News Flash

अनोखा वाढदिवस

दिवाळी संपली की तेजसला त्याच्या वाढदिवसाचे वेध लागतात.

दिवाळी संपली की तेजसला त्याच्या वाढदिवसाचे वेध लागतात. ‘दिवाळीत नवीन कपडे, फराळ, फटाके यांची रेलचेल असतेच नं, मग आता लगेच वाढदिवसाचे काय विशेष,’ असं तेजसला गमतीनं म्हणायचा अवकाश, त्यावर- ‘‘म्हणून काय झालं? दिवाळी सगळ्यांची असते, वाढदिवस मात्र माझा एकटय़ाचा असतो, स्पेशल.. फक्त मलाच नवे कपडे मिळतात, स्पेशल गिफ्ट मिळतं आवडीचं, आपण पार्टी देतो, केक, वेफर्स, आइस्क्रीम, शिवाय माझे मित्र-मैत्रिणी गिफ्ट्स आणतात, मज्जा येते अगदी.’’ असं त्याचं बिनतोड उत्तर तयार असतं.

‘‘आई, यावेळेस आपण मोठ्ठी पार्टी द्यायची, मोठ्ठा हॉल घेऊ, फुग्यांचं डेकोरेशन, कार्टुन्स.. त्या आदित्यच्या वाढदिवसालाही असंच केलं होतं. मिकी माऊस आणि डोरेमॉन कशी  हसवत होती आणि तो पायांना काठय़ा बांधून चालणारा उंचच उंच माणूस, तूही पाहिलंस ना तेव्हा..’’

‘‘हो, हो, पाहिलं मी सगळं.’’

‘‘आपण पण तश्शीच पार्टी करायची, आदित्यपेक्षा भारी.’’

‘‘बरं, बरं, मी सांगेन हं तुझ्या बाबांना.’’ पण यावेळेस बाबांनी वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं, पण तेजसला पटेल ना हे?’’ आईची शंका.

‘‘ते बघतो मी, तू आपण ठरवलेल्या सर्व वस्तू घेऊन ये.’’ एक दिवस तेजस घरातच मित्रांबरोबर खेळत होता.

‘‘ए तेजस, तुझा वाढदिवस आहे नं आत्ता, मग काय करणार आहेस?’’

‘‘यावेळेस खूप मोठ्ठा करणार आहेत माझा वाढदिवस, एकदम भारी, हो ना बाबा.’’ तेजसनं विचारलं.

‘‘हो, हो, एकदम भारी, पण इकडं या बरं सगळे. मला सांगा, वाढदिवस म्हणजे काय?’’

‘‘वाढदिवस म्हणजे हैप्पी बर्थ डे.’’

‘‘हो, हो, पण म्हणजे काय?’’

‘‘म्हणजे.. म्हणजे आपला जन्म झाला तो दिवस.’’

‘‘बरोब्बर, पण दरवर्षी आपण या तारखेला पुन:पुन्हा जन्म घेतो का?’’

‘‘काहीतरीच काय.’’

‘‘पण आपण दरवर्षी एका वर्षांनं म्हणजे ३६५ दिवसांनी मोठं होत असतो म्हणजे वाढत असतो, म्हणून तर त्याला वाढदिवस म्हणतात, हो नं?’’

‘‘हो ऽऽऽ’’

‘‘मग आपण मोठे होत असताना आपले विचारही थोडे मोठे व्हायला पाहिजेत.’’

‘‘म्हणजे काय काका? विचार कसे मोठ्ठे करायचेत?’’

‘‘ते मी नंतर सांगेन.’’

वाढदिवसाची तारीख उजाडली. तेजसनं नवीन ड्रेस घातला. आईनं त्याला औक्षण केलं आणि देवाला नमस्कार करायला सांगितला. तेजसनं आई-बाबांनाही नमस्कार केला. आज जेवणात तेजसच्या आवडीचा श्रीखंड-पुरीचा बेत होता. जेवणं झाल्यावर बाबांनी हॉलमध्ये केकचा बॉक्स आणि दोन-तीन मोठय़ा बॅगा आणून ठेवल्या.

‘‘बाबा, कधी जायचं हॉलवर, ते डेकोरेशनवाले कधी येणार आहेत आणि ती कार्टून्सवाली मुलं?’’

‘‘हो, हो, जाऊ  या, जरा वेळ थांब.’’ एवढय़ात  त्याची सगळी मित्र-मंडळी घरी आली. ‘‘हे काय, तुम्ही एवढय़ा लवकर कसे आलात, तेही घरी? अजून तर आम्हीच हॉलवर गेलो नाही.’’ तेजस आश्चर्यानं म्हणाला.

‘‘अरे, मीच बोलावलंय सगळ्यांना लवकर. चला, गाडीत जाऊन बसा, आम्ही आलोच हे सामान घेऊन.’’ बाबा म्हणाले.

‘‘बाबा, कुठं चाललोत आपण?’’

‘‘समजेलच तुम्हाला लवकर.’’ ..बाबांनी गाडी थांबवली. समोरच्या इमारतीवर ‘आश्रम-शाळा’ अशी पाटी होती.

