भारती रायबागकर

‘‘तेजस, आहेस का घरात? चल, खेळायला येतोस नं?’’

‘‘अरे, हो, हो, येतो मी, पण तुम्ही आधी घरात तर या.’’

‘‘चल लवकर,’’ असं म्हणत रौनक, सोहम, रीना, पिंकी सगळे घरात आले. आज छोटा गंधारही त्यांच्यासोबत आला होता. डायिनग टेबलवर तेजसची आजी लाडू करत होती आणि तेजस त्यांना मदत करत होता.

‘‘अरे तेजस, हे काय करतोयस तू?’’

‘‘आजीला मदत करतोय, आजीनं शिकवलेत मला. हे बघा मी केलेले लाडू, आहेत ना गोल गोल?’’ तेजसनं मोठ्ठा आव आणत म्हटलं.

‘‘हो, हो, छानच दिसत आहेत, पण आजी, कशाचे आहेत हे लाडू?’’ रौनकनं विचारलं.

‘‘अरे, तीळ आणि गुळाचे.’’

‘‘अरेच्च्या तिळगुळाचे? खरंच म्हणजे संक्रांत आलीच की.. र्हुे..’’ सोहम आनंदाने चीत्कारला.

‘‘आजी, आम्हीपण करू का लाडू?’’ रीना, पिंकी त्यांचे फ्रॉक सावरत म्हणाल्या. ‘‘हो, हो, आम्ही पण.’’ रौनक, सोहम पुढे सरसावले.

‘‘मीपण कल्नाल लालु.’’ छोटा गंधार थोडाच मागे राहणार होता.

आजीने प्रत्येकाला वेगळ्या ताटलीत लाडू करायला दिले.

‘‘तुझा बसका, माझा गोल, तुझा मोठा, माझा छोटासा,’’ अशी मजा करत मुलं लाडू करू लागली.

‘‘आजी, संक्रांतीला तिळगुळाचेच लाडू का करतात बरं? रव्याचे, बेसनाचे, बुंदीचे का नाही करत?’’ तेजसची लाडिक तक्रार ऐकून आजी म्हणाल्या, ‘‘हो, हो, मला माहिती आहे तुला ते सगळे लाडू किती आवडतात ते, दिवाळीला केलेच होते ना आपण. पण आता जानेवारी महिना म्हणजे मराठी पौष महिना सुरू झालाय आणि थंडीचा कडाकापण वाढलाय. बघ, तुझी मित्र कंपनी स्वेटर घालून आलीय की नाही!’’

‘‘हो नं, सकाळी सकाळी शाळेत जायला नको वाटतं अगदी, मस्त दुलईत पडून राहावं तर..’’ रीना कुरकुरली.

‘‘बरोबर, पण या थंडीत आपला निभाव लागावा म्हणूनच हे तिळगुळाचे प्रयोजन.’’

‘‘असं पाहा, तीळ आणि गूळ हे उष्ण प्रकृतीचे पदार्थ आहेत. ते आणि त्यासारखे इतरही पदार्थ म्हणजे बाजरीच्या भाकरी, खिचडा, बाजरीचे गोड दिवे, गाजरं, गाजराचं लोणचं, गाजराचा हलवा, डाळ तांदुळाची खिचडी, सुकामेव्याचे, डिंकाचे लाडू, अळीवाची खीर, इ. खाल्ल्याने बाहेरच्या तापमानाशी आपल्या शरीराचे तापमान जुळवून घेते.’’

‘‘ हो, मला तर गाजराचा हलवा खूप आवडतो आणि डिंकाचे लाडूही.’’ पिंकी म्हणाली.

‘‘ हो, हो, आम्हाला सुद्धा.’’ सगळे एका सुरात ओरडले.

‘‘आजी, आईने संक्रांतीसाठी खास मला काळा फ्रॉक घेतला नि तिला काळी साडी. दुकानातसुद्धा काळे कपडे आणि काळ्या साडय़ाच दिसत होत्या जिकडे तिकडे, का बरं?’’ पिंकीने विचारले.

‘‘अगं, तुम्ही शाळेत शिकलात नं, पांढरा रंग उष्णता परावíतत करतो आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून. त्यामुळे उन्हाळ्यात पांढरे कपडे घातले की उन्हाळा बाधत नाही आणि हिवाळ्यात काळे कपडे घातले की आपल्याला थंडी कमी वाजते, म्हणून तर लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीच्या सणाला काळे कपडे घेतात.’’ आजी म्हणाली.

‘‘आणि हलव्याचे दागिनेपण करतात ना! या गंधारलाही केले होते, मस्त दिसत होता गोडूला गोडूला.’’ पिंकीने गंधारचा पापा घेत त्याचे जरासे लाड करून घेतले.

