खूप खूप वर्षांपूर्वी राजस्थानात एके ठिकाणी काळविटाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या झाली. बंदूक आहे, काडतुसे आहेत तरीपण त्या गोळ्या कुणी झाडल्या, याचा तपास अजून लागला नाही. असंच काही आपल्या लघुचित्रांबाबत घडलंय.

म्हणजे चित्र आहे, त्याचा काळ माहीत आहे, पण ते कोणी काढलंय त्या चित्रकाराचं नाव आपल्याला माहीत नसतं. चला तर, आपण त्या फंदात न पडता या चित्रातील प्राणी व कला पाहून घेऊ .

आत्तापर्यंत आपण जे प्राणी-पक्षी पाहिले ते एकदम हुबेहूब नव्हते. ना तसा चित्रकारांकडून प्रयत्न होता. बऱ्यापैकी सामान्य लोकांसाठी हे कलाप्रकार होते. परंतु लघुचित्रशैली मात्र खास राजदरबारी जन्मली व वाढली.

आपल्या भारतात ही संपन्न कला मुघल-पर्शियन राजांमुळे आली. मुघलांचा पहिला राजा ‘बाबर’ याच्या काळातही ही शैली (स्टाइल) होती. कुराणातील प्रसंग, राजांच्या नोंदवहीतील (बाबरनामा, अकबरनामा, इत्यादी) सजविण्यासाठी ही चित्रं असायची. त्यामुळे पहिल्यापासूनच या चित्रांचा आकार हा वहीच्या पानाइतका छोटा होता. पण तरीही सोबतच्या फोटोत दिसताहेत तसे भरपूर काही एकाच चित्रात सामावलेलं होतं. तेही प्रचंड डिटेल काम करून.

मुस्लीम धर्मात मानवी देहाच्या चित्रणाला बंदी असल्याने यात प्रथम फुलापानांची नक्षी, निसर्ग, प्राणी-पक्षी, अरबी-उर्दू लिपी, वगैरेचा कल्पक वापर होत गेला. मग राजाचा चेहरा वगैरे येत गेलं. पुढे सर्व मुघल राजांनी ही पद्धत चालू ठेवली. हीच पद्धत हिंदू-राजपूत राजांनाही उचलली. राजदरबारी असणारे हे चित्रकार पगारी होते. एका चित्रावर ४ ते ५ चित्रकार मिळून काम करायचे. प्रत्येक जण चित्राच्या प्रत्येक टप्प्यावर, आपापलं नेमून दिलेलं काम करीत असे. हे म्हणजे एकदम दिवाळीत एकत्र फराळ करायला बसतात तसं डोळ्यासमोर आणू नका. प्रत्येकाची चित्र काढण्याची बैठक व्यवस्था व वेळ वेगळी असायची. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पहिल्या मजल्यावर याचं एक भारी दालन आहे. ते नक्की पाहाच. (रविवारी म्हणजे आज चालू असतं.)  ही सर्व चित्रं राजाच्या भोवतालचं चित्रण केलेली असायची. राजाच्या हातावर बहिरी ससाणा, गरुड वगैरे असायचे. राजांची शिकारदृश्यं, त्यात सिंह, वाघ, शिकारी कुत्रे, घोडे असे असायचे. मग राजांची मिरवणूक असली की सजलेले हत्ती, उंट, बैल असायचे. राजा-राणी गार्डनमध्ये फिरत किंवा गाण्याची मैफल वगैरे करीत मोर, हरिण, ससे, कबुतरं असं चित्र असायचं!

कृष्णजीवनावरील चित्रात गाई, बैल, असे पाळीव प्राणी असायचे. मुघल, पहाडी, बुंदी, राजपूत शैली अशी नावं असणाऱ्या वेगवेगळ्या भारतीय शैलीतील चित्रांतील प्राण्यांचं चित्रण अतिशय चोख केलेलं. ते केवळ प्राणी आहेत म्हणून आपण करतो तसं दुर्लक्ष केलं नव्हतं. फार काल्पनिकता नसल्याने यातील प्राणीजगत पाहून आपण प्रत्यक्ष प्राण्यांबद्दल बऱ्यापैकी खरी माहिती मिळवू शकतो. त्यांचा नेमका आकार किती असेल याचाही अंदाज लावू शकतो. म्हणजे चित्र छोटं असलं तरीही हत्ती हा मोठय़ा आकाराचा असतो आणि त्या बाजूला असलेलं काळवीट प्रत्यक्षात असल्याप्रमाणे छोटं असतं.  या शैलीत फक्त प्राण्यांचीच अशी खास चित्रं आहेत. हे या शैलीचं खास सौंदर्य-वैशिष्टय़! तसेच आपल्या शास्त्रीय संगीतातील प्रत्येक रागालादेखील चित्ररूपात मांडलं गेलं. हा जगातील सर्वप्रथम असा प्रयोग याच शैलीद्वारे भारतीयांनी केला आहे.

आजचा सराव म्हणजे, आपल्या परिचयाची असणारी, साधारण काळविटाच्या आकारात असणारी ‘बकरी किंवा बोकड’ काढायचा आहे. त्यावरील केस, छोटी शेपटी, शिंगेदेखील काढण्याचा प्रयत्न केला तर छानच होईल! त्यासाठी गुगलचा वापर करालच. पण हे चित्र काढण्यासाठी तुम्हाला केवळ ५ सेंटिमीटर इतकाच आकार मिळणार आहे. हेच लघुचित्रातील चॅलेंज असणारेय!

श्रीनिवास आगवणे Shreeniwas@chitrapatang.in