‘‘हा कोणता हॉल? नावही वेगळंच वाटतंय?’’ मुलं आपापसात प्रश्न विचारू लागली. बाबांनी गाडीतून सामान काढलं. एवढय़ात आतून एक गृहस्थ बाहेर आले आणि बाबांना म्हणाले, ‘‘नमस्कार, या साहेब,आम्ही आपली वाटच पाहत होतो. चला रे मुलांनो आत.’’ सगळेजण आत गेले. इमारतीच्या आवारात ८-१० खोल्या होत्या. मध्यभागी छोटंसं मैदान होतं. ते गृहस्थ सगळ्यांना घेऊन एका हॉलमध्ये गेले. हॉलच्या चारी बाजूच्या भिंतींवर छानशी चित्रं लावलेली होती आणि कडेने टेबलांवर हस्तव्यवसायाच्या सुबक, सुंदर वस्तू मांडून ठेवल्या होत्या. हॉलमध्ये लहान-मोठी मुलं शिस्तीत बसलेली होती. सर्वजण आत जाताच त्यांनी सर्वाना ‘नमस्ते’ केलं. त्या गृहस्थांनी सगळ्यांचा परिचय करून दिला. नंतर ते म्हणाले, ‘‘तेजस, ही मुलं अनाथ आणि गरीब आहेत. काहीना आई-वडील नाहीत, तर काहींच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या सर्व मुलांना शिकायचं आहे, पण त्यांच्या घरांत खायला अन्न नाही तर शिक्षणासाठी पैसा कोठून आणणार?आम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची, कपडय़ांची, शिक्षणाची सोय करतो. त्यासाठी आम्हाला श्रीमंत आणि दानशूर लोक मदत करतात. ही मुलं हुशार आहेत, एवढं बोलून त्यांनी काही मुलांना श्लोक म्हणायला सांगितले, काहींनी नकला केल्या, काहींनी इंग्रजी, मराठी, हिंदीत कविता म्हटल्या. सर्वाचे उच्चार स्पष्ट, शुद्ध होते. तेजसला आणि त्याच्या मित्रांना आपली मातृभाषा असलेल्या मराठीतील इंग्लिशची भेसळ आठवली.

‘‘आणि मैदानी खेळांतही हुशार आहेत ही मुलं. शिवाय या सर्व वस्तू विकून ते पैसेही मिळवतात.’’ ते गृहस्थ म्हणाले.

बाबा म्हणाले, ‘‘तेजस, म्हणूनच आज मी तुम्हाला इथं मुद्दाम घेऊन आलो. तुझा वाढदिवस आहे म्हणून खास हा हॉल सजवला आहे. ही तोरणं, पताका, हा फ्लॉवरपॉट या मुलांनीच केलंय हे सर्व.’’ खरंच छान दिसत होता हॉल ‘सिम्पल बट स्वीट’ तोपर्यंत आईनं टेबलवर केक काढून ठेवला होता.

‘‘तेजस, केक कापतोस नं.’’

‘‘हॅपी बर्थ डे तेजस.’’ सर्वानी तेजसला शुभेच्छा दिल्या. नंतर तेजसनं सर्व मुलांना केक, मिठाई वाटली आणि शालेय साहित्याचा एक एक संचही दिला. सर्वानी ‘थॅंक्यूू’ म्हणत त्या भेटवस्तू घेतल्या. मुलांनीच केलेली कार्डबोर्डची विमानाची प्रतिकृती तेजसला दिली. सर्वाचा निरोप घेऊन ते निघाले.

‘‘पुन्हा या हं सर्वजण.’’ सर्व मुलांनी त्यांना आग्रहानं म्हटलं. येताना गाडीत दंगा करणारी मुलं आता मात्र गप्प होती.

‘‘काय तेजस, आवडला का असा वेगळा वाढदिवस साजरा करणं तुला? नाराज तर नाहीस नं?  तू म्हणत असशील तर आपण अजूनही पार्टी देऊ  या, एकदम भारी, काय?’’

‘‘नाही बाबा, उलट मला कळलं की ज्यांना काहीच मिळत नाही अशी खूप मुलं असतात आणि त्यांना देण्यातच खरा आनंद असतो. आमच्याजवळ तर कितीतरी गिफ्ट्स, खेळणी तशीच पडून असतात, कपडय़ाचं तर एक दुकानच होईल छोटंसं, घालण्यात सुद्धा येत नाहीत सगळे कपडे, तेही त्यांना दिलेत तर.. शिवाय माझ्या पिगी बँकेतले पैसेही मी आता अशाच एखाद्या मुलाला देत जाईन, चालेल?’’

‘‘हो, यालाच तर मी आपले विचार मोठे म्हणजे मॅच्युअर्ड करणं असं म्हणत होतो आणि ते पाटर्य़ामध्ये डोरेमान, मिकी माउस वगैरे फिरतात नं, अशीच गरीब, गरजू मुलं असतात ती. तुम्हाला मजा वाटावी म्हणून ती बिचारी तो जाडजाड ड्रेस घालतात आणि आतून मात्र घामानं थबथबलेली असतात.’’

‘‘खरंच बाबा, हे कधी लक्षातच नाही आलं, पण आज तुम्ही आम्हाला एक वेगळी जाणीव करून दिलीत. यापुढे मी कधीच वाढदिवसाच्या पार्टीसाठी हट्ट करणार नाही, थँक्यू  बाबा..’’

‘‘हो, हो,आम्ही सुद्धा आमचा वाढदिवस असाच साजरा करणार, एकदम भारी आणि वेगळाही.’’ सर्व मुलं एकासुरात ओरडली.

‘‘शाब्बास, आता खरंच शहाणी मुलं झालात. चला, आता तुम्हाला आइस्क्रीमची पार्टी देतो.’’

‘‘हुर्रे’’ सगळी बच्चेकंपनी आनंदानं ओरडली.

 

– भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:33 am

Web Title: bharti mahajan raibagkar story for kids part 2
Next Stories
1 सोनटक्का
2 उंदीरमामा की जय!!
3 शोध लाल रंगाचा
Just Now!
X