्याने व नोकरीही सामान्य पगाराची आणि खर्च अधिक असल्याने स्वत:चे अनेक छंद भूतकाळात टाकून वर्तमानाच्या खस्ता खात आहे.

मितसी नोहारा ही त्याची आई कम तक्रारपेटी. आपला महान शिनचॅन पोटात असतानाच काय ते सुखी असावी. त्यानंतर मात्र ती घरकाम, मुले, शॉपिंग, मेकअप यात स्वत:ला अडकवून घेणारी. हिचं माहेर पुणे असल्यानं ही रोज हक्काची दुपारची झोप घेते. हिमावारी ही छोटी बहीण आल्याने शिनचॅनला अकाली थोरलं करते. तिला आईचे मोत्याचे चकाकते दागिने, मेकअप करायला आवडतो.

शिरो हा त्याचा पाळीव कुत्रा! या दोघांची मत्री काय वर्णावी! शिरोला घरी उत्साहात आणलेला खरा आणि नंतर प्रचंड दुर्लक्ष झालेला असा तो बिचारा सारं काही गुमान सहन करतो. कधीही कसलीच तक्रार नाही.

बालवर्गातील विद्यार्थी मित्र, दोन शिक्षिका आणि त्यांचे मुख्याध्यापक आहेत. शिनचॅनचे दोन्ही आजोबा, आजी, घराजवळची काकी, नवीन लग्न झालेलं जोडपं, तरुण चित्रकार शेजारी.. असा एकूण पसारा आहे.

हे कार्टून प्रचंड खपाचं असलं तरी आपल्या मराठी पालकांना ते मुळीच आवडत नाही. यातील एक एपिसोड पाहून मुलांवर कसे वाईट संस्कार होतात आणि त्यासाठी ते चॅनलला तशा नोटिसा वगैरे पाठवतात. हा एपिसोड पाहिल्यास आपण एखाद्या गोष्टीकडे कसे चुकीच्या दृष्टिकोनातून बघतो आणि मुले कसे त्यातून योग्य तेच घेतात हे कळून येतं. असो.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतील तर शिनचॅन हा कोबीचे फूल आहे. कारण याचं डोकं मोठं आहे. हा ओबडधोबड जगतो. हा किती गुणी आहे हे मी सांगायला नकोच. उद्धट, छळणीय, हजरजबाबी, शीर्षतापी, तरुणीप्रिय, उटपटांग, बेफाट, पालकतोंडघशी असे सगुण शिनचॅनमध्ये तुडुंब भरलेले आहेत. वरवर हे गुण दिसत असले तरी, आत थोडे अवगुणही (सध्याच्या परिस्थितीनुसार) आहेत बरं! तो इतर समवयीन मुलांच्या तुलनेत निरागस आहे. तो थेट जगतो, दांभिकता नावालाही शिवली नाही. तो अडचणीत सापडलेल्यांना मदत करतो. खोटेपणा मिरवणाऱ्यांना उघड करतो, यात नशीबही त्यालाच साथ देते. कारण तो सहज आणि खरं जगतो. त्यात तो स्ट्रीट स्मार्ट आहे. परिसराचे, माणसाचे, स्वत:चे प्रचंड कुतूहल आहे. समग्र आणि संतुलित जगतो. त्याच्या इतर मित्रांपेक्षा हे प्रकरण खूपच वेगळं आहे. वर्गमत्रीण नेनी ही टिपिकल हट्टी मुलगी. श्रीमंती आणि हुशारीने पुरेपूर चमको कझामा आणि गरीब घाबरट मसाओ आपापल्या आईवडिलांचे गुण-अवगुण पुढे दर्शवत असतात, पण शिनचॅन मात्र स्वत:चे जगतो.

असं स्वत:चे नियम, स्वत:ची तत्त्वं, स्वत:च्या आवडी बेधडक मांडणारे पात्र आपल्याला आकर्षति करते. जी हिंमत आपल्याला ग्रुपमध्ये असल्यावर येते तितकी धमक या एकटय़ाकडे असते. अमिताभसारखा हा खरा अँग्री यंग बॉय आहे! म्हणून आपण तसे नसलो तरी हा बिनधास्त शिनचॅन आपल्याला भावतो.

खरं तर लहानपणी आपणही तसेच असतो. आपल्यालाही आपल्या गोष्टींचं कुतूहल असतं. तरुण-सुंदर चेहरे आवडतात. व्यक्तिमत्त्व आकर्षति करतात. अनेक चित्र-विचित्र प्रश्न पडतात. अतिशहाण्या मित्रांची जिरवावीशी वाटते. न भिता काहीही करावंसं वाटतं. एकटय़ाने निर्णय घ्यावेसे वाटतात.. पण आपल्यावर मोठय़ांकडून झालेले सो कॉल्ड संस्कार, शिकवण ही न्यूनगंडाने आणि दांभिकतेने बरबटलेले असतात. आणि आपण ते अंगीकारलेले असते. आपला अख्खा वर्ग अशाच भेदरट मुलांनी भरलेला असतो. अख्खी शाळाच अशा मुलांनी भरलेल्या असतात.. त्यात एखादाच शिनचॅन जन्मतो.

म्हणूनच हा पिचलेल्या लहान मुलांना आणि मोठय़ांनादेखील आपलासा वाटतो.

chitrapatang@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 4:00 am

Web Title: article on shinchan cartoon abn 97
Next Stories
1 हिरवे दोस्त
2 गजाली विज्ञानाच्या : जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे!
3 जगाला प्रेम अर्पावे..
Just Now!
X