03 April 2020

News Flash

शिर सलामत तर पगडी पचास!

भक्षकाने भक्ष्याला पकडलं किंवा त्याच्यावर हल्ला केला तर तो सजीव स्वत:चा पाय किंवा शेपटी तोडतो.

|| डॉ. नंदा हरम

आपल्यावर एखादं संकट येऊन खूप नुकसान झालं, पण जिवानिशी सहीसलामत त्यातून बाहेर पडलो तर आपण ‘शिर सलामत तर पगडी पचास!’ ही म्हण सर्रास वापरतो. जीवसृष्टीतील काही सजीवांनाही ही म्हण शंभर टक्के लागू पडते.

भक्षकाने भक्ष्याला पकडलं किंवा त्याच्यावर हल्ला केला तर तो सजीव स्वत:चा पाय किंवा शेपटी तोडतो. त्यामुळे भक्षकाची पकड सल होते किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. ती संधी साधून भक्ष्य त्याच्या तावडीतून निसटतो. या अवयव तोडण्याच्या क्रियेला स्वविच्छेदन (autotomy) म्हणतात. तुटलेल्या भागाची कालांतराने पुर्ननिर्मिती होते. काही प्रकारच्या पाली, सॅलामँडर यांची भक्षकाकडून शेपटी पकडली गेल्यास ते शेपटी तोडून पळ काढतात. प्रत्येक प्रजातीनुसार तुटलेली शेपटी परत येण्यास काही आठवडे किंवा महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच पुर्ननिर्मित भाग कुच्रेचा बनलेला असून त्याची लांबी कमी आणि रंग व पोतही वेगळा असतो. स्वविच्छेदनामुळे जीव वाचला तरी त्याचे काही तोटे आहेत. त्याचा त्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यांचं आरोग्य व आयुर्मानही कमी होतं. त्यांच्या शेपटीमध्ये मेदाचे साठे असतात. त्यामुळे या पाली भक्षक निघून गेल्यावर तो तुकडा खाऊन टाकतात.

मादागास्कर येथे मिळणारी ‘गेकोलेपिस मेगालेपिस’ ही पालीची प्रजात वैशिष्टय़पूर्ण आहे. इतर पालींच्या तुलनेत हिच्या अंगावरचे खवले आकाराने सर्वात मोठे आहेत. स्वसंरक्षणार्थ खवल्यांचे स्वविच्छेदन करण्यात तरबेज असलेली ही एकमेव प्रजात आहे काही आठवडय़ांतच तिच्या त्वचेची पुर्ननिर्मिती होते.

सस्तन प्राण्यांमध्ये किमान २ आफ्रिकन उंदरांच्या जातीमध्ये त्वचेचे स्वविच्छेदन करण्याची क्षमता आहे. स्वविच्छेदीत संपूर्ण त्वचा किंवा बाधित झालेल्या त्वचेच्या पेशींची पुर्ननिर्मिती करता येते.

याव्यतिरिक्त कात टाकण्याच्या प्रक्रियेतही काही सजीव स्वविच्छेदन करतात. सजीवांची पूर्ण वाढ होण्याकरिता त्यांना वेळोवेळी कात टाकावी लागते. या क्रियेत जेव्हा नवीन बा आवरण तयार होते, तेव्हा जुन्यातून बाहेर येताना पाय अडकल्यास स्वविच्छेदनाचा मार्ग स्वीकारला जातो. उदा. कीटक, कोळी, कवचधारी सजीव. खेकडय़ांमध्ये संरक्षणाचे मोठे पुढचे पाय किंवा स्टिक कीटकाचे (Stick insect) लांब, निमुळते पाय अडकण्याची शक्यता असते.

अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या २०० हून अधिक प्रजातींमध्ये रासायनिक, औष्णिक किंवा विद्युत उत्तेजनाला प्रतिसाद म्हणून स्वविच्छेदन घडते. कोळ्याच्या (आरजिओपी प्रजात) पायाला कुंभारीण, गांधील किंवा मधमाशी चावल्यास शरीरात विष पसरायच्या आत म्हणजेच काही सेकंदांत कोळी आपला पाय तोडतो.

स्वसंरक्षणार्थ शरीरातील अवयव बाहेर टाकणे हा एक वेगळाच स्वविच्छेदनाचाच प्रकार आहे. समुद्रकाकडी या सजीवावर मासे किंवा खेकडय़ांनी हल्ला केल्यास त्यांना घाबरविण्याकरिता या मार्गाचा अवलंब केला जातो. शरीरातील पेशी काही दिवसांतच या अवयवांची पुर्ननिर्मिती करतात. गमतीशीर वाटतंय ना, हे सारे वाचून!

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 12:01 am

Web Title: autotomy mpg 94
Next Stories
1 जागरूक ग्राहक व्हा
2 दगडी चाळ
3 मोठय़ांसाठीची छोटय़ांची गोष्ट
Just Now!
X