29 January 2020

News Flash

मित्र गणेशा!

अमेरिकेत राहणारा जय या वर्षी प्रथमच भारतातल्या आजी-आजोबांकडे गणपतीच्या दिवसांत आला होता.

(संग्रहित छायाचित्र)

अलकनंदा पाध्ये

अमेरिकेत राहणारा जय या वर्षी प्रथमच भारतातल्या आजी-आजोबांकडे गणपतीच्या दिवसांत आला होता. बहुतेक डिसेंबर महिन्यात त्याची आई-बाबांबरोबर आजी-आजोबांकडे फेरी व्हायची. त्यामुळे मुंबईतला गणपतीचा सण त्याने प्रत्यक्ष पाहिला नव्हता. यावेळी आईचे ऑफिसचे काम नेमके याच दिवसांत इथे निघाले म्हणून त्याला इथली गणपतीची मज्जा बघता येणार होती. ऑस्टीनला तो राहायचा. तिथे आजूबाजूला कुणाच्या घरी गणपती आणत नव्हते. इथे मात्र आजोबा आणि त्यांच्या सोसायटीत घरोघरी गणपती बाप्पा येणार म्हणून खूप गडबड चालली होती. त्यामुळे सुरुवातीला तर जय एकदम भांबावूनच गेला होता. आजी आणि मामीने लाडू आणि चकल्या असा मस्त मस्त खाऊ केला होता. गणपतीबाप्पाबरोबरच नातूही येणार म्हणून आजीला डब्बल आनंद झालाय असं आजोबा म्हणत होते. रात्री मामा, मल्हारदादाबरोबर जयसुद्धा गणपतीसाठी डेकोरेशन करायला बसला. गणपतीसाठी ते कागदाच्या फुलांचं घर तयार करत होते. ‘याला मखर म्हणतात,’ असं मल्हारदादाने सांगितलं. जयला खरं तर पेपर क्विलिंगची फुलं वगैरे काही करता येत नव्हती, पण त्यांना कुठे गम दे, कुठे कागद चिकटव अशी जमेल ती मदत करत तिथे लुडबुडत होता. आजूबाजूच्या घरांमध्येही अशीच गडबड चालू होती. सकाळी सगळ्यांबरोबर जाऊन बाप्पाला घरी आणताना रस्ताभर ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर करताना त्याला चेव चढला होता. गणपती बाप्पाची छोटीशी मूर्तीही त्याला खूपच आवडली. सगळ्यात जास्त मज्जा आली ती गणपतीची प्रेअर म्हणजे आरती म्हणताना.. मामाने गणपतीची पूजा केल्यावर घरातले सगळे जण आणि त्याचे बरेच फ्रेंडस् गणपतीच्या आरतीसाठी जमले होते. जयला आरती म्हणता येत नसली तरी त्यानेही हौसेने रेशमी रिबन बांधलेली झांज गळ्यात अडकवली होती. जमेल तशी ती वाजवत सगळ्यांचे पाहून तो ‘जयदेव.. जयदेव’ म्हणत सगळ्यांच्या सुरात सूर लावत होता. आरतीनंतरचा प्रसाद वाटायचं खूप महत्त्वाचं काम मामानं जय आणि मल्हारदादावर सोपवलं होतं. गणपतीसमोर त्याच्या आवडीच्या मोदकांचे अख्खे ताट ठेवले असूनही त्यातला एकही मोदक त्याने खाल्ला नाही, असा जयला प्रश्न पडला. पण त्याने मात्र जेवताना दोन-तीन मोदक फस्त केले. संध्याकाळीसुद्धा खूप माणसं त्यांच्याकडे दर्शन घ्यायला येत होती. अमेरिकेहून आल्यामुळे त्याची आणि आईची विशेष चौकशी करत होते.

रात्री हॉलमध्ये झोपलेल्या जयला बराच वेळ झोपच येत नव्हती. देवबाप्पासुद्धा आपल्याबरोबरच या घरात राहतोय, ही कल्पनाच त्याच्या दृष्टीने भारी होती. समोरच्या गणपतीचे आपल्या परीने जमेल तसे तो निरीक्षण करत होता. बघता बघता तो छोटासा बाप्पा त्याला आपला मित्रच वाटायला लागला. बेडवर पडल्या पडल्या त्याने मनातल्या मनात त्याच्या स्कूलमधल्या कितीतरी गमतीजमती शेअर केल्या. जयचा पुढचा दात हल्लीच पडल्याने सगळे त्याला त्यावरून चिडवायचे. पण त्याच्या लक्षात आलं की बाप्पाचासुद्धा एक दात तुटलाय. तो कुठे बरं धडपडला असेल? असा विचार करता करता केव्हातरी त्याला झोप लागली. झोपेतही त्याला बाप्पाचीच स्वप्ने पडत होती. सकाळी उठल्याबरोब्बर त्याने मखरातल्या गणपतीकडे पाहून ‘गुड मॉìनग’ म्हटले. बाप्पाही त्याच्याकडे पाहून हसत असल्याचं त्याला वाटलं. पुन्हा बाप्पाची पूजा.. आरतीत तो मनापासून सामील झाला. पण संध्याकाळी त्याला जवळच्या लेकमध्ये सोडणार- त्याचे विसर्जन करणार हे समजल्यावर मात्र कालपासूनचा त्याचा मूड एकदम बिघडला. त्याने एकदम जेवणावर बहिष्कारच टाकला. सगळेजण त्याची समजूत घालायला लागले.

