28 February 2021

News Flash

शोध स्वत:चा

फावल्या वेळेत बसल्या बसल्या ते पेपर घेऊन ओरिगामीतले वेगवेगळे प्रकार करायचे.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची मोकाशी

‘‘एऽऽऽ.. कोलंबी, सुरमई, बोंबील, पापलेट.. मच्छीवाली.. एऽऽऽ मच्छीवाली..’’

सकाळी सातच्या ठोक्याला येणाऱ्या मच्छीवालीच्या आरोळीने शार्वीला जाग आली. ती धावत रूमच्या खिडकीपाशी गेली आणि एकटक ती मच्छीवाली दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे पाहत बसली. तिला एकदम काहीतरी सुचलं. ती धावत हॉलमध्ये गेली आणि शांतपणे पेपर वाचत बसलेल्या आजोबांच्या शेजारी धडामकन् जाऊन बसली.

‘‘काय पिल्ल्या, झाली का झोप?’’ आजोबांनी पेपर बाजूला ठेवला आणि तिला कुशीत घेत म्हणाले.

‘‘आजोबा, सॉल्लिड आयडीया सुचलीये!’’

‘‘फॅन्सीड्रेससाठी का?’’ शार्वीच्या शाळेत फॅन्सीड्रेस स्पर्धा होणार होती. स्पध्रेचा दिवस जवळ येत असल्यामुळे कोणता कॉस्च्युम तयार करायचा यावर काही दिवस घरामध्ये बराच खल चालला होता.

‘‘मी कोळीण बनले तर?’’

‘‘कल्पना चांगली आहे. पण तुझ्या टीचरांनी दिलेल्या लिस्टपकी कुठल्यातरी एका वस्तूचा समावेश तुझ्या कॉस्च्युममध्ये झाला असला पाहिजे असा काहीतरी नियम आहे नं? आणि तोसुद्धा तू बनवलेला!’’ आजोबांनी आठवण करून दिली.

‘‘हो! यंदा ‘ऊ-क-.’ थीम आहे!’’

‘‘हे काय नवीन?’’

‘‘म्हणजे डू-इट-युअरसेल्फ!’’

‘‘मग?’’

‘‘तेच तर सांगतेय! त्या मच्छीवालीची कशी माशांची टोपली आहे, तशी टोपली मी बनवेन. मला लहान आकाराची टोपली येते बनवता, तशी मोठी बनवेन. टोपली आहे टीचरांनी दिलेल्या लिस्टमध्ये. त्यामध्ये मासे ठेवेन आणि टोपली डोक्यावर घेऊन.. सुरमई, कोलंबी.. म्हणेन. टोपलीतून एक एक प्रकारचा मासा काढून दाखवेन.’’ शार्वी लगेच उभी राहून ‘अ‍ॅक्टिंग’ करायला लागली.

‘‘खरे मासे ठेवणार टोपलीत?’’ आजोबा मिश्कीलपणे म्हणाले.

‘‘नाही हो! ‘ओरीगामी’ टोपलीत ‘ओरीगामी’ मासे. वेगवेगळ्या रंगांचे-आकारांचे मासे.’’

‘‘पिल्ल्या, पण बाबा नेमका नाहीये इथे. जमेल का आपल्याला करायला?’’ शार्वीचे बाबा ओरीगामीचे ‘मास्टर’ होते. फावल्या वेळेत बसल्या बसल्या ते पेपर घेऊन ओरिगामीतले वेगवेगळे प्रकार करायचे. त्यांच्या घरामध्येही ठिकठिकाणी ओरिगामीपासून बनवलेल्या वस्तू होत्या. ते पाहून शार्वीलाही आपसूकच या कलेची गोडी निर्माण झाली होती. खरं तर शार्वी फक्त सहावीत होती, पण तिला आता ओरिगामी अगदी छानपकी येत होती.

‘‘आजोबा, डोंट वरी! बाबांनी मला ओरिगामीमधले बरेच प्रकार शिकवलेत.’’

‘‘शार्वी, आता पटापट आवरा आणि शाळेला पळा. वाजले बघ किती! अजून दातही घासलेले नाहीत आपण! संध्याकाळी होमवर्क झाला की लागू या कामाला. परवावर आला की फॅन्सीड्रेस!’’ शार्वीची आई स्वयंपाकघराच्या बाहेर येत म्हणाली.

‘‘शार्वे, तुझ्यासाठी एक कोळीगीत पण रेडी आहे माझ्याकडे!’’ आता आजी स्वयंपाकघरातून बाहेर आली.

‘‘कुठलं गं?’’

‘‘दर्यावरी आमची डोले होडी, घेऊ माशांना डोईवरी, आम्ही हो जातीचे कोली.. पाठ करून घेईन मी ते तुझ्याकडून. दोन-चार ओळी गायल्या की झालं!’’

