News Flash

उंदीरमामा की जय!!

बासरीवाल्याने लबाड गावकऱ्यांना धडा शिकवल्याची गोष्ट तुम्ही ऐकलेलीच असेल.

बासरीवाल्याने लबाड गावकऱ्यांना धडा शिकवल्याची गोष्ट तुम्ही ऐकलेलीच असेल. त्याच गावातल्या उंदरांना तो बासरीच्या साहाय्याने गावाबाहेर काढतो. प्रत्यक्षातील उंदीर मात्र चीजच्या वासावर भुलतो, हे आपण कार्टूनमध्ये पाहिलं असेल. या चित्रातल्या पांढऱ्या उंदराची दिवाळी झालीये. पण हे चीजबाबत च्युजी असणारे उंदीर केवळ परदेशातच असतात. भारत, चीनमधील उंदीर मात्र गुमान काहीही खाताना दिसतात. केवळ काही रंगांच्या साहाय्याने चितारलेले हे चिनी चित्रकारांचे उंदीर पाहा. पाण्याचा आणि इंकचा वापर करून केलेल्या या चित्रामध्ये पेन्सिल वापरली जात नाही. तरीही हे उंदीर प्रमाणबद्ध वाटतात. इतकंच नव्हे, तर कार्टूनमधल्या उंदरांच्या अंगावरून गायब झालेले केस या उंदरावर छान दिसतात. त्यांच्या डोळ्यांतील चमक पाहिली की खरा उंदीर आठवतोच.

भारतात प्रसिद्ध व मान असणारे उंदीर आहेत. त्यापैकी सिद्धिविनायक, अष्टविनायक वगैरेंसमोर असणाऱ्या उंदिरांचा थाट बघण्यासारखा आहे. संपूर्ण सोन्या-चांदीचा असतो. ही धातुशिल्पं बनविण्यासाठी आधी त्याच आकाराचा मातीचा उंदीर बनवावा लागतो. मग साचा बनवून त्यातून हव्या त्या धातूचं उंदीरशिल्प तयार होतं. ते उंदीर धातूंचे असले काय किंवा मातीचे असले काय, त्यामागे असणारी श्रद्धा मोठी असल्याने त्याच्या कानात इच्छा सांगितल्याशिवाय भक्तमाणूस पुढे जात नाही म्हणे! आणि अशाच एका जुन्या भारतीय लघुचित्रातील हा गणपती ज्या उंदरावर बसलाय तो उंदीर बैलाइतका मोठा आहे. बहुतेक जगातील सर्वात मोठा उंदीर असावा.नशीब आपल्या घरातले उंदीर इतके मोठे नसतात. तुम्हाला आणखी कुठल्या चित्रात उंदीर आढळले तर मला त्याचा फोटो नक्की पाठवा. तोपर्यंत उंदीरमामा की जय!!

– श्रीनिवास आगवणे

shreeniwas@chitrapatang.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:29 am

Web Title: articles in marathi on rat
Next Stories
1 शोध लाल रंगाचा
2 जलपरीच्या राज्यात : समुद्री गाय
3 अक्षर दिवाळी 
Just Now!
X