‘‘आजोबा, काय करताय?’’ शाळेतून आल्या आल्या श्रद्धा धावतच आजोबांच्या टेबलापाशी येऊन उभी राहिली. आजोबांनी टेबलावर बरेच जुने कागद पसरून ठेवले होते. जवळपास सगळेच कागद पिवळे पडलेले होते. त्यात बरेचसे फाटलेही होते. आजोबा त्यांना जुळवून चिकटवत होते.

‘‘नेहमीचंच! इतिहास संशोधन संस्थेची कामं.’’ श्रद्धाचे आजोबा इतिहास संशोधक होते.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

‘‘ही कुठली भाषा आहे? काहीच कळत नाही.’’ त्या कागदाच्या ढिगाऱ्यातला एक कागद उचलत श्रद्धा म्हणाली. तिने मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच समजेना.

‘‘मराठी!’’

‘‘अशी?’’

‘‘ती भाषा नाही, लिपी आहे. मोडी लिपी!’’

‘‘ते काय असतं?’’

‘‘आमच्या लहानपणी आम्हाला शाळेत मोडी लिपी शिकवायचे. तुम्ही मराठी देवनागरीतून लिहिता, बरोबर? ते पटापट लिहिता यावं म्हणून पूर्वी मोडीचा वापर व्हायचा. इंग्लिशमध्ये कसं कर्सिव्ह किंवा रिनगमध्ये आपण लिहितो नं, तसंच. अर्थात, ही लिपी आता इतिहासजमा झालीये. फक्त हे जुने कागद, उतारे वाचायला लागतात मला!’’

‘‘इंटरेस्टिंग! मला पण शिकवाल मोडी?’’ श्रद्धा अगदी एका मोठय़ा माणसासारखी हनुवटी खाजवत म्हणाली.

‘‘तू काय करणार शिकून?’’

‘‘गंमत म्हणून! तुम्हीच नेहमी म्हणता नं, की कुठलंच ज्ञान वाया जात नाही. शिकवा नं मला तासभर तरी रोज!’’

‘‘ओक्के! डन डील!’’ आजोबांना श्रद्धाचा सारखं काहीतरी नवीन शिकत राहण्याचा स्वभाव माहिती होता. त्यानंतर महिनाभर श्रद्धा आजोबांकडून अगदी सचोटीने मोडी लिपी शिकली. आता ती मोडी लिहिण्यात आणि वाचण्यात बऱ्यापकी सराईत झाली होती.

दरवर्षी श्रद्धा आणि तिची आई गणपतीला तिच्या आजोळी जायचे. कारण एकतर तिच्या घरी गणपती बसत नव्हते आणि तिचं आजोळचं गाव म्हणजे गणपतींचंच गाव होतं- गणेशनगरी. तिथे सगळीच घरं या न त्या प्रकारे गणपती बनवण्याच्या व्यवसायाशी जोडलेली होती.

श्रद्धाच्या नाना आजोबांचाही तिथे गणपती बनवण्याचा मोठा कारखाना होता. तिचे दोघे मामा-मामी, मामे भावंडंही त्याच व्यवसायात होते. श्रद्धाला तिथल्या मंगलमय वातावरणात खूप मज्जा यायची.

यावर्षीही ती आणि तिची आई गणपती बसायच्या आदल्या दिवशी सकाळीच तिथे पोहोचल्या.

‘‘बना काका ऽऽऽ!’’ तिथे पोहोचल्या पोहोचल्या श्रद्धा कारखान्यात गेली.

‘‘आली का बाये माजी!’’ बना काका श्रद्धाला पाहून खूश झाले. ते नानांच्या कारखान्यातले सगळ्यात जुने कारागीर होते.

‘‘हो! गणपती मस्त दिसताहेत, काका.’’

‘‘तू पावती दिली म्हंजी मिळालं सगळं. बयो, कितवीला यंदा?’’

‘‘काका, तुम्ही दरवेळी हेच विचारता! आता सातवीला मी!’’

‘‘बयो, शाळेचं वेड म्हणून विचारतो. चौथीला शाळा सुटली. पोरांना शिकवायचं होतं, ते बी न्हाई जमलं. मग लावलं त्यांना बी याच कामात!’’ काका हसत म्हणाले.

‘‘का हो?’’

