News Flash

संकल्प

शाळेतून आल्यापासून आर्या काहीशा विचारात दिसत होती.

शाळेतून आल्यापासून आर्या काहीशा विचारात दिसत होती. घरी आल्यावर शाळेची बॅग एकदाची भिरकावली की तिची स्वारी आधी वळायची टीव्हीच्या रिमोटकडे. पण आज टीव्ही सुरू करण्याचाही तिला चक्क विसर पडला. शेवटी आईने विचारले तेव्हा ती खूपच उत्साहात म्हणाली, ‘‘अगं, बाईंनी सांगितलंय, नवीन वर्षांत काहीतरी नवीन संकल्प करायचा आणि पुढील वर्षभर तो निगुतीनं पाळायचा. म्हणून मी विचारात आहे की काय संकल्प करायचा?’’

आई हसली आणि म्हणाली, ‘‘एवढंच होय! त्यासाठी एवढा विचार काय करायचा? कित्तीतरी गोष्टींचा संकल्प करता येईल की!’’

‘‘नाही आई. मला एकदम हटके संकल्प करायचाय. असा संकल्प- जो कुणीच करणार नाही. आणि बरं का, मी खरंच तो वर्षभर प्रामाणिकपणे पार पाडेन.’’

आर्याचा संकल्प करण्याचा निर्धार पक्का आहे तोवरच तिला पटवण्याची संधी आहे असं वाटून आई म्हणाली, ‘‘आईला घरकामात मदत करशील असा संकल्प कर. किंवा छोटय़ा मिंकूला अभ्यासात मदत करेन, असं ठरवं.’’

‘‘नको.’’

‘‘मग शाळेचा अभ्यास वेळेत करेन, लवकर उठण्याची आणि व्यायाम करण्याची सवय करेन. असं ठरवलंय.’’

‘‘नको गं आई, हे सगळे संकल्प आधी करून झालेत. आता काही तरी नवं हवं आहे.’’

‘‘बरं, मग स्वावलंबी होईन असं ठरव. आपला कप्पा, कपडय़ांचं कपाट नीट आवरून ठेवशील असा निश्चय कर.’’

‘‘आई, असे सगळे संकल्प माझे मित्र-मैत्रिणीपण करतील. मला वेगळा आणि अधिक अर्थपूर्ण संकल्प करायचा आहे. गेल्या वर्षी मावशीने नाही का टेरेस गार्डनिंग करण्याचा संकल्प केला होता. आणि आता खूप साऱ्या भाज्या तिच्या टेरेसमध्येच ती पिकवते. असा काहीसा संकल्प मला हवा आहे.’’

आता मात्र आई हतबल झाली. मावशी मोठी आहे, तिचा संकल्प मोठा असणारच. लहान मुलांनी आपल्यासारखे लहान लहान संकल्प करावेत आणि ते पूर्ण करावेत, असं आईनं समजावून पाहिलं. पण आर्याची स्वारी काही ऐकेचना. मग स्वयंपाकघरात काम करता करता आई म्हणाली, ‘‘अगं आर्या, एक भारी संकल्प सुचला बघ तुझ्यासाठी-पाणी वाचवा. मी पाण्याचा अपव्यय करणार नाही असं ठरव. आहे की नाही छान!’’

‘‘अगं आई, मी पाणी वाया घालवतेच कुठे? भांडी कमला मावशी घासतात. कपडे मशीनमध्ये धुतो आपण. माझा पाण्याशी संबंध येतो तो फक्त अंघोळीपुरता. असा नको बाई नावापुरता संकल्प.’’

‘‘त्यापेक्षा मी मुक्या प्राण्यांची काळजी घेईन, असं ठरवू का गं आई?’’

आई म्हणाली, ‘‘तुला कुत्र्यांची वाटते भीती. मग काय करायचं? काय फक्त मांजरांची काळजी घेणार आहेस?’’ आई खरं तर गालातल्या गालात हसत होती. आर्याला ते कळलंच. रागावून ती खेळायला निघून गेली.

खेळतानाही तिचा विचार चालूच होता. टीव्ही कमी पाहण्याचा संकल्प मी करू शकते. पण डोरेमॉन लागलं की माझा ताबा सुटेलच. नकोच ते.

विचारांच्या गडबडीत ती आऊटही झाली. चिडून अंगणात बसली. झाडाच्या बाजूला तुळशीची कुंडी होती. मुंग्यांची रांग तुळशीच्या बाजूने जात पेरूच्या झाडापर्यंत चालली होती. कित्ती मुंग्या होत्या! बाप रे.. या मुंग्या पहाव्या तेव्हा चालतच असतात. यांना थकवा कसा येत नाही बरं.. आर्या स्वत:शीच बोलता बोलता क्षणार्धात ओरडली. ‘‘युरेका युरेका!’’ धावत घरी जाऊन आईला म्हणाली, ‘‘आई, मला नवीन संकल्प सापडला.’’

‘‘ कोणता?’’ आईने कुतूहलानं विचारलं.

‘‘अगं, मी आत्ताच मुंग्यांची रांग पाहिली. आई त्या किती कष्ट करतात. न दमता, न थांबता त्या आपलं काम प्रामाणिकपणे करतच राहतात. मी खूप गोष्टी उत्साहाने सुरू करते, पण एकदा उत्साह मावळला की त्या सोडूनही देते.’’

‘‘बरं मग?’’

‘‘आई, म्हणून मी ठरवलंय, हा कंटाळा करणं मी सोडून देणार आहे. कंटाळा सोडला की सगळ्या गोष्टी वेळेत आणि शिस्तीत होतीलच की!’’

आई म्हणाली ‘‘अगदी बरोबर.’’

पण आईला मध्येच थांबवत आर्या म्हणाली, ‘‘आई, तू सुचवलेल्या सगळ्या गोष्टी जसे की, घरातली कामं करणं, लवकर उठणं किंवा मिंकूला अभ्यास शिकवणं, इत्यादी मी करतेच. पण काहीच दिवसांत मला त्याचा कंटाळा येतो आणि मी सगळं सोडून देते. पण मी कंटाळा करणंच सोडून दिलं तर कित्ती छान होईल ना आई!’’

आईलाही आर्याचा संकल्प आवडला. कारण तो खरंच अर्थपूर्ण होता. आईनं आर्याला प्रेमानं जवळ घेतलं आणि नवीन वर्षांत आपली मुलगी विचारांनीही मोठी झाली याचं तिला कौतुक वाटलं.

भारती भावसार

bkhairnar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:19 am

Web Title: bharti bhavsar story for kids
Next Stories
1 विल्यम कमक्वाम्बा
2 डोकॅलिटी
3 शी बाबा कंटाळा!
Just Now!
X