राजश्री राजवाडे-काळे

आज आभा शाळेतून आली ती एकदम खूश होती. तिला असं आनंदाने उडय़ा मारत येताना पाहून आईला खूप आनंद झाला. कारण आज बऱ्याच दिवसांनी आभा शाळेतून येताना खूश होती. चार महिन्यांपूर्वी तिच्या बाबांची बदली झाल्याने अचानक नवं शहर, नवी शाळा या सगळ्याला सामोरं जावं लागल्याने चौथीतली आभा काही खूश नव्हती. आज मात्र आभा उत्साहाने सांगू लागली, ‘‘आई, आज शाळेत काय झालं माहित्ये का? आज शाळेत एक दादा-ताई आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की रंग खेळताना केमिकल्सवाले रंग वापरू नका. आणि मग त्यांनी आम्हाला घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते शिकवलं. आई, आज होळी आहे आणि उद्या धूलिवंदन, म्हणजे रंग खेळायचेत आपल्याला. आज सामान आणून रंग बनवायला हवेत.’’

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल

आभाला मध्येच अडवत आई म्हणाली, ‘‘अगं हो हो, जरा दम खाशील की नाही? शांत हो जरा.’’ पण आभाला वेळ थोडाच होता शांत बसायला. तिने तिची शाळेची बॅग उघडून एक कागद बाहेर काढला आणि म्हणाली, ‘‘हे बघ, मी यात लिहून ठेवलंय काय सामान लागतं ते.’’ ती वाचू लागली- ‘‘लाल रंगासाठी बीट, टोमॅटो, हिरव्या रंगासाठी पालक, कोथिंबीर, पिवळ्या रंगासाठी हळद, केशरी रंगासाठी झेंडूची फुले.. आई, आज हे सामान आण ना. सोसायटीत रात्रीच्या होळीची तयारी चालू आहे. मी पाहिलं आत्ता येताना.’’ आई हसून म्हणाली, ‘‘नक्की आणेन. आपण घरीच रंग बनवू. ते बाजारातले कृत्रिम रंग नकोच आपल्याला.’’

आभाही उत्साहाने म्हणाली, ‘‘मी या रंगानी खूप खूप खेळेन उद्या. मज्जा येईल..’’ पण असं म्हणतानाच आभाचा चेहरा पडला. ‘‘पण मी कोणासोबत खेळू? कोणाला लावू मी बनवलेले रंग? त्यापेक्षा नकोच बनवायला रंग..’’ असं म्हणून तिने तो कागद चुरगळून फेकून दिला. आईला खूप वाईट वाटलं. चार महिने झाले होते त्यांना या सोसायटीत राहायला येऊन; पण सोसायटीतल्या मुली आभासोबत मैत्री करत नव्हत्या. याचं कारण बहुधा आभाचा रंग! ती मुलींसारखी अजिबातच गोरी नव्हती. एकदा मुलींनी तिला खेळायला घेतलं होतं, ‘जास्तीची मेजॉरिटी’ करताना हातावर हात ठेवले गेले तेव्हा सगळ्या गोऱ्या हातांपुढे आभाचा हात उठून दिसत होता. ते पाहून मुली खुसफूस करू लागल्या. गॅदरिंगच्या वेळेस काळोख झाला तेव्हा कुणीतरी म्हणालं, ‘‘आता काळी आभा काळोखात दिसणारच नाही.’’ एकमेकांना खेळण्याकरता हाका मारताना आभाला कुणीच बोलवायचं नाही. ती स्वत:हून खेळायला गेली तरी तिला खेळायला घ्यायचं की नाही, हे सगळ्या मिळून ठरवायच्या.

आईने नेहमीप्रमाणे समजवायचा प्रयत्न केला- ‘‘आपण जसे आहोत त्याबद्दल दु:ख करत बसयाचं नाही. बा रंग महत्त्वाचा नसतो. आपला आतला मनाचा रंग महत्त्वाचा असतो. आणि तुझ्या मनाचा रंग सगळ्यांना दिसला की बघ- सगळ्या कशा छान मैत्रिणी होतील तुझ्या.’’

