12 July 2020

News Flash

पर्स!

झोका खेळताना बाजूला ठेवली, पण घरी जाताना मी विसरून गेले होते. आता आठवलं तर परत खाली आले, पण पर्सच नाहीये इथे.’’

(संग्रहित छायाचित्र)

राजश्री राजवाडे-काळे

चिंगीने कपाट उघडलं आणि खणात कोंबलेलं तिचं सामान भराभर बाहेर काढलं. त्यात होतीच आभाळासारख्या निळ्याशार रंगाची सिंड्रेलाचं चित्र असलेली छोटुशी पर्स! आईने चिंगीच्या हातावर दहा रुपयांची नोट ठेवली आणि म्हणाली, ‘‘जा गं चिंगे, शेजारच्या दुकानातून बिस्किटं घेऊन ये पटकन.’’ चिंगीला वाटलं, हे दहा रुपये त्या छानशा पर्समध्ये ठेवून ती पर्स हातात अडकवून दुकानात जावं. म्हणून चिंगीनं ती पर्स काढली. पण.. हा ‘पण’ मनात आला आणि तिने ती पर्स परत त्या खणात ढकलून दिली आणि गुपचूप हाताच्या मुठीत दहा रुपयांची नोट घट्ट पकडून बिस्किटं आणायला गेली. आई हे सग्गळं पाहत होती. आईला खूप दु:ख झालं आणि मनातून रागही आला. पण तो राग तिने मनातल्या मनात दाबून टाकला आणि ठरवलं की, काही बोलायचं नाही चिंगीला, फक्त बघायचं, की चिंगी पुढे काय करते.

झालं असं होतं की, चिंगीची आई त्यांच्या वस्तीच्या बाजूच्या मोठय़ा सोसायटीत स्वयंपाकाच्या कामाला जायची. त्यातल्याच एका घरी चिंगीच्याच वयाची छोटी सीया होती. सीयाचे आई-वडील दिवसभर ऑफिसमध्ये आणि सीया तिच्या आजी-आजोबांबरोबर. चौथीतल्या सीयाचे भरपूर लाड व्हायचे. सीयाकडे वेगवेगळे खेळ, बाहुल्या, सायकल्स, सग्गळं काही होतं. चिंगीच्या शाळेला सुट्टी असली की, आई सीयाकडे कामाला जाताना चिंगीलाही घेऊन जायची. सीयाच्या सोसायटीतल्या मुलीही चिंगीला ओळखत होत्या आणि त्या तिला खेळायलाही घ्यायच्या त्यांच्यात. शेजारीच सोसायटी असल्यामुळे चिंगी एकटीसुद्धा जायची झोका वगैरे खेळायला. एकदा आई कामं आटोपून घरी जात होती. इतक्यात सीया काहीतरी शोधताना दिसली तिला. इतक्यात सीयाने विचारलंच, ‘‘मावशी, खेळायला येताना सिंड्रेलाची ब्ल्यू पर्स आणली होती. झोका खेळताना बाजूला ठेवली, पण घरी जाताना मी विसरून गेले होते. आता आठवलं तर परत खाली आले, पण पर्सच नाहीये इथे.’’

‘‘बरं बरं, असेल इथंच कुठंतरी, तू शोध हं!’’ असं म्हणून आई पटापट घरी आली. चिंगीच्या बाबांना, दादाला आणि चिंगीला जेवायला वाढायचं होतं. रात्री आवराआवर करताना आईला जाणवलं की, चिंगी तिच्या खणात सारखी खुडबुड करतेय. आईनं दुर्लक्ष केलं, पण निजानीज झाल्यावर दिवा बंद करायच्या आधी तिच्या काय मनात आलं कोण जाणे, तिने सहज चिंगीचा खण पाहिला तर त्यात सीयाची ब्ल्यू पर्स! आईला खूप राग आला. वाटलं, चिंगीला उठवून चांगले दोनचार धपाटे घालावे पाठीत. तिला खूप वाईटही वाटलं, चिंगीने असं वागावं? आईला माहीत होतं की, सीयाच्या वस्तू चिंगीला आवडतात आणि जुन्या झाल्यावर मिळतातही; पण ही सुंदर नवीकोरी पर्स.. आईने एक निश्चय केला, ही पर्सच चिंगीला अद्दल घडवेल आणि आता त्याचप्रमाणे घडत होतं. आठवडा झाला होता ती पर्स आणून, पण ती पर्स काही तिला वापरता येईना. वापरणार तरी कशी आणि कुठे? ती पर्स बघून आई विचारणार आणि सीयाही अचानक वाटेत भेटू शकते

आणि तिला दिसू शकते ती पर्स. म्हणूनच इतकी छान पर्स मिळूनही चिंगीला ती वापरताच येईना. आईला माहीत होतं की असंच होणार. म्हणून रागवण्या आणि मारण्यापेक्षा तिचं तिलाच कळू दे, असं आईनं ठरवलं.

