21 February 2019

News Flash

विज्ञानवेध : बायोनिक हातपाय

तंत्रज्ञानाने नवनवे टप्पे पार केले तसे हे अवयवही सुटसुटीत झाले. नव्या धातूंच्या वापराने हलके झाले.

(संग्रहित छायाचित्र)

मेघश्री दळवी

युद्धात, अपघातात किंवा इतर काही कारणाने हातपाय गमावले असतील, तर अशा वेळी कृत्रिम अवयव अगदी वरदान ठरतात. तुम्ही पाहिलं असेल की विकलांगांना हालचाल करायला अशा अवयवांची मदत होते. स्वतंत्रपणे फिरता आलं की त्यांच्या मनाला उभारी येते. आपल्या भारतातल्या जयपूर फूटसारख्या प्रयत्नांनी असे अवयव सगळ्यांपर्यंत नेऊन मोठं काम केलेलं आहे.

तंत्रज्ञानाने नवनवे टप्पे पार केले तसे हे अवयवही सुटसुटीत झाले. नव्या धातूंच्या वापराने हलके झाले. नव्या संमिश्र पदार्थामुळे लवचीक झाले. आता या कृत्रिम अवयवांसाठी त्रिमित छपाईचा (थ्रीडी प्रिंटिंगचा) वापर होतो आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं मॉडेल करून अचूक त्याच मापाचे अवयव बनवता येऊ  लागले आहेत. त्यामुळे ते वापरायला अत्यंत सोपे पडतात. शिवाय त्यांची किंमतही खाली येते.

लवकरच या अवयवांना साथ मिळणार आहे थेट मेंदूकडून. त्यासाठी न्यूरोसायन्स या मज्जासंस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राची मदत होते आहे. अलीकडे असे बायोनिक म्हणजे बायो-इलेक्ट्रॉनिक अवयव तयार करून पाहण्यात आले आहेत. या नव्या अवयवांमध्ये छोटी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे. तिच्या मदतीने सरळ मेंदूशी संपर्क करून त्याच्याकडून आज्ञा घेता येतात. फायबरच्या स्नायूंकडे या आज्ञा जातात. मग ते खऱ्या स्नायूंसारखं काम करत हाताची किंवा पायाची नैसर्गिक हालचाल करतात.

हे बायोनिक अवयव खऱ्याखुऱ्या हातापायांसारखे वेगवेगळे स्पर्श ओळखू शकतील. त्यामुळे धडपडणं किंवा जखमा होणं टाळता येईल. स्वीडनमध्ये असे हात वापरून अंडी अलगद उचलून ठेवण्याचा प्रयोग सफल झाला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात असे हात थेट हाडांवर बसवून पाहिले आहेत. तर प्रत्येक व्यक्तीच्या सोयीनुसार चालू शकतील अशा बायोनिक पायांवर डेन्मार्क आणि आइसलँडमध्ये संशोधन सुरू आहे.

हे प्रयोग यशस्वी होत गेले की बायोनिक हातपाय उद्या सहज मिळायला लागतील. त्यांच्या किमती आवाक्यात येतील. हजारो-लाखो विकलांगांना त्याचा फायदा होईल. केवढा मोठा दिलासा असेल तो!

meghashri@gmail.com

First Published on September 30, 2018 12:12 am

Web Title: bionic arms and legs