02 March 2021

News Flash

हितशत्रू : त्याला/तिला काय समजतंय?

काहीजणांच्या घरात आजी किंवा आजोबा असतात, थोडेसे खेडवळ वगरे त्यांच्याबाबत अशी कमेंट पटकन् केली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

मेघना जोशी

तुमच्या वर्गात आहेत ना रे असे कोणी, ज्यांच्याबद्दल तुम्ही सहजच असं म्हणून जाता. काहीजणांच्या घरात आजी किंवा आजोबा असतात, थोडेसे खेडवळ वगरे त्यांच्याबाबत अशी कमेंट पटकन् केली जाते. पण हे असं म्हणणं ज्यांच्यासाठी म्हणताय त्यांच्यासाठी घातक नसतं, तर ते तुमच्यासाठी घातक असतं. म्हणून कुणाहीबाबत, कुठेही, केव्हाही, कधीही ‘त्याला/तिला काय समजतंय?’ असा केलेला विचार हा आपला मोठ्ठा शत्रू असतो. अनेकदा हा विचार समोरच्या व्यक्तीच्या बाह्य़रूपावरून केला जातो. म्हणजे बघा हं, खेडवळ दिसणाऱ्या किंवा अजागळ कपडय़ांमधे वावरणाऱ्या असलेल्या व्यक्तीबाबत चटकन् असा विचार करून मार्गदर्शक म्हणून किंवा आपला स्पर्धक म्हणून आपण त्याला कानाआड करण्याची शक्यता असते. आणि जेव्हा मार्गदर्शनाची किंवा स्पध्रेची वेळ येते तेव्हा तिचा एखादा असा गुण समोर येतो की आपल्यालाच चपराक बसते. अनेक मालिका, सिनेमे, कथा यांमध्ये हे दाखवलं जातं. वरपांगी बावळट भासणारी व्यक्ती आतून एकदम भारी असते आणि सगळयांपेक्षा वरचढ ठरते. बाकी मालिका, सिनेमे, कथा कादंबऱ्यांमधल्या गोष्टी आभासी किंवा खोटय़ा असल्या तरी हे जे काही दाखवलं जातं ते मात्र सत्याच्या खूप जवळ जाणारं असतं. म्हणून जगात कुणाबद्दलही ‘त्याला/तिला काय समजतंय?’ असा विचार करून त्या व्यक्तीकडे  दुर्लक्ष करून आपली फजिती करून घेण्यापेक्षा ‘त्याला/तिला  माझ्यापेक्षा वेगळं काय काय समजतंय?’ ते जाणून घेऊन तुम्हीही ते समजून घ्यायचा प्रयत्न केलात, तर ते तुमच्या जास्त फायद्याचं ठरेल. काय समजतंय का?

joshimeghana231@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:03 am

Web Title: baalmaifal hitshatru article by meghna joshi
Next Stories
1 विज्ञानवेध : दिसतं ते सगळं खरं असतं?
2 परी आणि ससा 
3 प्रकल्पाची गोष्ट
Just Now!
X