20 October 2019

News Flash

नीलपंखी

नीलपंखी घाबरून पाण्यात अदृश्य झाला.

|| विद्या डेंगळे

ही गोष्ट आहे एका तळ्यातल्या माशाची. जुईच्या बागेत एक छोटासा कमळांचा तलाव होता. कमळाची मोठी गोल कडेने कातरलेली पानं पाण्यात पसरलेली असायची. त्यावर कधी तरी बेडूक बसलेला असायचा. अचानक पाण्यातून एखादं गुलाबी कमळ ताठपणे बाहेर यायचं आणि त्या कमळाला पाहून जुई आनंदून जायची. जुईने पाण्यात डास होऊ नयेत म्हणून तळ्यात गप्पी मासे सोडले होते. कमळं, गप्पी, आणि बेडूक हा जुईचा मित्रपरिवारच होता.

एक दिवस नेहमीप्रमाणे जुई गप्पींना बिस्किटाचा चुरा द्यायला गेली आणि तिला ‘तो’ दिसला. फत्ताडय़ा तोंडाचा, निळसर रंगाचा, गोल गोल डोळ्यांचा तो मासा पाण्याच्या बाहेर तोंड काढून त्याचे दोन पंख हलवत एकाच जागी तरंगताना दिसला. जुईने त्याला पाहिलं आणि ती आंनदाने टाळ्या पिटू लागली. तिची आई तिला म्हणाली, ‘‘अगं, मासा काय प्रथमच बघते आहेस का? नाचायला काय झालं?’’

‘‘अगं आई, आपल्या या छोटय़ाशा तळ्यात एवढा मोठा मासा मी प्रथमच पाहतेय. हा कुठून आला असेल बरं इथे? नक्की देवानेच पाठवला असणार!’’ जुईने हात जोडून देवाचे आभार मानले.

बस. त्या दिवसापासून जुईची आणि त्या माशाची मत्री झाली. त्याला सारखं मासा म्हणणं तिला बरं वाटेना. तिने खूप डोकं खाजवून त्याचं नाव ‘नीलपंखी’ ठेवलं. तिला तो परीकथेतलाच वाटत होता.

थोडय़ाच दिवसांत नीलपंखीची आणि जुईची गट्टी जमली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण ते फक्त त्यांचं गुपित होतं.

‘‘नीलपंखी, तू रोज पाण्यावर येऊन काय पाहतोस? तुला पाण्यात काही त्रास आहे का?’’ जुईने त्याला विचारलं.

‘‘अगं, खाली चिखलात एकटय़ानं राहायचा कंटाळा येतो. तसं गप्पा मारायला गप्पी असतात म्हणा! पण ते इतके गप्पिष्ट आहेत की मी बोअर होतो. एक दिवस वर आलो आणि तू दिसलीस. वर आकाश किती छान आहे. रंगीत फुलं, विविध पक्षी पाहून बरं वाटलं. नाही तर खाली नुसता चिखल.’’ नीलपंखी त्याचे पंख आणि शेपटी हलवत म्हणाला.

‘‘पक्षी वगैरे सगळं ठीक आहे, पण तुला सावध राहायला पाहिजे त्या खंडय़ापासून. खंडय़ाला मी त्या झाडावर बसलेला पाहिला काल.’’ जुई म्हणाली.

‘‘अरे बापरे! काय गं, ते झाडावर उलटे लटकलेले कोण आहेत? मी पाण्यात काय करतोय ते पाहत असतात असंच सारखं वाटतं. मला काही ते आवडत नाहीत.’’ नीलपंखी म्हणाला.

‘‘हं.. ती होय? ती वटवाघळं!  हे सगळे तुझ्यासाठी यमराज आहेत. सांभाळ हं!’’ जुईने नीलपंखीला सावध केलं.

नीलपंखी घाबरून पाण्यात अदृश्य झाला. पुढचे काही दिवस नीलपंखी जुईला दिसलाच नाही. तिच्या काळजात चर्र झालं. ‘कोणी उचलला असेल बरं त्याला? अलीकडे खंडय़ा दिसला होता. त्यानेच उचलला असणार.’ जुईच्या मनात आलं. ती अस्वस्थ झाली.

