News Flash

तन्मय बक्षी आर्टिफिशल इंटेलिजन्समधील सर्वात छोटा तज्ज्ञ!

आज मी तुम्हाला ज्या मुलाची गोष्ट सांगणार आहे तो चौदा वर्षांचा आहे.

आज मी तुम्हाला ज्या मुलाची गोष्ट सांगणार आहे तो चौदा वर्षांचा आहे. आणि आज आर्टिफिशल इंटेलिजन्समधला वयाने सगळ्यात लहान असलेला तज्ज्ञ म्हणून तो जगभर प्रसिद्ध आहे. त्याचं नाव- तन्मय बक्षी.

कॅनडात राहणाऱ्या तन्मयचे बाबा कॉम्प्युटर इंजिनीअर आहेत. त्यामुळे अगदी लहान वयापासून तो संगणकाच्या संपर्कात आला. बाबा संगणकावर काय करत असतो हे बघता बघता त्यात तन्मयला गोडी निर्माण झाली. त्याची रुची बघून त्याच्या बाबानंही त्याला प्रोत्साहन दिलं. होम स्कूलिंग पॅटर्नमध्ये- म्हणजे शाळेत न जात घरातच शिक्षण घेणारा तन्मय हळूहळू कॉम्प्युटर प्रोग्रामिंग एक्स्पर्ट आणि आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ म्हणून काम करतो. त्याने आजवर अनेक अ‍ॅप्स तयार केली आहेत. पुस्तकं लिहिली आहेत. टेडेक्समध्ये भाषण केलं आहे. आयबीएम वॉटसन समिटमध्ये त्याचे विचार मांडले आहेत. शिवाय त्याचं स्वत:चं युटय़ुब चॅनल आहे. तुम्हाला युटय़ुबवर गेल्यानंतर कोणते व्हिडीओज् बघायचे असा प्रश्न पडतो ना? (खरं तर हा प्रश्न तुमच्या आई-बाबांना पडतो. हो ना!) मग तन्मयचं चॅनल फॉलो करा. वयाच्या आठव्या वर्षी तन्मयने  ड्रर अ‍ॅप बनवलं. पुढच्या एक-दोन वर्षांत त्याची अ‍ॅप्स अ‍ॅपल स्टोअरमध्ये यायला लागली. पण अ‍ॅप्सच्या विश्वात तो फार काळ रमला नाही. त्याला कंटाळा यायला लागला. त्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देईल असं काहीतरी काम त्याला हवं होतं. म्हणून मग अकराव्या वर्षी त्याने युटय़ुब चॅनल सुरू केलं. त्यावर तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची तो उत्तरं देतो. गॅजेट्स वापरताना तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला तन्मयच्या युटय़ुब चॅनलवर मिळू शकतात. पाठोपाठच तो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ओढला गेला. त्याला ओळखणारे म्हणतात, ‘तंत्रज्ञान एखाद्या टीपकागदासारखं तो स्वत:त शोषून घेतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आरोग्य सेवांसाठी कसा वापर करता येऊ  शकतो यात तो संशोधन करतो आहे. त्याच्या मते, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडवता येऊ  शकतात.

‘तन्मय टीचेस’ हे तन्मय बक्षीचं

युटय़ुब चॅनल आहे. आजवर या चॅनलला २७१०९०३ व्हूज मिळालेले आहेत. तुम्ही टेक्नोसॅव्ही असलात आणि  तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल, त्यातले नवीन अपडेट्स माहीत करून घ्यायचे असतील तर तन्मयचं युटय़ुब चॅनल नक्की बघा. आणि त्यासाठी https://www.youtube.com/channel/UCqufIGIYauviVaKyJUzKvQw या लिंकचा वापर करा.

रेड अलर्ट

दहा आणि बारा वर्षांच्या मुली आणि मुलांची फेसबुक खाती असतात. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्स असतात. तुमचंही कदाचित फेसबुक खातं असेल. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये तुम्ही असाल. तन्मयसारखं आपणही टेक्नोसॅव्ही असायला हवं असंही वाटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तन्मय जरी टेक्नो तज्ज्ञ आहे तरी त्याच्या पालकांचा त्याच्या वाढीत खूप मोठा हात आहे. त्यानं जे काही केलंय त्यात पालकांची मदत आणि मार्गदर्शन आहेच. शाळेत कधी कधी मित्रमैत्रिणी आपल्याला चिडवतात. तुम्ही काय म्हणता बरं? ‘बुलिंग’ करतात. बरोबर ना! त्रास देतात. सगळे मिळून चेष्टा करतात. पण शाळेत आपलेच मित्रमैत्रिणी असतात. ऑनलाइन जगातही असं बुलिंग करणारे लोक असतात. त्रास देणारे लोक असतात. आणि कधी ते आपल्या परिचयाचे, माहितीतले असतात, तर कधी अनोळखी. त्यामुळे या जगात वावरताना, व्हॉट्स अँप ग्रुप्स करताना त्याचा तुमच्या फायद्यासाठी, वाढीसाठी उपयोग झाला पाहिजे. तन्मयनं या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माध्यमांचा स्वत:च्या प्रगतीसाठी वापर केलाय. चांगला वापर केलाय.. हे नक्की लक्षात ठेवा. आणि हा न्यू मीडिया चांगल्याच गोष्टींसाठी उपयोगात आणा.

– मुक्ता चैतन्य

Muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2018 12:44 am

Web Title: artificial intelligence 3
Next Stories
1 रवा उत्तप्पम्.. चटकन्, पौष्टिक, पोटभर
2 वेगळेपण.. दोन नववर्षांमधलं!
3 मी? किंवा मी..?
Just Now!
X