समुद्रकिनारी वाळूवर फेरफटका मारताना काही वेगाने धावणारे प्राणी पटकन् वाळूतल्या बिळात जाताना तुम्ही नक्कीच पाहिले असतील. माझ्या बालवाचकांनो, हे प्राणी म्हणजेच खेकडे! आजच्या लेखामध्ये आपण याच खेकडय़ांची ओळख करून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात खेकडय़ांच्या तब्बल ४,५०० प्रजाती आहेत; साऱ्यांनाच कठीण कवच असतं आणि दहा पाय असतात; ज्यापैकी दोन चिमटय़ासारख्या पंजामध्ये बदललेले असतात. या पंजांनाच हलवून किंवा वाजवून खेकडे एकमेकांशी संवाद साधतात ते पाहणं फारच गमतीचा अनुभव असतो. खेकडय़ांच्या प्रजातींप्रमाणेच त्यांच्या आकारातही खूप वैविध्य आहे. चिमुकल्या, काही मिलीमीटर आकारापासून तब्बल १३ फूट एवढय़ा प्रचंड आकाराचे खेकडे असतात. काही खेकडय़ांच्या प्रजातींमध्ये त्यांचे अवयव, विशेषकरून पंजे, नैसर्गिकरीत्या गळून पडतात आणि साधारणपणे वर्षांच्या कालावधीत पुन्हा नव्याने तयार होतात.

महासागरांच्या खोल तळांपासून ते खारफुटीच्या जंगलांपर्यंत सगळीकडे खेकडे आढळतात. जोपर्यंत त्यांचे कल्ले म्हणजेच गिल्स ओले असतात तोपर्यंत ते जमिनीवरही आरामात राहू शकतात. जमिनीवर किंवा समुद्रतळाशी चालण्याची या खेकडय़ांची लकब मात्र खासच वैशिष्टय़पूर्ण आहे. यांचे पाय शरीराच्या दोन्ही बाजूला असून ते फक्त आत-बाहेरील बाजूसच हलू शकतात, त्यामुळेच खेकडय़ांची विशेष अशी मागे-पुढे नाही तर शरीराच्या एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला चालण्याची तऱ्हा पाहायला मिळते. अर्थातच, या नियमाला अपवाद खेकडय़ांच्यातही आहेतच.

बऱ्याचशा खेकडय़ांच्या प्रजातींमध्ये शेपटी शरीराखाली वळवून तयार झालेल्या भ्रूणधानी किंवा अंडय़ांसाठीच्या संरक्षक पिशवीमध्ये मादी खेकडे आपली अंडी सुखरूप ठेवतात. काही मोठय़ा आकाराच्या प्रजातींच्या माद्या ३,००,००० पर्यंत अंडी शरीरावरील या पिशवीमध्ये बाळगून त्यांचा सांभाळ करतात.

खेकडे चित्तवेधक आहेत, मात्र ते वैज्ञानिकदृष्टय़ाही महत्त्वाचे आहेत. प्रतिसूक्ष्मजीवक, रक्तपेशी-कर्करोग प्रतिकारक, रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे आणि हृदयाभिसरणाला चालना देणारी अनेक महत्त्वाची जैवरासायनिक औषधी तत्त्वं खेकडय़ांपासून मिळतात.

माझ्या बालवाचकांनो, यापुढे जेव्हा तुम्ही खेकडे पाहाल तेव्हा त्यांना थोडा वेळ निरखून, त्यांच्या निरीक्षणाचा आनंद घ्यायला विसरू नका.

ऋषिकेश चव्हाण

rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on crab
First published on: 01-10-2017 at 02:12 IST