भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प होणार पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथे. रेल्वेकडच्या मोकळ्या जागेचा विचार सौरऊर्जेसाठी.. महाराष्ट्रात इमारतींच्या गच्चीवर लवकरच सौर पॅनेल्स.. या अलीकडच्या काही चांगल्या बातम्या. जगातला सगळ्यात भव्य सौर प्रकल्प तामिळनाडूमध्ये कामुदी येथे आहे, तर कर्नाटकमधील पावगडामधला प्रकल्प त्याहूनही मोठा होतो आहे. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्य़ात नर्मदा नदीवर सौर पॅनेल्स आणि राजस्थानमध्ये थर वाळवंटात सौर फार्म असे यशस्वी प्रयोग आपल्याकडे आहेत. कोची विमानतळ पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतं, तर कोची मेट्रोमध्ये सतरा टक्के ऊर्जा सौर पॅनेल्स बसवून मिळवली आहे.

या सगळ्या प्रयत्नांमागचं पहिलं मोठं कारण म्हणजे खनिज इंधन संपत चाललं आहे. कोळसा, पेट्रोलियम अशी खनिज इंधनं तयार व्हायला कोटय़वधी वर्ष लागली. मात्र हा नैसर्गिक साठा आपण येत्या पन्नास वर्षांमध्ये संपवून टाकणार आहोत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्या इंधनातून होणाऱ्या प्रदूषणाने आपण सगळे त्रासून गेलो आहोत. अर्थात गेली अनेक वर्ष दुसऱ्या बाजूनेही विचार सुरू आहेत. पर्यावरणाची हानी होणार नाही असे ऊर्जास्रोत आपण शोधतो आहोत. सौर घटांचं तंत्रज्ञान सोपं आणि स्वस्त होत असल्याने आता हळूहळू सौरऊर्जेचा वापर वाढतोय. युरोपियन देश याबाबत आघाडीवर आहेत. तिथे एकूण वापरापैकी तीस टक्कय़ांहून अधिक ऊर्जा ही सौरऊर्जा असते.

आपला भारतही यात खूप पुढे आहे. आपल्याकडे बहुतेक सर्वत्र वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौर वॉटर हीटर्स आणि सौर कुकर आहेत. रस्त्यांवरचे दिवे आणि सिग्नल्ससाठी सौर पॅनेल्सचा वापर दिसतो. येत्या पाच वर्षांमध्ये आपण सौर विद्युतनिर्मिती वीस गिगावॅटपासून शंभर गिगावॅटपर्यंत नेणार आहोत, तर पुढल्या सहा-सात वर्षांमध्ये मोबाइलसारख्या उपकरणांच्या चाìजगसाठी सौरऊर्जा सरसकट वापरली जाईल. आज या क्षेत्रात खूप तरुण मंडळी स्टार्टअप सुरू करत आहेत. म्हणजे तुम्ही मोठे व्हाल तेव्हा ऊर्जेसाठी आपला जास्तीत जास्त भरवसा असेल सूर्यावरच!

– मेघश्री दळवी

meghashri@gmail.com