‘‘अगं, तुम्हालापण केलं होतं हे सगळं.’’

‘‘आजी, पण हलवा तर तीळ आणि साखरेचा करतात ना?’’ तेजसच्या मनात वेगळीच शंका होती.

‘‘हो, मला माहीत आहे, माझी आज्जी करायची नं! पांढऱ्याशुभ्र कढईत चमच्या चमच्याने टाकत राहायची. आम्हाला अजिबात हात लावू द्यायची नाही. पाठ भरून यायची तिची, पण त्यापेक्षा हलवा पांढराशुभ्र आणि काटेदार झाला याचाच आनंद जास्त व्हायचा तिला.’’ रीना म्हणाली.

‘‘ते ठीक आहे, पण जर तीळ आणि गूळ खाल्ल्याने थंडी कमी वाजते तर या तीळ साखरेच्या हलव्याचे प्रयोजन काय? आणि कोणी शोधून काढला हा हलव्याचा वेळकाढू प्रकार?’’ तेजसची शंका रास्त होती.

‘‘अरे, हा सारा हौसेचा मामला, तो कोणी शोधून काढला माहीत नाही. पण ज्यानं काढला त्याला दाद दिली पाहिजे, हो की नाही? आता तर फक्त लहान बाळांनाच नाही तर नववधूंनाही किती तऱ्हतरेचे दागिने करतात. स्पर्धासुद्धा असतात त्यांच्या.’’ आजीनं समजावलं.

‘‘एवढंच नाही काही, नव्या नव्या नवरदेवालासुद्धा लॅपटॉप, मोबाईल, आणखी काय काय करतात. मी पाहिलंय नं शेजारच्या वसूताईच्या लग्नात.’’ रीना म्हणाली.

‘‘ हं, हौसेला मोल नाही हेच खरं! बरं ते खाण्यापिण्याचं आणि कपडय़ांचं असू द्या, पण संक्रांत म्हणजे काय आणि ती आत्ताच का करतात हे माहिती आहे का तुम्हाला?’’ आजीचा प्रश्न.

‘‘हो, मी शांगतो, मी शांगतो. तो शुल्य कुठूनतलि कुठेतली प्लवेश कल्तो म्हणून.’’ छोटय़ा गंधारने सगळ्यांकडे बघत घाईघाईनं आपल्या तोतल्या भाषेत सांगून टाकलं. सगळे खो खो हसू लागले.

‘‘अरे वेडय़ा, कुठून तरी कुठे तरी नाही, सूर्य १४ जानेवारीला धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. याच सुमारास उत्तरायण सुरू होतं म्हणजे संक्रमण होतं, म्हणून त्याला ‘मकरसंक्रांत’ असं म्हणतात. बरोबर नं आज्जी?’’ रौनकने सगळ्यांकडे नजर टाकत ऐटीत आपल्याजवळची माहिती पुरवली.

‘‘बरोब्बर! शाब्बास रौनक, अगदी योग्य माहिती दिलीस तू.’’

‘‘आणि दिवसही तिळातिळाने वाढतो म्हणे, माझी आई सांगत होती.’’ रीना कशी मागे राहील.

‘‘हो तर, संक्रांतीपासून दिवस थोडा थोडा मोठा होत जातो आणि रात्र लहान, त्यामुळे आपल्याला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा जास्त मिळत जाते.’’ आजीने स्पष्टीकरण केलं.

‘‘पण मग ते ऊस, गाजर, बोरांचं वाण का काय म्हणतात ते कशाला देतात, मला मुळीच आवडत नाही ते खायला.’’ पिंकीनं तक्रारीचा सूर लावला.

‘‘अगं, आपला देश कृषिप्रधान आहे की नाही?’’

‘‘हो, हो, कृषिप्रधान म्हणजे भरपूर शेती असलेला आणि मुख्य उद्योग शेती असलेला, ना आजी?’’ तेजसचा सवाल.

‘‘हो, पण आता कुठे राहिलीय शेती. सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत सगळीकडे.’’ आजीनं वरकरणी हो म्हटलं तरी मनोमन उसासल्याशिवाय राहिली नाही ती.

‘‘ते असू दे, पण त्या गाजर बोरांचं..’’ पिंकीनं पाठपुरावा सुरूच ठेवला.

‘‘अगं, या दिवसांत शेतीमध्ये हे सर्व तयार झालेलं असतं. ते आरोग्यदायी तर असतंच, मग आमच्या शेतातला वानवळा म्हणजे नमुना पाहा, तुमच्याकडचा आम्ही घेतो असं म्हणत एकमेकांमध्ये आदानप्रदान सुरू झालं असावं. आपण आपल्याकडे केलेला एखादा पदार्थ शेजारी देतो की नाही तसंच हे.’’ आजीने तिची तक्रार मिटवून टाकली.

