News Flash

गंमत विज्ञान : फुग्याची जादू

बाटलीच्या तोंडातून मध्यम आकाराचा फुगा आत सरकवा आणि फुग्याचे तोंड बाटलीच्या तोंडावर अडकवून टाका

साहित्य : एक किंवा दीड लिटरची रिकामी पाण्याची बाटली, स्ट्रॉ, मध्यम आकाराचा फुगा, कात्री, डिंक.
कृती : रिकाम्या बाटलीचे झाकण काढून टाका. बाटलीच्या खालच्या भागातून स्ट्रॉचा थोडा भाग आत जाईल एवढेच भोक पाडा. स्ट्रॉ आत सरकवल्यावर बाटली आणि स्ट्रॉमध्ये थोडी फट शिल्लक राहत असेल तर स्ट्रॉच्या भोवती तेथे डिंक लावा. त्यामुळे त्या फटीतून बाटलीतील हवा बाहेर पडणार नाही. स्ट्रॉच्या बाजूने फट न राहणे प्रयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
आता बाटलीच्या तोंडातून मध्यम आकाराचा फुगा आत सरकवा आणि फुग्याचे तोंड बाटलीच्या तोंडावर अडकवून टाका. आता आपल्या प्रयोगासाठी आवश्यक साहित्य तयार झाले आहे.
हे करून बघा
१) बाटलीच्या बाहेरील स्ट्रॉला तोंड लावून बाटलीतील हवा तुमच्या तोंडात ओढून घ्या. बाटलीतील फुगा फुगलेला दिसेल. आता स्ट्रॉपासून तोंड लांब न्या. फुगा पुन्हा पूर्ववत झालेला दिसेल.
२) पुन्हा स्ट्रॉ तोंडात धरा आणि तोंडाने जोरात हवा बाटलीच्या आत फुंका. बाटलीतील फुगा बाटलीच्या बाहेर येईल आणि तो फुगलेला दिसेल.
३) जर तुम्ही स्ट्रॉच्या माध्यमातून तोंडाने हवा सतत आत बाहेर करत राहिलात तर त्यानुसार फुगा आतील किंवा बाहेरील बाजूस फुगलेला दिसेल.
असे का होते?
स्ट्रॉने बाटलीतील हवा ओढून घेतल्याने तेथील हवेचा दाब कमी होतो. बाटलीच्या बाहेर हवेचा दाब सामान्य (परंतु बाटलीतल्या दाबापेक्षा जास्त) असल्याने बाहेरची हवा फुग्यात शिरून फुगा फुगतो. येथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे बाटलीला लावलेले फुग्याचे तोंड उघडे असूनही फुगा फुगलेला राहतो.
तुम्ही ज्या वेळी बाटलीत हवा फुंकता तेव्हा बाटलीतील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होऊन ती हवा फुग्यात शिरते आणि फुगा बाटलीच्या बाहेर ढकलला जाऊन फुगतो.
हा प्रयोग बघण्यासाठी https://www.youtube.com/watchv=Hfn006vM1UQ ही लिंक दिलेली आहे, ती पाहा.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 12:40 am

Web Title: balloon magic
Next Stories
1 डोकॅलिटी
2 मराठी तितुकी वाढवावी..
3 पुस्तकांशी मैत्री : खोडकर सवंगी
Just Now!
X