डॉ. नंदा हरम

‘दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं..’ ही म्हण वाचता वाचता तिचा अर्थ आपल्याला कळतो. आता अळूचं किंवा कमळाचं पान. काय वैशिष्टय़ आहे या पानांचं? येतंय लक्षात? अळूच्या पानाला पाण्याचा थेंब चिकटत नाही. कमळ चिखलात उगवत असलं तरी त्याचं पान किती स्वच्छ असतं! यावर आधारित संस्कृत श्लोक आठवला ना तुम्हाला?

या पानांचा पृष्ठभाग एकतर मेणचट किंवा तेलकट असेल, नाहीतर अतिगुळगुळीत असल्यामुळे त्यावर घाण चिकटत नाही, असं तुमच्या मनात आलं असेल ना? तुमचा विचार योग्यच आहे, पण विज्ञान मात्र वेगळं आहे.

जर्मन वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विल्हेल्म बार्थलोट यांनी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप- थोडक्यात अतिसंवेदनशील सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने सर्वप्रथम निदर्शनास आणले, की या पानांच्या पृष्ठभागावर अतिसूक्ष्म (नॅनोमीटर आकाराचे) उंचवटे असतात. त्यामुळे पानाचा आणि पाण्याच्या थेंबाचा पृष्ठभाग यामध्ये कमीत कमी संपर्क येतो, म्हणूनच पाण्याचा थेंब पानाला चिकटू शकत नाही. याचंच फलित म्हणजे, पानाला घाण किंवा पाणी चिकटत नाही आणि ते स्वच्छ राहतं. पानाचा पृष्ठभाग गुळगुळीत तर नाहीच, उलट खडबडीत आहे. किती विरोधाभास आहे नाही?

या गुणधर्माचा उपयोग शास्त्रज्ञांनी करून घेतला नाही तरच नवल! हीच कल्पना त्यांनी ‘लोटूसन पेंट’ विकसित करताना वापरली. इमारतींच्या बा पृष्ठभागाला नॅनोकणांची रचना असलेला रंग दिला की तो पावसाळ्यात आपोआपच स्वच्छ होतो. कित्ती छान! या खडबडीत (डोळ्यांना दिसत नाही, हे लक्षात ठेवायचं!) पृष्ठभागामुळे त्यावर शेवाळ वाढत नाही. सारखा रंग काढावा लागत नाही, त्यामुळे पैशाची आणि ऊर्जेची बचत होते!

याच धर्तीवर आपल्या आपण स्वच्छ होणाऱ्या काचा तयार केल्या, ज्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये वापरता येतात. पोहण्याच्या पोशाखाचं कापडही याच तऱ्हेने बनविता येतं. म्हणजे कपडे ओले व्हायला नको आणि सर्दीपासूनही संरक्षण! म्हणूनच विज्ञानाच्या नावाने चांगभलं!

nandaharam2012@gmail.com