‘‘अस्सं होय, पण आजी, या बायका हळदीकुंकवाला त्या प्लास्टिकच्या नाही तर स्टीलच्या लहानमोठय़ा वस्तू कशाला देतात एकमेकींना. आमच्या घरात कित्ती जमा झाली आहेत, कामवाल्या मावशीसुद्धा नक्को म्हणतात.’’ रीनाचा मुद्दा बरोबरच होता.

‘‘अगं, संक्रांत म्हणजे पर्वकाळ, या काळात दानधर्म करावा असं म्हणतात, पण दान करणं म्हणजे आपल्याकडे जे आहे ते गरजू व्यक्तींना देणे ही त्यामागची संकल्पना. त्याला धार्मिकतेची जोड दिली की लोक ती गोष्ट श्रद्धेने करतातच. पण आता होते काय की, मूळ उद्देश राहतो बाजूलाच आणि कर्मकांडालाच प्राधान्य दिलं जातं.’’

‘‘पण मग करावं तरी काय?’’ तेजसनं विचारलं.

‘‘अरे, आपल्या आजूबाजूला खूप गरजू लोक असतात. कामवाली बाई, वॉचमनकाकांची बायका-मुलं, दवाखान्यातील गरीब रुग्ण, विद्यार्थी, इ. त्यांना द्यावे, म्हणजे दान सत्पात्री पडेल.’’

‘‘एकदम सही.. आपण या वेळेस आपल्या वॉचमनकाकांच्या मुलाला शाळेसाठी मदत करू, सर्वानी एकमतानं ठराव पास केला.

‘‘बरं पण आजी, हा संक्रांतीचा सण फक्त आपल्या महाराष्ट्रातच करतात का?’’ सोहमनं विचारलं.

‘‘छे, छे, हा सण याच वेळी इतर राज्यातही साजरा करतात बरं.’’

‘‘आणि तेही संक्रांतच म्हणतात?’’ रौनकचा प्रश्न.

म्हणजे आपल्यासारखंच ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हणतात?’’ पिंकीनं गोड आवाजात विचारलं.

‘‘अगदी तसंच नाही सोहम. आंध्र, केरळ आणि कर्नाटकात याला ‘संक्रांती’ म्हणतात तर तामिळनाडूत मात्र ‘पोंगल’ म्हणतात. पंजाब आणि हरियाणात ‘लोहरी’ असं म्हणतात. आसाममध्ये याला ‘बिहू’ असे नाव आहे तर उत्तराखंडात ‘उत्तरायणी’ असंही म्हणतात. आणि पिंकी, ‘गोड बोला’ असं म्हणत नसतील तरी गोड बोलावंच नाही का! आणि सूर्याच्या उबदार किरणांना डाळ-तांदुळाच्या खिचडीला किंवा ज्या राज्यात जे पिकतं त्याला जास्त महत्त्व आहे बहुतेक ठिकाणी. उदाहरणार्थ, तामिळनाडूत ‘पोंगल’ या सणाला नवीन तांदुळाचा दुधात शिजवलेला भात मातीच्या मडक्यात घराबाहेर किंवा गच्चीवर शिजवतात. नवीन आलेल्या धान्याचा, सूर्यकिरणांचा आणि निसर्गाचा सन्मान करणं हाच सगळ्यांचा हेतू असतो. बरेच ठिकाणी हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यातील एका दिवशी आपल्या शेतीविषयी, पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे, समजलं. आजीने सविस्तर समजावून दिलं.

‘‘ आणि आजी, पतंगबाजी.. ती कुठे बरं असते?’’ तेजसनं उत्साहात विचारलं.’’

हो तर, गुजरातमध्ये या दिवशी मोठमोठे पतंग महोत्सव होतात. देश-विदेशातील पर्यटक मुद्दाम ते पाहायला येतात. आपल्या महाराष्ट्रातही आता खास त्या दिवशी पतंग उडवतातच.’’

‘‘आजी, आम्ही जाऊ पतंग आणायला?’’ तेजसनं लगेच उठण्याची तयारी केली.

‘‘मला पतंग, पतंग,’’ म्हणत गंधार नाचू लागला.

‘‘हो, हो सर्वाना आणायचे पतंग.’’ आजीने समजावलं. मग आता उठा पाहू. हा घ्या एक एक लाडू, मी नवेद्याचे मघाच काढून ठेवलेत बाजूला आणि हे घ्या पसे पतंग आणायला. चला, पळा, पण सावकाश हो.’’

पण ते ऐकेपर्यंत ती बाळसेना ‘र्हुर्रे’ म्हणत केव्हाच पसार झाली होती.