News Flash

गजाली विज्ञानाच्या : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..

सर्वप्रथम त्यांनी दोन सुती पट्टय़ा वापरल्या. त्यानंतर कृत्रिम धागे वापरायचं ठरवलं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदा हरम

मुलांनो, येतोय ना लक्षात या म्हणीचा अर्थ? प्रयत्न केल्यावर अशक्यप्राय गोष्टही शक्य होते. आज आपण बघू, ‘वेलक्रो’ची गोष्ट. वेलक्रो- जो तुमच्या बुटांवर, शाळेच्या दप्तरावर लावलेला असतो.

जॉर्ज डी मेस्ट्रल हे स्विस इंजिनीअर होते. १९४१ साली ते आल्प्स पर्वतावर शिकारीला गेले होते. बरोबर त्यांचा कुत्राही होता. घरी आल्यावर कुत्र्याच्या अंगावर अडकलेल्या बरच्या (Bar) बिया त्यांनी पाहिल्या. त्यांना नवल वाटलं, की या कुत्र्याच्या केसांमध्ये कशा काय अडकल्या? त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी त्या नुसत्या काढून फेकून दिल्या नाहीत, तर त्याचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं. त्यांना काय आढळलं माहिती आहे? शेजारील आकृतीत दाखविल्याप्रमाणे ‘हूक आणि लूप’!

त्यावेळी ‘झिपर चेन’ अस्तिवात होती. पण तुम्हाला ठाऊकच आहे, चेन वापरताना त्रास होतो. जॉर्ज डी मेस्ट्रलना वाटलं, आपण हूक आणि लूप वापरून काही बनवू शकलो तर! कल्पना सुचताच ते कामाला लागले. सर्वप्रथम त्यांनी दोन सुती पट्टय़ा वापरल्या. त्यानंतर कृत्रिम धागे वापरायचं ठरवलं. नायलॉनचा वापर केला. त्या तऱ्हेचे हूक आणि लूप विणायची प्रक्रिया शोधली. त्याकरिता मशीन तयार केलं. हे सारं लिहायला सोपं आहे, पण त्यावेळी साल होतं १९५१. त्यानंतर या प्रक्रियेचं त्यांनी पेटंट सादर केलं. ते १९५५ साली संमत झालं आणि शेवटी १९५७ साली ते बाजारात उपलब्ध झालं.. ‘वेलक्रो’ या नावानं!

लक्षात घ्या- १९४१ ते १९५७. किती वर्ष गेली, पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यावर अविरत काम करत राहिले. आज २०१९ सालीही वेलक्रोची मागणी कमी झालेली नाही आणि अजून त्याला पर्यायही नाही. खरं ना!

याच म्हणीच्या अर्थाची तुम्हाला दुसरी म्हण आठवत्येय का? करा बरं विचार!

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:05 am

Web Title: article on velcro invansation
Next Stories
1 हिप्पोसारखं नाक
2 कार्टूनगाथा : ‘बोन्झो- द भू भू’
3 शाळेतली मंडई
Just Now!
X