आज संध्याकाळी चिंगीला तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचं होतं. चिंगी छान तयार झाली. आईने भेटवस्तू म्हणून छान पेन घेतलं मैत्रिणीला द्यायला. चिंगीच्या मनात आलं, ‘हे पेन आपण ‘त्या’ पर्समध्ये ठेवून पर्स हातात अडकवून घेऊन गेलो तर? किती मज्जा! शिवाय या मैत्रिणीच्या वाढदिवसाला त्या मोठय़ा सोसायटीतली सीया येणारच नाहीये आणि शेजारीच तर जायचंय. ती पर्स सीयाला दिसणार नाही.’ हा विचार करत पर्स घेण्याकरिता चिंगी घुटमळू लागली, पण.. पण आईपासून ती पर्स कशी लपवायची? आई तर माझ्याकडेच बघतेय.’ आई ताड्कन उठली आणि चिंगीच्या खणातून ‘ती’ पर्स काढली आणि म्हणाली, ‘‘ही पर्स न्यायचीय ना तुला? घे ही.’’ आता मात्र चिंगीला रडू फुटलं. चिंगी रडत म्हणाली, ‘‘ही पर्स मला झोक्याजवळ सापडली म्हणून मी आणली. मला माहीतपण नव्हतं ती कुणाची आहे; पण नंतर मी सीयाला पर्स शोधताना पाहिलं.’’

‘‘मग तेव्हा का नाही दिली तिला परत?’’ आई विचारत होती, पण चिंगीजवळ उत्तरच नव्हतं. ती अजूनच जोराजोराने रडू लागली.

‘‘तुला खूप आवडली म्हणून ठेवावी वाटलं ना तुला? अगं पण हे बरोबर वागलीस का तू? मला सांग, असं खोटं वागल्याने तुला तरी आनंद मिळाला का त्या पर्सचा? तुला भीती होती ना की, सीया ही पर्स बघेल? तुला वापरता आली का ही? नाही ना. सतत घाबरून पर्स लपवायची, हेच करावं लागलं ना तुला? हे बघ चिंगे, ही पर्स तुझ्याकडे कुणी पाहू नये असं का वाटलं तुला? कारण तुलाही आवडणारं नव्हतं कुणी तुला खोटारडी म्हटलेलं, चोर म्हटलेलं, हो ना?’’ -आई.

‘‘हो, पण आता मी काय करू? मला माफ कर.’’ सीया.

‘‘आता उद्याच्या उद्या ही पर्स दे सीयाला. सांग तिला, मला आत्ता समजलं की ही तुझी पर्स आहे.’’ आई.

‘‘हो, असंच सांगेन. आई मी चुकले, मी चुकीचं वागले खूप.’’ सीया रडत होती.

‘‘बरं, आता समजली ना तुला तुझी चूक. आता रडणं बंद कर आणि वाढदिवसाला जा.’’आई चिंगीचे डोळे पुसत चिंगीला सांगू लागली, ‘‘एक लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या वस्तू आवडल्या तर त्या त्यांच्याकडून कशा मिळतील हे  नाही बघायचं, तर स्वत: मेहनत करून, स्वत:च्या कर्तृत्वाने कशा मिळतील याचा विचार करायचा, समजलं?’’ चिंगीने मान डोलवली. त्या पर्सने चिंगीला आयुष्यातला मोठ्ठा धडा शिकवला होता.

shreyarajwade09@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2019 2:10 am

Web Title: balmaifal article purse abn 97
Next Stories
1 कार्टूनगाथा : दोस्तीचं विमान!
2 नीलपंखी
3 गजाली विज्ञानाच्या : कुणी निंदा, कुणी वंदा माझा स्वहिताचा धंदा!
Just Now!
X