प्राची मोकाशी

‘‘अमीगो, कम हियर, कम ऑन, कम ऑन, गुड बॉय.’’

बंगल्यामागच्या पारिजातकाच्या झाडाखाली सावलीत बसलेल्या अमीगोला बंगल्याच्या दारातून सुहृद आवाज देत होता. अमीगो एका आज्ञाधारकाप्रमाणे त्याची शेपटी हलवत सुहृदपाशी आला आणि त्याच्या पायाजवळ येऊन बसला.

‘‘नाही येणार घरात?’’ सुहृद अमीगोला घरात नेऊ लागला, पण अमीगो जागचा हलेना. शेवटी सुहृद दाराबाहेर व्हरांडय़ातच मांडी घालून खाली बसला. अमीगोने लागलीच त्याचं डोकं सुहृदच्या मांडीवर ठेवलं..

अमीगो हा तसा कुणालाही भीती वाटेल असा मोठा जर्मन शेपर्ड कुत्रा, पण स्वभावाने अगदी प्रेमळ होता! घरात सगळ्यांचा लाडका. विशेष करून सुहृदचा! सुहृदच्या बाबांनी जेव्हा अमीगोला घरी आणलं तेव्हा सुहृद अगदी तान्हा होता- एक वर्षांचा! सुहृदची आणि अमीगोची थोडय़ाच दिवसांत इतकी घट्ट मत्री जमली की, कित्येकदा घरचे अमीगोवर सुहृदची जबाबदारी ठेवून घरातली सगळी कामं करायचे. सुहृदची संपूर्ण काळजी घेण्याची डय़ुटी अमीगोकडेच असायची. सुहृद कुठे येतो-जातो, चढतो-उतरतो, कुठल्या गोष्टी उचकतो, काय खातो- अमीगो डोळ्यांत अगदी तेल घालून सुहृदकडे लक्ष द्यायचा! जणू काही त्याला घरच्यांनी सुहृदची काळजी घेण्याचं ट्रेनिंग दिलं होतं! अमीगो हे सगळं स्वत:हून करायचा.

यावर्षी सुहृद दहा वर्षांचा होणार होता. त्या दोघांची एवढय़ा वर्षांची इतकी घट्ट मत्री होती की दोघांना एकमेकांच्या मनातलं सहज कळायचं- ‘टेलीपथी’च जणू! शाळेत काय-काय झालं, कुठल्या टीचर काय म्हणाल्या, कोण मित्र काय म्हणाले, कुणाशी भांडण झालं.. सगळच्या सगळं सुहृद अमीगोला येऊन सांगायचा. आणि अमीगोही त्यावर छान ‘रीस्पॉन्स’ द्यायचा. कधी शेपूट हलवायचा, कधी सुहृदचा चेहरा चाटायचा, सुहृदभोवती गोल-गोल फिरायचा- ते अगदी पाहण्यासारखं असायचं! तसंच अमीगोला काय हवंय, काय नकोय तेही सुहृदला तो काही न सांगता लगेच समजायचं.

..मांडीवर डोकं ठेवून विसावलेल्या अमीगोच्या डोक्यावरून सुहृद अलगद हात फिरवू लागला.

‘‘रागावलास का रे? अमीगो, तुला आठवतंय, तू इथे आलास तेव्हा लोकांनी कित्तीतरी नावं सुचवली होती तुझ्यासाठी- शेरू, टायगर, टोमेटो, पम्पकिन.. पण ‘अमीगो’ किती मस्त नाव ठेवलंय नं बाबांनी, एकदम हटके! मी सुहृद म्हणून तू अमीगो! ‘मी अमीगो’ म्हणजे ‘माझा मित्र’-  स्पॅनिश भाषेत! बाबा स्पॅनिश भाषेचे एक्स्पर्ट आहेत म्हटल्यावर तुझं हटके नाव असणार हे आलंच, काय?’’ सुहृद एकदम बोलायचा थांबला आणि त्याने एक उसासा दिला.