‘‘पण सगळ्यांना कधी दिसेल माझ्या मनाचा रंग?’’ आभाच्या या प्रश्नाचं उत्तर आईकडे नव्हतं.

आईने सगळं सामान आणलं. दोघींनी मिळून रंग बनवले आणि डब्यांमध्ये भरून ठेवले. बाबा ऑफिसमधून आल्यावर ते रंग बघून बाबा म्हणाले, ‘‘उद्या आपण याच रंगांनी खेळायचं बरं का!’’

दुसऱ्या दिवशी सकाळी आभा गॅलरीतून सारखी डोकावून बघत होती, की कुणी खेळायला आलंय का! इतक्यात तिला निकी दिसली. तिने छोटय़ा बादलीतून भरपूर रंगीत पाणी आणलं होतं. आर्याही आली. तिच्या हातात पिचकाऱ्या होत्या. जाईसुद्धा पिचकारी घेऊन आली होती. पण अमिषा आली आणि त्यांचं भांडणच सुरू झालं. आभा गॅलरीतून सगळं ऐकत होती. निकी आणि आर्या ओरडत होत्या, ‘‘तू ठरवल्याप्रमाणे काहीच आणलं नाहीस. तू चीटिंग केलीय अमिषा.’’ जाईसुद्धा ओरडली, ‘‘मी आणि निकी पाणी आणणार आणि तू आणि आर्या रंग आणणार, हे आपण परवापासूनच ठरवलेलं आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही पाणी आणलंय, आर्यानेही रंग आणलेत, तूच काही आणलं नाहीस. आता ना तू येऊच नको आमच्यात रंग खेळायला.’’ अमिषाने त्यांना सांगायचा प्रयत्न केला, ‘‘अगं, माझे आई-बाबा ऑफिसमधून खूप उशिरा आले, त्यांना नाही जमलं रंग आणायला.’’

‘‘मग आत्ता घेऊन ये रंग,’’ असं म्हणून जाई, आर्या आणि निकी इतरांसोबत रंग खेळायला निघूनही गेल्या. अमिषा रडत रडत घरी जाण्याकरता सोसायटीत शिरली. आभा पटकन गॅलरीतून आत आली आणि तिने पटापट बनवलेल्या रंगांच्या डब्या घेतल्या आणि जिन्यात जाऊन रडणाऱ्या अमिषाला रंग देत म्हणाली, ‘‘तुला रंग हवेत ना? हे बघ, मी घरी बनवलेत. तुला हवे असतील तर यातले घेऊ शकतेस, आपल्याला काल शाळेत सांगितलं ना, तसेच बनवलेत.’’अमिषाला खूप आनंद झाला. ती आभाचा हात धरून तिला सोबत नेत म्हणाली, ‘‘आपण दोघी खेळायचं या रंगांनी? अगं, माझे बाबा थोडय़ा वेळाने रंग आणतो म्हणालेत खरं तर!’’ आभाला आनंद झाला. ‘‘आई, मी आणि अमिषा रंग खेळायला जातोय,’’ असं सांगून ती खाली पळालीसुद्धा. सोबत बिटापासून बनवलेला लालचुटूक रंग भरलेली पिचकारीसुद्धा घेतली. दोघी वेगळ्या रंगाने खेळताना पाहून इतर सगळ्या आल्याच. आणि कुजबुजू लागल्या, ‘‘ए, शाळेत सांगितलं ना आपल्याला असे रंग बनवायला!’’, ‘‘किती छान! आभा तू अगदी तस्सेच बनवलेत रंग.’’ असं म्हणता म्हणता आभाला भरपूर रंगवलं. आता आभाही त्यांच्याकडच्या रंगांनी रंगून गेली होती. त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्यात खेळत होती. ‘‘ए आभा, माझी बेस्ट फ्रेंड आहे हं आता.’’ अमिषा आभाचा हात घट्ट धरत म्हणाली. रंगलेल्या सगळ्यांचा रंग आता अगदी सारखा दिसत होता. कुणीच गोरं दिसत नव्हतं की कुणी काळं दिसत नव्हतं. पण मनाचा रंग मात्र प्रत्येकीचा आपला आपला वेगळा होता.

shriyakale@rediffmail.com