‘‘आपल्या गावात कुठं हाय शाळा? तालुक्याला जावं लागतंय. मंग पोटा-पाण्याचं बघायचं की शिकण्याचं? यात सुटून जातेय शाळा.’’ बोलताना एकीकडे बना काकांचं काम सुरूच होतं. इतक्यात तिथे एक गिऱ्हाईक आल्यामुळे दोघांचं संभाषण अर्धवटच राहिलं.

कारखान्यातली आता बरीचशी कामं आटोपली होती. सगळे गणपती आपापल्या बुक केलेल्या घरी जायला सज्ज होते. उरलेली बारीकसारीक कामं मामा-मामी पहात होते. त्यामुळे श्रद्धाचे नाना आजोबा निवांत होते. कारखान्याच्या मागच्या बाजूला लागूनच त्यांचा मोठा वाडा होता. दुपारी वाडय़ाच्या कोपऱ्यातल्या खोलीत एक जुनी ट्रंक काढून ते काहीतरी शोधत होते.

‘‘नाना, काय शोधताय?’’ श्रद्धा नुकतीच तयार झालेली खिरापत खात तिथे आली.

‘‘आपण, म्हणजे माझ्या आजोबांनी पहिल्यांदा गणपती बसवला तेव्हा फोटोग्राफरला बोलावून त्याचा एक फोटो काढला होता. तो शोधतोय.’’

‘‘का?’’

‘‘सहजच! बऱ्याच वर्षांत पाहिला नव्हता. आज एकदम आठवण झाली.’’

‘‘नाना, हे काये?’’ ट्रंकेच्या एका कोपऱ्यात पडलेला कागदाचा गठ्ठा उचलत श्रद्धा म्हणाली.

‘‘कुणास ठाऊक! त्यावर लिहिलेलं कधी समजलं नाही मला.’’

‘‘कारण त्याच्यावरचा मजकूर मोडीमध्ये लिहिलाय.’’

‘‘तुला गं काय माहीत, चिंगे?’’

‘‘मला येतं मोडी. आजोबांनी शिकवलंय. हे कागद मी घेऊ वाचायला?’’

‘‘घे की!’’ मग दुपारभर श्रद्धा ते कागद वाचत बसली. तिला जे शब्द अडत होते ते ती अधोरेखित करत होती. त्या मजकुरातून तिला जो उलगडा झाला तो सुखद धक्का देणारा होता. पण कुणालाही सांगायच्या आधी तिने तिच्या आजोबांना फोन लावला.

‘‘हॅलो आजोबा, मी तुम्हाला थोडय़ा वेळापूर्वी मोडीमध्ये लिहिलेल्या जुन्या कागदांचे काही फोटो पाठवलेत आईच्या व्होट्सअ‍ॅपवरून. एकदा वाचून घ्या नं, प्लीज! मी तासाभराने पुन्हा फोन करते.’’

‘‘हॅलो चिंगे, हे एकदम सॉल्लिड आहे. नानांना सांगितलंस?’’ आजोबांचा फोनवर पलीकडून आवाज.

‘‘नाही! आधी तुमच्याबरोबर कन्फर्म करायचं होतं!’’

‘‘एकदम बरोबर वाचलंयस तू! गो अहेड! आय एम प्राउड ऑफ यू!’’

श्रद्धाने तडक घरच्या सगळ्यांना एकत्र बोलावलं.

‘‘चिंगे, काय मस्करी लावलीये! आता लोक  येतील गणपती न्यायला.’’ मोठा मामा वैतागून म्हणाला.

‘‘मामा, खूप महत्त्वाचं आहे रे! गणपती शप्पथ!’’

शेवटी दोघे मामा कारखान्यावर गेले आणि बाकी मंडळी श्रद्धाचं बोलणं ऐकायला थांबली.

‘‘नाना, ते गावाबाहेरचं मोठं गणपतीचं देऊळ आहे नं, ते आपल्या मालकीचं आहे. आणि आजूबाजूची मोकळी जागासुद्धा!’’

‘‘काय?’’ सगळे एकदम ओरडले.

‘‘हो! असं या कागदांमध्येच लिहिलंय. मी आजोबांनाही दाखवलं. त्यांनीही कन्फर्म केलंय.’’

