News Flash

सोनटक्का

पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अतिनाजूक पाकळ्या आणि मन प्रसन्न करणारा सुवास..

पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अतिनाजूक पाकळ्या आणि मन प्रसन्न करणारा सुवास.. साधारण संध्याकाळच्या वेळी फुलणारे हे स्वर्गीय सौंदर्याने नटलेले फूल म्हणजे ‘सोनटक्का’. सोनटक्का भारतीय वंशाची झुडूपवर्गीय एक सदाहरित वनस्पती. साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज आढळते. सोनटक्का बहुवर्षांयु वनस्पती आहे. शास्त्रीय नाव Hedychium coronarium (हेडय़ाचीयम कोरोनारियम) असे असून ती हळद, आले यांच्या कुळातील आहे.

या झुडपाची उंची साधारण ०.५ ते १.५ मीटपर्यंत असू शकते. पावसाळा आणि हिवाळ्यात याला फुले येतात. फुले सुगंधी, लांब देठाची आणि त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. पाकळ्या इतक्या पातळ आणि नाजूक की हात लावायलादेखील भीती वाटावी. रंग तर इतका शुभ्र पांढरा की आपला हात लागला तर त्या मळतील की काय, असेच वाटावे. उमललेल्या फुलाचा आकार साधारणपणे फुलपाखरासारखा दिसतो, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये Butterfly ginger lily असे म्हणतात. तीन पाकळ्या ज्या ठिकाणी एकवटतात त्या ठिकाणी म्हणजे फुलाच्या मध्यभागी थोडी पिवळसर झाक असते. परागकणांनी भरलेली पिवळीधक्कम पिशवी अगदी शोभून दिसते. फुले संध्याकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत कोमेजून जातात. फुलांपासून सुगंधी द्रव्ये तयार केली जातात. तसेच पुष्पौषधीमध्ये देखील या फुलांचा वापर केला जातो. अगरबत्ती, साबण आणि सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी या फुलांचा सुगंधी द्रव्यात वापर होतो. फुले उमलली की जास्त हाताळल्यास खराब होतात म्हणून याच्या कळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या संध्याकाळी उमलतात.

सोनटक्क्याची पाने हिरवीगार आणि आकाराने बारीक, पण लांबट असतात. खोडावर ती एकमेकांच्या समोरासमोर असतात माशाचा काटा दिसावा अशी त्याची रचना असते. सोनटक्क्याच्या कंदापासून नवीन रोपांची निर्मिती होते. या कंदापासूनदेखील सुगंधी तेल काढले जाते; ज्याचा औषधात वापर केला जातो. सोनटक्क्याची पाने, फुले, कंद या सगळ्याचा औषधात वापर केला जातो. बागेत शोभेची वनस्पती म्हणून याची लागवड केली जाते. पिवळ्या रंगाचा देखील सोनटक्का असतो, पण तो तसा दुर्मीळ आहे. फार कमी ठिकाणी तो पाहायला मिळतो. प्रखर सूर्यप्रकाश किंवा कमी सूर्यप्रकाश असेल तरी याची वाढ छान होते.

आपण घरात मोठय़ा कुंडीमध्ये किंवा फुटलेला टब, बदली यामध्ये सहज याची लागवड करू शकतो. याला पाणी थोडे जास्त लागते, पण आपण घरातील भाज्या धुतलेले पाणी याला घालू शकतो. झाडावर उमलणारी ही नाजूक शुभ्र फुलपाखरे आपल्या अंगणी यावीत असे वाटत असेल तर आजच सोनटक्क्याचे रोप आपल्या हरितधनात सामील करून घ्या.

– भरत गोडांबे

bharatgodambe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:31 am

Web Title: articles in marathi on hedychium coronarium
Next Stories
1 उंदीरमामा की जय!!
2 शोध लाल रंगाचा
3 जलपरीच्या राज्यात : समुद्री गाय
Just Now!
X