‘‘नुसता मित्र नाही तर एकदम खासमखास मित्र! कधीच दूर न जाणारा.’’ सुहृदने अमीगोचे पुढचे दोन पाय त्याच्या हातात घेतले. अमीगो हलकं कण्हू लागला.

‘‘पण आता आपल्याला वेगळं व्हावं लागणार,  कायमचं! बाबा तुझ्यासाठी नवा मालक शोधताहेत..’’ हे बोलताना सुहृदला एकदम हुंदका आला, जो त्याला आवरणं अगदी कठीण जात होतं. अमीगो केविलवाण्या नजरेने सुहृदकडे पाहू लागला.

‘‘असं नको बघूस माझ्याकडे. माझं मन खातं मग! पण मी तरी काय करू रे? परवा डॉक्टरकाका काय म्हणाले ते ऐकलंस नं? आपल्या मत्रेयीचा प्रश्न आहे म्हणून बाबा असा निर्णय घेताहेत. मलासुद्धा हे नाही सहन होत. इतकी वर्ष आपण दोघं.. पण खरंच पर्याय नाहीये रे आपल्याकडे!’’ आणि सुहृदने अमीगोला घट्ट मिठी मारली.

झालं असं होतं की, सुहृदच्या धाकटय़ा बहिणीला- मत्रेयीला गेले काही दिवस श्वसनाचा त्रास होत होता. ती खूप लहान होती- जेमतेम वर्षांची! तिला सतत शिंका यायच्या, डोळ्यांतून आणि नाकातून पाणी वाहत राहायचं, खूप खोकला यायचा आणि दमही लागत होता. तिच्या सगळ्या टेस्ट झाल्यावर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की तिला अ‍ॅलर्जीचा त्रास होतोय. ते तिला तपासायला घरी आले तेव्हा म्हणाले होते-  ‘‘कुत्र्या-मांजरांसारख्या प्राण्यांमुळे मत्रेयीला असं होतंय. त्यामुळे घरात कुत्र्या-मांजरांचा मुळीच वावर असायला नकोय!’’ डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून घरचे सगळेच स्तब्ध झाले होते.

पण डॉक्टरांचं हे बोलणं अमीगोला समजलं होतं की काय कोण जाणे, तेव्हापासून तो घरात येण्याचा बंद झाला. तो बाहेरच्या बाहेरच असायचा. कुणी घरात बोलावलं तरी आत यायचा नाही. दारापाशीच थांबून राहायचा. सुहृदने त्याचं हे बदललेलं वागणं बरोबर टिपलं. अमीगोचा तो समजूतदारपणा पाहून सुहृद आतून पार हलून गेला होता.

..अमीगो आता काही दिवसांतच घरातून जाणार या विचाराने सुहृदला रडू आवरेना. त्याने अमीगोला मांडीवरून अलगद बाजूला ठेवलं आणि तो धावत त्याच्या खोलीमध्ये पळाला. स्वत:ला पलंगावर झोकून देत तो ढसाढसा रडू लागला. अमीगोला सुहृद त्याच्या खोलीत रडताना दिसत होता. नेमकी त्यावेळी आई मत्रेयीला भरवत होती आणि बाबा ऑफिसात होते. त्यामुळे सुहृद एकटाच रडत होता. सुहृदला असं एकटं रडताना पाहून इथे दारातच अमीगो कावराबावरा झाला आणि रडल्यासारखा कण्हू लागला. शेवटी सुहृदच डोळे पुसत थोडय़ा वेळाने बाहेर आला आणि त्याने अमीगोला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. अमीगो जिभेने त्याला पटापटा चाटू लागला.

एवढय़ात आईने बोलावलं म्हणून सुहृद नाइलाजाने तिच्या खोलीत गेला. अमीगो पुन्हा बंगल्यामागील पारिजातकाच्या झाडापाशी गेला आणि त्याच्या पुढच्या दोन पायांमध्ये तोंड खुपसून झाडाच्या सावलीत पहुडला. त्या पारिजातकाच्या झाडाखालची ती जागा म्हणजे अमीगोची स्वत:ची ‘स्पेस’ होती. त्याला कुणी शोधायला लागलं की तो हमखास तिथे सापडायचा. तिथे बसला की थोडय़ा वेळाने आपसूकच त्याचा उत्साह पुन्हा परत यायचा, पण आज असं काहीच होईना.

