X

डॉल्फिनला हवी सुट्टी!

एकदा नमिता आणि नितीन तेजसला घेऊन ट्रिपला निघाले.

एकदा नमिता आणि नितीन तेजसला घेऊन ट्रिपला निघाले. दुपार कलता कलता ते मुक्कामाला पोहचले. ते कोकणातील एक छोटंसं निसर्गरम्य गाव होतं.

‘‘चला, उतरा आता.. आलं आपलं मुक्कामाचं ठिकाण.’’बाबा गाडी थांबवत म्हणाले. गाडीचा आवाज ऐकून घरातून आजी-आजोबा असे दोघंजण बाहेर आले. तिथं दोघंच रहात असल्यामुळे ते कोकणात येणाऱ्या पर्यटकांची घरी राहण्याची सोय करत.

‘‘या या.. कसा झाला प्रवास? त्रास नाही नं झाला काही.. अरे हरी, सामान घे बरं साहेबांचं आतमध्ये.. नाव काय  बेटा तुझं?’’

‘‘ तेजस..’’

‘‘ जा. हातपाय धुऊन घ्या. मग गरमागरम चहा घेऊ  फक्कडसा..’’ – इति आजोबा

बाबांनी आजोबांना आजुबाजूच्या परिसराची माहिती विचारली. संध्याकाळ होत आली होती. सगळ्यांनी गावातून सहजच एक चक्कर टाकली. परत आल्यावर रात्रीची जेवणं झाली आणि सर्वजण झोपायच्या तयारीला लागले. सकाळ झाली आणि नमितानं तेजसला उठवलं.

अंघोळ, ब्रेकफास्ट आटोपून तिघंही बाहेर पडले आणि एका ठिकाणी गेले. तिथं बरेच पर्यटक जमले होते. तेजसएवढी लहान मुलंही होती. थोडय़ाच वेळात तेथे डॉल्फिन माशांचा शो सुरू होणार होता. तिथं दोन मोठे डॉल्फिन मासे दिसत होते आणि त्यांचे प्रशिक्षक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती देत होते. शो सुरू झाला. प्रशिक्षक सांगतील त्याप्रमाणे मासे करून दाखवत होते. पाण्यात उंच सूर मारणं, पाण्याखाली गायब होऊन पुन्हा वर येणं, उलटसुलट उडय़ा मारणं, वेगानं गोल गोल फिरणं, इ. करामती ते सहज करत होते. लोकही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते. बच्चे कंपनी तर जाम खूश झाली होती. शो  संपला.

‘‘बाबा, किती हुशार आहेत नं हे मासे.’’  तेजस म्हणाला.

‘‘हो बेटा. त्यांच्या प्रशिक्षकांनी शिकवून त्यांना तरबेज केलंय अगदी.’’

‘‘किती मज्जा नं! त्यांना खूप पैसे मिळत असतील.. हो नं?’’

‘‘हो.आपल्यासारखे लोक येतात नं सुट्टीत. शिवाय आजकाल वर्षभर येतात पर्यटक.

‘‘पण बाबा, दिवसभर असे शो करून करून दमत असतील नं ते.’’  हं.. दमत असतील कदाचित. चला आता, अजून दुसरीकडे जायचंय आपल्याला बोटीतून.’’

रात्री उशिरा तिघंही घरी परतले. ‘‘दमलो मी फार,’’ असं म्हणत तेजस लगेच गाढ झोपी गेला. मध्यरात्री त्याला कुणाचीतरी हाक ऐकू आली.

‘‘तेजस.. तेजस..’’ भास असेल असं वाटून तेजसनं कूस बदलली.

‘‘ तेजस.. अरे तेजस..’’

‘‘ झोपू दे नं आई.. सकाळ झाली का एवढय़ात. मला नाही उठायचं. दमलोय मी फार.’’ तेजसनं झोपेतच उत्तर दिलं.

‘‘अरे  तेजस, आई  नाही.. आम्ही डॉल्फिन मासे आहोत.’’

‘‘ काय, डॉल्फिन मासे.. इथं?’’

‘‘ हो, डॉल्फिन मासे.. दुपारी तू तुझ्या बाबांशी बोलत असलेलं आम्ही ऐकलं. शो करून आम्ही दमत असू असा विचार फक्त तूच  केलास. आमच्या मालकांना भरपूर पैसे मिळतात. सुट्टीच्या दिवसांत तर जादा खेळ करतात ते.’’

‘‘हो नं!’’

‘‘इतकं जास्त काम केल्यावर आम्ही दमत असू हे तर मान्य आहे नं तुला.’’

‘‘ हो तर.. पण मी काय करू शकतो?’’

‘‘अरे, तुम्हाला सुट्टय़ा लागल्या की किती बरं वाटतं. कितीतरी आधीपासून तुम्ही सहलीचे बेत आखता, हो की नाही?’’

‘‘हो नं. सारखा सारखा अभ्यास आणि कामं करून दमायला होतं. मग अशी मजा करावीशी वाटणारच नं!’’

‘‘बरोबर आहे तुझं, पण तुम्हाला आठवडय़ाची सुट्टी असतेच नं. कुणाकुणाला तर दोन-दोन सुट्टय़ा असतात.’’

‘‘हो.. हो.. असतात तर.. पण त्याचं काय? त्या तर हव्यातच. नाहीतर..’’

‘‘अरे, आम्हीही दमतोच की नाही शो करून करून.. पण आम्हाला अजिबात सुट्टी नाही मिळत. उलट तुमच्या सुट्टय़ा म्हणजे आम्हाला ओव्हरटाइम. मोठय़ा सुट्टय़ांत तर अजिबात आराम नाही मिळत. आणि तुम्ही तर फक्त शो पाहून आणि गाडय़ांमध्ये फिरूनच दमता. काय.. खरं आहे  की  नाही?’’