‘‘जय, जेवायला चल बाळा.. बघ हं तुझे आवडते मोदक आता थोडेसेच राहिलेत. संपून गेले तर मग तुला मिळणार नाहीत.’’ आज्जीने जयला मोदकांची लालूच दाखवायचा प्रयत्न केला.

‘‘मला मोदक नकोत. जेवायचं पण नाही. प्रॉमिस करा की तुम्ही गणपती बाप्पाला कुठे नेणार नाही. त्याचे विसर्जन की काय करतात तसलं काहीसुद्धा करणार नाही. आता तो माझा फ्रेंड आहे. त्याला जर इथेच ठेवणार असलात तरच मी जेवणार.’’ जयने पाय आपटत आपल्या अटी सांगितल्या आणि काहीसं आठवून पुढे म्हणाला.. ‘‘आणि तुम्हाला इथे नको असेल तर आम्ही त्याला ऑस्टीनला आमच्या घरी घेऊन जातो. तिथे आमचं घर खूप  मोठ्ठं आहे. त्याला एक रूमपण देऊ. तो रोज माझ्याशी खेळेल. गप्पा मारील. हो की नाही गं आई? आपण आत्ताच्या आत्ता बाबाला स्काइपवरून विचारू हवं तर..’’ जयच्या चिमुकल्या मेंदूला तेवढय़ातल्या तेवढय़ात अनेक कल्पना सुचल्या. त्याने आईकडे होकारासाठी बघितले. पण आईनेसुद्धा नकाराची मान हलवल्यावर मात्र जयला रडूच कोसळले. त्याला वाटले, ही मोठी माणसं दोन दिवस बाप्पाचे एवढे लाड करून नंतर त्याला असे कसे काय पाण्यात सोडून देतात? मखरातल्या गणपतीकडे बघून पुन:पुन्हा त्याला वाईट वाटत होतं. अखेर आजीने त्याला मांडीवर घेत समजूत काढताना म्हटलं, ‘‘जय बाळा, मला सांग, तू बाबाला सोडून थोडे दिवसासाठी इथे आमच्याकडे आलायस तर आम्ही तुझे इथे खूप लाड करतोय आणि तुलाही आमच्याबरोबर मज्जाही वाटतेय. पण समजा, आम्ही तुला इथेच कायमचं राहायला सांगितलं तर तू तुझ्या आई-बाबांना सोडून इथे राहशील का सांग? तुला आवडेल का?’’

जयने नकार दिल्याबरोबर ती पुढे म्हणाली, ‘‘अरे, गणपती बाप्पासुद्धा आपल्या आई-बाबांना सोडून आपल्याकडे एकटा आलाय. पण त्याला इथेच कायमचं ठेवलं किंवा तुझ्याबरोबर ऑस्टीनला पाठवलं तर त्याला आणि त्याच्या आई-बाबांनापण एकमेकांची आठवण नाही का येणार? तुझा फ्रेंड असा नाराज झाला तर तुला आवडेल का? अगदी खरं खरं सांग. आणि तू जसा दरवर्षी इकडे येतोस नं तसंच तोही आता विसर्जन केलं तरी पुढच्या वर्षी आपण पुन्हा आपल्याकडे घेऊन येतोच की नाही? म्हणूनच तर विसर्जन करताना आपण सगळे मिळून त्याला काय बरं सांगतो? मल्हारदादा. तू सांग पाहू..’’

‘‘गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’’

आजीचे म्हणणे पटल्याने जयनेही मल्हारच्या सुरात सूर मिसळला..

alaknanda263@yahoo.com

First Published on September 15, 2019 12:03 am

Web Title: balmaifal article ganpati celebration abn 97
Next Stories
1 कार्टूनगाथा : कवडीचुंबक म्हातारा!
2 ज्वलनशील पदार्थाची गंमत
3 गजाली विज्ञानाच्या : आलिया भोगासी, असावे सादर!
Just Now!
X