‘‘आज्जी! तू ग्रेट आहेस!’’ असं म्हणत शार्वीने आजीला जोरात मिठी मारली.

शाळेतून आल्यावर शार्वीने पटापट होमवर्क संपवला, थोडा अभ्यास केला आणि मग ती ओरिगामीच्या कामाला लागली. पुढचे दोन दिवस शनिवार-रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. ते दोन्ही दिवस ती फॅन्सीड्रेस स्पध्रेच्या तयारीसाठी देणार होती. सोमवारी स्पर्धा होती.

शार्वीने आधी एका रद्दीच्या कागदावर टोपली बनवण्याची प्रॅक्टिस केली. दोन-तीनदा ती चुकली. पण एकदा का ती जमल्यावर तिने एका पिवळ्या कागदाची मस्तपकी टोपली तयार केली. आजोबा तिच्या मदतीला होतेच. तिने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे बनवायला शिकवले. मग दोघांनी मिळून भरपूर मासे बनवले.

आई कोळीणीच्या पेहरावाच्या तयारीला लागली. नऊवारी साडी, ओढणी, फुलांची वेणी, नथ वगरे. आजीने शार्वीकडून कोळीगीत बसवून घेतलं. थोडी अ‍ॅक्टिंग शिकवली. चार-पाच वेळा रिहर्सल करून घेतली. रविवारी रात्री व्हॉट्स-अ‍ॅपच्या कॉलवर शार्वीने बाबांनाही एकदा रिहर्सल करून दाखवली. म्हणता म्हणता शार्वीची संपूर्ण तयारी झाली होती.

सोमवारी शाळेच्या सभागृहात फॅन्सीड्रेस स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांपकी कुणी पोलीस बनलं होतं तर कुणी राजा. कुणी जोकर तर कुणी नेता. प्रत्येकाने आपापल्या परीने पेहरावामध्ये डी. आय. वाय. थीम अमलात आणली होती. एकंदरीत स्पध्रेचा माहोल एकदम झक्कास बनला होता.

शार्वीही तिच्या कोळीणीच्या पेहरावात तयार होती. तिचा नंबर जवळ आल्यावर क्लास टीचरांनी तिला विंगेत उभं केलं. तिच्या नावाची घोषणा होताच शार्वी डोक्यावर माशांची टोपली घेऊन स्टेजवर जायला निघाली. पण एकदम ठेचकाळली.. तिची चप्पल तुटली आणि पाय मुरगळून ती खाली पडली. तिची टोपली पडली. मासे विखुरले. तिने पटापट टोपलीत ते मासे भरले. टोपली डोक्यावर घेत तिने तिचा कोळीणीचा पार्ट कसाबसा परफॉर्म केला आणि रडतच ती दुसऱ्या विंगेतून स्टेजमागे गेली.

स्पर्धा संपल्यानंतर कुणासाठीही न थांबता ती धडाधड सभागृहाचा जिना उतरून खाली आली. तिथे उपस्थित पालकांच्या गर्दीत तिचे डोळे आईला शोधत होते. आई दिसताच शार्वी धावत तिच्यापाशी गेली आणि तिने आईला गच्च मिठी मारली. तिला आता रडू आवरेना. आईला तर काहीच समजत नव्हतं. ती शार्वीला सभागृहाच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. दोघी एका टेबलापाशी बसल्या.

‘‘काय झालं, बेटा? रडतेस का अशी?’’ आईने शार्वीला पाणी देत विचारलं.

‘‘आई, मी स्टेजवर पडले गं! माझी चप्पलच तुटली. मला काहीच नीट परफॉर्म नाही करता आलं! आजीने शिकवलेलं गाणं पण नाही म्हटलं!’’

‘‘तुला लागलं का कुठे?’’ शार्वीने तिच्या ढोपरांना खरचटलेलं दाखवलं. तिच्या क्लास टीचरांनी तिला लगेचच औषध लावल्यामुळे रक्त वाहत नव्हतं.

‘‘आई, एवढी तयारी केली होती मी! नवीन चप्पल कशी गं तुटली? शी बाबा!’’

‘‘हो गं, बरोबर आहे तुझं! पण आता झालं ते झालं. रडायचं थांबव बघू आता!’’

‘‘मी रडत स्टेजमागे गेले तेव्हा माझ्या वर्गातले काही जण हसत होते. त्याचं मला खूप जास्त वाईट वाटलं. कुणी पडलं की असं हसतात का? मी आता कुठल्याही स्पध्रेत कध्धी-कध्धी भाग घेणार नाही.’’ शार्वीचं काही केल्या रडणंच थांबत नव्हतं.

इतक्यात शार्वीच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. शार्वीने दचकून पाठीमागे पाहिलं. शाळेच्या मुख्याध्यापिका उभ्या होत्या. त्यांना तिथे पाहून शार्वी आणि तिची आई पटकन उभ्या राहिल्या. शार्वी रडायची कशीबशी थांबली. तिने डोळे पुसले.