गेले काही दिवस हे असंच चाललं होतं. एरव्ही अमीगो म्हणजे नुसता उत्साहाने सळसळणारा धबधबा असायचा. पण अलीकडे शांत शांत असायचा. त्यात आता त्याचं वयही झालं होतं. शरीरात तेवढी चपळता राहिली नव्हती. त्याच्या हालचालीदेखील मंदावल्या होत्या. पटापट उठता यायचं नाही. पण एकेकाळी बंगल्यात शिरलेल्या चोराला त्याच्या पाठीमागे लांबपर्यंत धावत जाऊन त्याने पकडून दिलं होतं.

..आईने अमीगोसाठी दिलेल्या पोळ्या आणि उकडलेल्या अंडय़ांचा बाउल घेऊन थोडय़ा वेळाने सुहृद अमीगोपाशी आला. अमीगोचं हे आवडीचं खाणं होतं. बाउल अमीगोच्या पुढय़ात ठेवून सुहृदने मीगोच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. त्याला खाण्याचा आग्रह करू लागला. अमीगो काही खाईल म्हणून तो थोडा वेळ तिथे थांबला, पण अमीगो तिथून उठून निघून गेला. मग सुहृदही काहीच न बोलता अस्वस्थ होऊन घरात आईशी बोलायला गेला. सुहृद गेल्यावर अमीगो पुन्हा तिथे आला आणि त्या अन्नाच्या बाउलकडे नुसताच पाहत राहिला. पुढच्या दोन पायांमध्ये आपलं तोंड खुपसून तो शांतपणे पहुडला. आपलं आवडीचं अन्न जेवायचीही त्याची आता इच्छा होईना.

पुढचे तीन-चार दिवस अमीगो त्या पारिजातकाच्या झाडाखालीच निमुटपणे दिवसभर बसलेला असायचा. त्याचा चेहरा एकदम निस्तेज झाला होता. तो काही खात नव्हता की पीत नव्हता. फारसा कुठे वावरतही नव्हता. सुहृद दिवसभर तिथे घुटमळत असायचा. घरची इतर मंडळीही सारखी येऊन-जाऊन असायची. तेव्हा अमीगो त्याची शेपूट थोडी हलवायचा. पण एरव्ही तो गप्प असायचा, समाधी लागल्यासारखा! शेवटी सर्वानुमते दुसऱ्याच दिवशी प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलवायचं ठरलं.

..पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुहृदला पारिजातकाच्या झाडाखाली अमीगो निपचित पडलेला दिसला. त्याचं अंगं गार पडलं होतं. सुहृदने ताबडतोब बाबांना बोलावलं. थोडय़ा वेळात डॉक्टर आले आणि त्यांनी अमीगोचे प्राण गेल्याचं जाहीर केलं. सुहृद नि:शब्द झाला आणि अमीगोपाशी बसून तो ओक्साबोक्शी रडू लागला.

‘‘शेवटी त्याचं घर सोडून अमीगो कुठेच गेला नाही,’’ बाबा सुहृदला सावरत म्हणाले आणि त्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं. आई मत्रेयीला घेऊन बंगल्याच्या व्हरांडय़ात उभी होती. तिलाही रडू आवरत नव्हतं..

..त्या पारिजातकाच्या झाडाखाली अमीगोला आता त्याची हक्काची ‘स्पेस’ मिळाली होती- कायमची! तिथेच शेजारी बसून सुहृद अजूनही हमसून-हमसून रडत होता. एवढय़ात वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि पारिजातकाच्या फुलांचा सडा अमीगोच्या ‘स्पेस’वर अलगदपणे विखुरला..

mokashiprachi@gmail.com