उन्हाळा सुरू झाला होता. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले होते. जुईला तळ्यापाशी नीलपंखीला भेटायला वेळच मिळत नव्हता. एक दिवस शाळेतून आल्याबरोबर ती तळ्यापाशी गेली आणि नीलपंखी वर आला. त्याच्याशी गप्पा मारता मारता जुई रमून गेली आणि अचानक एका बेडकाने तिच्यावर उडी मारली. जुई पाण्यात पडली आणि कमळाच्या देठात जाऊन अडकली. त्यातून सुटायला ती धडपडत असताना ‘वेलकम वेलकम’ म्हणत नीलपंखी तिच्या जवळ आला, म्हणाला, ‘‘घाबरू नकोस, मी आहे ना!’’

‘‘वेलकम म्हणे! मी अडकलेय या चिखलात आणि तू मला वेलकम करतो आहेस! शी! इथे काहीच नाही. नुसता चिखल आणि बुळबुळीत वनस्पती आहेत. मला वाटलं होतं, समुद्रात असतात तसे सुंदर सुंदर मासे आणि वनस्पती असतील. इथे नुसता चिखल आहे आणि हे बारके गप्पी! मला नाही इथं थांबायचं,’’ जुई त्रासून म्हणाली.

नीलपंखीचं तळं खूप खोल नव्हतं म्हणून जुई कशीबशी वर आली, पण चिखलाने माखलेली. नशीब त्यावेळी घरात कोणी नव्हतं म्हणून कोणाला जुईचा हा पराक्रम कळला नाही. अभ्यासामुळे जुई काही दिवस नीलपंखीला विसरली.

मार्च महिना होता. परीक्षा संपत आली होती. उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत होती. तळ्यातलं पाणीही कमी होत चाललं होतं. दुष्काळ पडण्याची चिन्हं दिसत होती. कमळं चिखलातच येतात म्हणून कोणी तळ्यात पाणी सोडत नव्हतं.

 

जुईच्या घरचे सगळे तिला सुट्टी लागल्यामुळे गावी जायची तयारी करत होते. पण जुईचा पाय काही घरातून निघत नव्हता. तिला काळजी होती नीलपंखीची. ‘पाणी आटून गेलं तर नीलपंखी काय करेल? खंडय़ा नक्कीच त्याला धरेल.’ तिच्या मनात सारखी हीच भीती होती. पण तिला गावी जावंच लागलं. रात्री दमून भागून सगळे झोपले, पण जुईच्या मनात नीलपंखीचेच विचार घोळत होते.

‘‘जुई मला वाचव. जुई मला वाचव. पाणी संपतंय. खंडय़ा झाडावर बसलाय. वाकडी मान करून माझ्याकडे बघतोय. प्लीज काही तरी कर ना! पाणी सोडा ना कोणी तरी तळ्यात.’’ नीलपंखीचा आक्रोश ऐकून जुई रडायला लागली.

म्हणाली, ‘‘निळू, नीलपंखू, घाबरू नकोस, मी माझ्या अश्रूंनी तुझं तळं भरेन.’’ पण तळं काही भरेना. नीलपंखी चिखलात तडफडत होता. वटवाघळं डोळे वटारून पाहत होती. घुबडही सावज पकडायच्या तयारीत झाडावर बसलं होतं. एरवी जुईला आवडणारा खंडय़ा आता तिला यमराज वाटत होता. खंडय़ा नीलपंखीकडे झेपावणार इतक्यात जुईने त्याला हातपाय झाडून हाकलले. खंडय़ा ओरडत उडून गेला.

आकाशात ढग गडगडू लागले. पावसाचे थेंब पडायला लागले. तळं भरू लागलं. पाण्यात गप्पींचा सुळसुळाट सुरू झाला. जुईला जाग आली, पण ती होती गावाला. आणि तिला पडलं होतं स्वप्नं. जुईचं मन काही गावी रमणार नव्हतं. ते जरी स्वप्नं होतं तरी खरं झालं असेल तर!

जुई हट्ट करून घरी परतली. तिच्यामुळे दुसऱ्याच दिवशी सगळे घरी आले. जुई धावतच तळ्याकडे गेली.

‘‘नीळू, नीलपंखू..’’ जुईने तिच्या मित्राला हाक मारली.

नीलपंखी तिचीच वाट पाहत होता. तो त्याचं फत्ताडं तोंड उघडत पंख आणि शेपटी हलवत पाण्यावर आला. त्याच्या भोवती असंख्य गप्पींनी फेर धरला.

ते पाहून जुईच्या आई-बाबांचेही डोळे भरून आले.

vidyadengle@gmail.com

First Published on September 22, 2019 12:40 am

Web Title: balmaifal article frog fish abn 97