‘‘ खरंच  की.. हे माझ्या लक्षातच नाही आलं.’’

‘‘ काय लक्षात नाही आलं तेजस?’’ आई त्याला हलवून उठवत होती.

‘‘अरे.. सकाळ झाली की.. म्हणजे ते स्वप्नच होतं तर.’’

‘‘काय म्हणतोस तू? कुठलं स्वप्न? जागा झालास का?’’

‘‘काही नाही.’’ त्याला  सारखं डॉल्फिन माशांचं बोलणं आठवत होतं.’ आम्हाला सुट्टी नाही.. सुट्टी नाही..’ काहीतरी  केलं पाहिजे यांच्यासाठी.. पण काय करावं बरं.. हं.. आयडिया..’ त्यानं मनाशी काहीतरी ठरवलं आणि दुपारी पुन्हा तो शो पाहायला जायचं ठरवलं. तसं बाबांना सांगताच ते म्हणाले..

‘‘अरे, कालच पाहिलाय नं.. आज दुसरीकडे जाऊ  या.’’

‘‘नाही.. मला पुन्हा तोच शो पाहायचाय.’’

‘‘ठीक आहे, तुझ्या मनासारखं. तुला तो शो फारच आवडलेला दिसतोय!’’

‘‘तिथं गेल्यावर शो सुरू झाला. पण आज तेजसचं लक्ष त्या शोमध्ये नव्हतंच मुळी. तो शो संपायची वाट पाहात होता. शो संपला. सगळे लोक बाहेर गेले.

‘‘चल तेजस.. झाला नं शो पाहून की आणखी एकदा पाहायचाय.’’ बाबा गमतीनं म्हणाले.

‘‘ बाबा , तुम्ही  थोडा  वेळ  बाहेर  थांबता  का?  मी  आलोच.’’

‘‘बरं.. बरं.. ये लवकर.’’

तेजस डॉल्फिन माशांच्या प्रशिक्षकांकडे गेला. ‘‘काका जरा बोलायचं होतं तुमच्याशी.’’

‘‘बोल बाळा. शो आवडला नं तुला. कसे आहेत आमचे डॉल्फिन मासे?’’

‘‘हो काका, शो आवडला मला. डॉल्फिन मासे पण मस्त आहेत तुमचे, पण..’’

‘‘पण काय? पुन्हा पाहायचाय काय शो. हरकत नाही.. तिकीट नाही काढलंस तरी चालेल आता..  आज काय  दिवसभर चालणार शो.. खूप गर्दी आहे .’’ प्रशिक्षक  खूश  होत  म्हणाला.

‘‘नाही  काका, शो नाही पाहायचा पुन्हा.’’

‘‘म २२२ ग? बोल लवकर.. लोक येतील आता आतमध्ये.. आधीच दमलोय मी आज.. पण ठीक आहे. पैसे तर  मिळतील भरपूर. बोल लवकर.’’

‘‘काका, तुम्ही या डॉल्फिन माशांकडून खेळ करून घेता. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिलंय तुम्ही. तुमचं कौतुक वाटतं  मला, पण..’’

‘‘पण काय?’’

‘‘पण हे मासेही थकत असतील नं काका खेळ करून करून.’’

‘‘हो  का. काही लक्षात नाही आलं बुवा.. त्यांना बोलता येत नाही ना!’’

‘‘म्हणूनच तर आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे. आता इतक्या गर्दीसाठी त्यांच्याकडून पुन:पुन्हा खेळ करून घेणार तुम्ही. तुम्ही तर खेळ करवून घेताना दमता, मग त्यांना तर किती परिश्रम होत असतील.. हो की नाही!’’

‘‘हो.. ते तर आहेच, पण मग काय करावं?’’

‘‘फार काही नाही. त्यांना आठवडय़ातून फक्त एक  दिवस सुट्टी द्यावी.. बस्स.. मग ते दुसऱ्या दिवशी जास्त जोमानं  खेळ करू लागतील. शिवाय जास्त दिवसही करू शकतील. बघा पटतंय का तुम्हाला.’’

‘‘हो रे बाळा.. खरंच.. हे माझ्या लक्षातच नाही आलं. पैसे मिळवायच्या नादात मी त्यांच्याकडून मरमर काम करून घेत होतो. यांनाही जीव आहे. ठरलं. आजपासून मी त्यांना आठवडी सुट्टी देणार. त्या दिवशी फक्त आराम. शिवाय  एरवीही मर्यादितच काम करून घेणार. त्यांच्या जिवावर तर माझं पोट भरतंय.. तू लहान असूनही तुझ्या हे लक्षात आलं. आभारी आहे मी तुझा. नाव काय बाळा तुझं?’’ तेजस.

‘‘चल.. बाय तेजस. पुन्हा ये हं.’’

‘‘हो काका.. नक्कीच.. आता तर इथं मला दोन नवीन, वेगळे दोस्त मिळाले आहेत. त्यांना भेटायला मी नक्कीच येणार. बाय काका..’’ तेजसनं जवळच येऊन थांबलेल्या माशांकडे पाहात म्हटलं. डॉल्फिन मासे त्याच्याकडे प्रेमानं पाहात होते असा त्याला भास  झाला. त्यानं त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो जाण्यासाठी वळला. तेव्हापासून डॉल्फिन माशांना आठवडय़ातून एक दिवस सुट्टी मिळू लागली.

– भारती महाजन-रायबागकर       

bharati.raibagkar@gmail.com

Outbrain