‘‘माफ करा, पण मी ऐकलं तुमचं संभाषण. शार्वी, हे घे!’’ शार्वीच्या टोपलीतून पडलेले दोन-तीन मासे स्टेजवरच राहिले होते. मॅडमनी ते शार्वीला परत केले.

‘‘शार्वी, तुझ्या क्लास टीचर सांगत होत्या की तू खूप छान ओरिगामी करतेस म्हणून!’’ यावर शार्वी बऱ्याच वेळानं थोडं हसली.

‘‘आठवडाभराने आपल्या शाळेच्या सभागृहात ओरिगामीचं प्रदर्शन भरणार आहे. मला असं वाटतं की त्यात शार्वीने भाग घ्यावा. अजून प्रदर्शनासाठी नाव नोंदणी सुरू आहे. आपल्या शाळेतच इतका छान कलाकार दडलाय. त्याला तर संधी मिळायलाच हवी!’’ मुख्याध्यापिका शार्वीच्या आईला म्हणाल्या.

‘‘पण वयोमर्यादा?’’ आईची शंका.

‘‘नाही! कुणीही भाग घेऊ शकतं.’’ मॅडम म्हणाल्या.

‘‘नको! मला नाही जमणार! मला काहीच येत नाही.’’ शार्वी धास्तावलेल्या स्वरात एकदम म्हणाली आणि दोन पावलं पाठीमागे सरकली.

‘‘शार्वी, आज स्टेजवर जे घडलं त्यामुळे? एका प्रसंगामुळे जर तू खचून गेलीस, स्वत:ला कमी लेखू लागलीस तर पुढे कशी जाशील? याला ‘सेल्फ-पिटी’ असं म्हणतात. यातून लगेच सावरलं नाही तर आपला न्यूनगंड फक्त वाढत जातो. तुझ्या वर्गातले आज तुला हसले म्हणून तुला वाईट वाटलं. पण त्यांचं त्यांनाच कधीतरी समजेल की कुणाच्या अपयशावर हसू नये! आणि मुळात आज तुझा प्रयत्न पूर्ण होता नं? घडला प्रकार तुझ्या हातातच नव्हता.’’

‘‘शार्वी, तू एवढी पडलीस, तुला नीट परफॉर्म नाही करता आलं तरी मॅडमनी तुझ्यातल्या कलेचा गुण बघ कसा बरोब्बर टिपला आणि तुला ही इतकी चांगली संधी देताहेत.’’ आई शार्वीला समजावत होती.

‘‘शार्वी, आपल्या फॅन्सीड्रेसची काय थीम होती गं?’’ मॅडमचा प्रश्न.

‘‘डू-इट-युअरसेल्फ!’’

‘‘हा डी. आय. वाय फंडा खरं तर हस्तकलेशी किंवा दुरुस्ती कामाशी संबंधित आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यातही या डी. आय. वाय.चा आपण उपयोग करू शकतो. समोर आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, उभं राहण्यासाठी! एकदा तू करून तर बघ! आजचं अपयश विसरून जा. धीट हो. आगे बढो! डू-इट-युअरसेल्फ!’’ मॅडम शार्वीला खूप प्रोत्साहन देत होत्या. त्यामुळे शार्वीला धीर आला.

‘‘मी प्रयत्न करेन. मी नक्की भाग घेईन प्रदर्शनात मॅडम!’’ शेवटी शार्वी म्हणाली. आईलाही ऐकून हायसं वाटलं. मॅडमनी हलकेच शार्वीचा गाल ओढला आणि तिला शुभेच्छा देऊन त्या तिथून निघून गेल्या.

आठवडय़ाने शाळेत ओरिगामीचं प्रदर्शन भरलं. अनेक ओरिगामी कलाकारांनी कागदापासून बनवलेल्या निरनिराळ्या कलाकृती साकारल्या होत्या. शार्वीनेही प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, फुलपाखरं यांची एक अख्खी वनराई उभी केली होती. विशेष म्हणजे बाबा इथे नसताना शार्वीने

एकटीनेच सारं बनवलं होतं. प्रदर्शनात

तर ती वयाने सगळ्यात लहान कलाकार होती. त्यामुळे सगळ्यांकडून तिचं विशेष कौतुक होत होतं.

शार्वी अर्थातच खुशीत होती. या ‘डू-इट-युअरसेल्फ’ फंडाने तिला उभं राहायला शिकवलं होतं..

mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:12 am

Web Title: balmaifal article by prachi mokashi
Next Stories
1 लिंबूटिंबू चटकदार : भीम-शिरीखंड व्हाया ग्रीस
2 सर्फिग : माध्यमसाक्षर व्हा!
3 जिमीचे स्वप्न
Just Now!
X