नानांनी मग श्रद्धाच्या आजोबांना फोन लावला. आजोबांशी सविस्तर बोलल्यावर त्यांचा श्रद्धावर विश्वास बसला. त्यांनी पुन्हा सगळी ट्रंक धुंडाळून काढली. त्यांना तो गणपतीचा फोटो एका वहीमध्ये ठेवलेला सापडला. यापूर्वी नानांनी ती वही कधीच वाचली नव्हती. त्यात त्यांच्या आजोबांनी म्हणजे श्रद्धाच्या खापर-पणजोबांनी देऊळ बांधण्याचा संपूर्ण व्यवहार लिहून ठेवला होता. श्रद्धाने तो नीट वाचून दाखवला. तिला फारसं काही कळलं नाही; पण नानांनी ते व्यवस्थित समजून घेतलं.

‘‘तरीच आमचे वडील एकदा म्हणाले होते की, जेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा आमच्या आजोबांनी त्यातून स्फूर्ती घेऊन गावामध्ये या प्रथेला सुरुवात केली होती.’’ आजोबा आठवणींना उजाळा देत म्हणाले.

‘‘मग?’’ – इति श्रद्धा.

‘‘मग काय? वडील मुंबईला गेले. गावाशी नातं तुटलं. मी मूíतकार झाल्यावर या गणपतीची ओढ पुन्हा मला इथे घेऊन आली. मधे बरीच र्वष लोटली. पण या देवळाबद्दल कधीच उल्लेख झाला नव्हता. आपला बना खोत थोडं फार बघतो देवळाचं- पूजा, साफसफाई वगरे म्हणून! नाहीतर अगदी जुनं झालंय देऊळ. मूर्तीही जीर्ण झालीये. काहीतरी करायला हवं.’’

गावातल्या आणि नाना आजोबांच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं होतं. दुसऱ्या दिवशी श्रद्धा पुन्हा तिच्या घरी जाणार होती.

‘‘काय चिंगे, आता शाळा सुरू! छोटीशी सुट्टी संपली म्हणजे अभ्यास पण सुरू! आता एकदम बोअर होणार नं?’’ नानांनी श्रद्धाचा दरवर्षीचा ठरलेला ‘डायलॉग’ बोलून दाखवला.

‘‘नाना, आता मी असं कधीच म्हणणार नाही.’’

‘‘का बुवा?’’

‘‘आई नेहमी म्हणते की, आपल्याला आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची कधीच किंमत नसते.’’

‘‘म्हणजे गं?’’

‘‘आम्हाला शिक्षण सहज मिळतं तर आम्ही कंटाळा करतो. पण आपल्या गावात तर शाळाच नाहीये. तालुक्याला जावं लागतं म्हणून इथल्या कारागिरांच्या मुलांना शिकता येत नाही. आई-मामा शहरात जाऊन शिकू शकले. पण इतरांचं काय?’’

‘‘बापरे! इतकी समज? कोण म्हणालं गं हे?’’ नाना श्रद्धाला जवळ घेत म्हणाले.

‘‘बना काका..’’ आणि नाना विचारात पडले.

.. श्रद्धाची आणि तिच्या आईची आता निघायची वेळ होत आली होती.

‘‘चिंगे, आपण आपल्या देवळाच्या जागेवर शाळा बांधली तर?’’ नाना श्रद्धाच्या हातात चॉकलेटच्या मोदकांचा बॉक्स ठेवत म्हणाले.

‘‘काय? ग्रेटच होईल मग!’’ ते ऐकून श्रद्धाने जवळपास उडीच मारली.

‘‘देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहेच. त्याजागी शाळा बांधली की त्यातच आपल्या गणपती बाप्पाचं लहानसं देऊळ बांधू. आपल्या कारखान्यात घडलेल्या मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठा करू. गणेशनगरीची मुलंसुद्धा आमच्या श्रद्धासारखी हुशार नकोत का व्हायला?’’ नाना मिश्कीलपणे म्हणाले. यावर श्रद्धा छान लाजली.

‘‘म्हणजे, नुसतं मंदिर नाही तर ‘ज्ञानमंदिर’ बांधायचं आपण!’’

‘‘करेक्ट! आपल्या गणेशनगरीतही करूयात नं शिक्षणाचा श्रीगणेशा.’’ नानांनी कौतुकाने श्रद्धाचा गालगुच्चा घेतला.

श्रद्धाला आता उसंत नव्हती. निघायच्या आधी तिला ही बातमी बना काकाला तडक जाऊन द्यायची होती..

mokashiprachi@gmail.com