News Flash

गजाली विज्ञानाच्या : जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे!

कांगारूंची प्रजनन प्रक्रिया इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत फारच वेगळी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदा हरम

ऑस्ट्रेलिया म्हटलं की कांगारूच आठवतं. एवढंच नाही, तर आई कांगारू आणि तिच्या पिशवीतून डोकावणारं पिल्लू डोळ्यांसमोर येतं. गंमत वाटते. पण नेमकं त्या आईला किंवा पिल्लांना काय वाटतं, याचा आपण कधी केला आहे का विचार?

कांगारूंची प्रजनन प्रक्रिया इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत फारच वेगळी आहे. ते वेगळेपण वाचल्यावर तुम्हीच म्हणाल, ‘जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे!’

कांगाारूच्या अंडय़ाचं फलन होतं तेव्हा अंडं फारच छोटं म्हणजे ०.१२ मिमी व्यासाचं असतं-  एखाद्या वाळूच्या कणाइतकं! इतर पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडय़ाभोवती अतिशय पातळ- म्हणजे किती? तर काही मायक्रोमीटर (१००० मायक्रोमीटर= १ मिमी) जाडीचं कवच तयार होतं. ही गर्भावस्था सरासरी ३० दिवसांची असते. आता मादी आपली पिशवी (pouch) चाटून-पुसून स्वच्छ करते. शेपूट पायांच्या मध्ये घेऊन व मागचे पाय सरळ ताणून ती आपल्या पाठीवर बसते. शरीर थोडं पुढे झुकवून, जिथून पिल्लू  बाहेर येतं तिथपासून पिशवीपर्यंतचा मार्ग ती जिभेने चाटते. आता अंडय़ांपासून तयार झालेलं छोटंसं पिल्लू बाहेर येण्याची वेळ झालेली असते.

जन्माला येणारं पिल्लू तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं छोटं असतं- जेमतेम २ सेंमी लांब व १ ग्रॅमपेक्षाही कमी वजन. एखाद्या ‘बी’ प्रमाणे दिसतं. (चित्र पाहा) जन्मत: ते आंधळं, केसविरहित, अगदी छोटे पाय आणि दिसतील न दिसतील असे मागचे पाय, अशा अवस्थेत असतं. जरी ते अविकसित असलं तरी त्याला दिशा (वर-खाली) आणि वासाचं उत्तम ज्ञान असतं. पुढचे पाय पोहल्यासारखे करत ते वरती पिशवीपर्यंत धडपडत जातं. या प्रवासाला त्याला तीन मिनिटं लागतात. त्याच्या आईने तो भाग चाटल्यामुळे तिच्या लाळेचा वास त्याला पिशवीपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगी पडतो. हा प्रवास ते पूर्णपणे स्वत:च्या हिमतीवर करतं. खाली पडल्यास मरण अटळ!

त्याच्या आईच्या पिशवीमध्ये चार स्तनाग्रं असतात. त्यातील एकाला हे पिल्लू चटकन पकडतं आणि पिशवीमध्ये ते सुरक्षित होतं. अशातऱ्हेने पुढील साडे-सहा महिने ते पिशवीमध्ये वाढत असतं. नंतर ते हळूच बाहेर डोकावयाला लागतं आणि बाहेरच्या जगाचा वेध घेतं. साधारण १५ दिवस ही प्रक्रिया चालते. आत्मविश्वास निर्माण झाला की ते उडी मारून बाहेर पडतं. आपल्या आईच्या आजूबाजूलाच फिरतं. भीती वाटली की परत पिशवीत येऊन बसतं. मात्र एकदा ते ८ महिन्याचं झालं की सहसा पिशवी वापरत नाही. ते दीड वर्षांचं होईपर्यंत आईवरती दुधाकरिता अवलंबून असतं. त्यानंतर आपल्या पालकांप्रमाणे गवत आणि इतर अन्न खायला लागतं. ते सहा वर्षांचं झालं की त्याची प्रौढांत गणना होते. पूर्ण वाढलेलं कांगारू ४-८ फूट उंच आणि ५०-१०० किलो वजनाचं असतं.

इथे नमूद करावंसं वाटतं की, कांगारू आई दोन प्रकारचं दूध तयार करते. स्तनाग्राला चिकटलेल्या गर्भावस्थेतील पिल्लाकरिता कर्बोदकयुक्त दूध, तर बाहेर फिरणाऱ्या अन् पिशवीत असलेल्या पिल्लाकरिता मेदयुक्त दूध.

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:02 am

Web Title: australia kangaroo pouch balmaifal article abn 97
Next Stories
1 जगाला प्रेम अर्पावे..
2 कार्टूनगाथा : जपानी शेखचिल्ली
3 धीर आणि जिद्द