तो माझ्या आयुष्यात कधी आला ठाऊक नाही. आठवतच नाहीए. मी त्याच्या खोडय़ा, धम्माल गोष्टी आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास अनेक वेळा वाचला आहे. आता या पुस्तकाच्या पिवळ्या पडलेल्या पानांतून, मी स्वत: बाईंड केलेल्या या जुन्या पुस्तकांतून तो आणि त्याचे कुटुंबीय, शाळा, मित्र, गावकरी असं सारं जग आजही डोळ्यापुढे उभं राहतं.
कुणा छोटय़ाशा कोकणातल्या खेडय़ात काका-काकूंसोबत राहणाऱ्या विश्वासची ही गोष्ट. आईबापाविना वाढणारा, कजाग काकूच्या तावडीत सापडलेल्या विश्वासचा प्रवास कोकणातून सुरू होतो. काका-काकू आपल्यावरची जबाबदारी टाळण्याकरता आणि पैशाच्या हव्यासापायी या छोटय़ा विश्वासला एका खानावळीच्या मालकाकडे नोकर म्हणून सोपवतात. शाळा, अभ्यासाची गोडी आणि उपजत कुतूहल असणारा हा विश्वास, या खानावळीत आपल्या लाघवी वागण्याने, अश्रापत खोडय़ांनी आणि नकळत घडणाऱ्या चुकांनी कधी लाडका तर कधी नावडता होत राहतो.
एक धम्माल गोष्टच सांगतो. नजीकच्याच मोटारतळावरचे उतारू खानावळीत गिऱ्हाईक म्हणून येतात. गरम पुरी-भाजीची ऑर्डर देतात. नोकराचं काम करणारा विश्वास त्यांना पुरी-भाजीच्या बश्या आणून देतो. मात्र पदार्थ गारढोण असतात. गिऱ्हाईक त्याच्यावर रागावतात. मी गरम पुरी-भाजी मागितली असं ठणकावतात. निरागस आत्मविश्वासाने विश्वास उत्तर देतो की, पुरीभाजी काल सकाळी केली तेव्हा गरमच होती. बारा तास अगोदर आला असतात तर नक्कीच उकळत्या तेलातून काढलेली पुरी वाढली असती. याच चुकीपायी खानावळीच्या मालकाचा, भररस्त्यात बेदम मार खात असताना, एक सहृदय गृहस्थ या विश्वासला आपल्या पंखांखाली घेतात. आपल्या घरी घेऊन जातात. तिथे विश्वासला त्याची धाकटी बहीण सुमा भेटते. आईची माया देणारी माई मिळते. या घरात विश्वास रुळतो, रमतो, वाढतो आणि खूप मोठ्ठा होतो.
त्याच्या नव्या घरात रुळत असतानाची एक गोष्टदेखील माझ्या कायम स्मरणात राहिलेली आहे. नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या विश्वासला रोज नवनव्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यातच त्याने शंकर-पार्वतीची, गणपतीच्या जन्माची गोष्ट ऐकली. या गोष्टीवर त्याची प्रतिक्रिया, त्याने उपस्थित केलेले प्रश्न फारच गंमतशीर आहेत. पार्वतीने अंगावरच्या मळातून गणपतीची निर्मिती केली, तेव्हा तिने वर्षांनुवष्रे अंघोळ केलेलीच नसली पाहिजे, त्याशिवाय छोटय़ा गणपतीची निर्मिती होईल इतका मळ कसा जमेल तिच्या अंगावर? हा गोटय़ाचा प्रश्न त्या लहान वयात माझ्या मनातही आला होता. मात्र हा प्रश्न विचारण्यातलं त्याचं चिमुकलं धाडस मला त्या वेळी अधिक भावलं होतं. संस्कार, गुणग्राहकता, मूल्य, विचारीपणा, कुतूहल, अभ्यास यांसारख्या गोष्टी अनेक धम्माल प्रसंगांतून, छोटय़ा संवांदांतून समोर येतात. अगदी नकळत गोटय़ाची हुशारी, आत्मविश्वास, अभ्यासूपणा, चतुरपणा, चाणाक्षपणा आणि दुर्दम्य ध्येय आपल्यामध्ये रुजत जातात.
विश्वासची ही गोष्ट म्हणजे ना. धों. ताम्हनकरांनी लिहिलेली ‘गोटय़ा’ ही तीन खंडांत लिहिलेली लहान मुलांसाठीची एक धम्माल कादंबरी. या तीन पुस्तकांच्या संचात ताम्हनकरांनी आणखी दोन पुस्तकांची भर घातली. ‘खडकावरला अंकूर’ या नावाने त्यांनी छोटय़ा पंडितची गोष्ट सांगितली, तर ‘चिंगी’ या पुस्तकातून एका खोडकर, तरी अतिशय लोभस अशा लहान मुलीची गोष्ट आम्हा लहान मुलांना सांगितली. ही सगळीच पुस्तकं आणि गोष्टी इतक्या गुंगवून ठेवणाऱ्या आहेत, की आजही त्या वाचताना बालपणाचा एक तुकडा आपल्या हाती गवसल्यासारखा वाटतो. त्या वयात ही पुस्तकं वाचताना आपण करत असलेल्या खोडय़ा, खेळत असलेले खेळ किंवा आम्हा शहरी मुलांच्या आयुष्यात नसलेले लगोरी, सूरपारंब्या आटय़ापाटय़ांसारखे खेळ असं एक धम्माल जग आमच्यापुढे उभं राहायचं.
गोटय़ा आणि त्याचे सवंगडी मला माझ्या आजूबाजूला दिसायचे. त्याने शाळेत केलेल्या खोडय़ांची मी माझ्या खोडय़ांशी तुलना करून पाहायचो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गोटय़ासारखं हुशार, मेहनती, आणि मोठ्ठं व्हायचं होतं.
आज मागे वळून पाहताना गोटय़ाची गोष्ट जुन्या काळातली वाटते. संध्या, परवचा, श्लोक, पाढे आणि संस्कृताचे शब्द पाठ करण्याचे नियम घरातल्या लहानग्यांकरता असण्याच्या दिवसांत, सत्तरीच्या दशकात लिहिलेली ही पुस्तकं, आज काळाच्या ओघात मागे पडल्यासारखी वाटत असतानाच, माझ्या मैत्रिणीच्या मुलाला नुकताच मी गोटय़ा वाचायला दिला. चौथीतल्या माझ्या या मित्राने आठवडाभरातच या पुस्तकांचा फडशा पाडला. पुस्तकं त्याला आवडल्याचा मला ईमेल केला. मला फारच मजा वाटली. ई-मेल, मोबाइल, चित्रपटांच्या जगात वावरणाऱ्या या पठ्ठय़ाला तब्बल अध्र्या शतकापूर्वी लिहिलेल्या, माझ्या लहानपणी मला भावलेल्या गोटय़ाने तितकंच गुंगवून ठेवलं आणि त्यालाही या गोष्टींची भुरळ पडली यातच गोटय़ाची खरी मेख आहे. या छोटेखानी कादंबरीने छोटय़ांची गोष्ट छोटय़ांकरता, छोटय़ांच्या नजरेतून सांगितली म्हणूनच आजही ही गोष्ट आजच्या लहानग्यांनाही आपलीशी वाटते.
आज कदाचित पुस्तकरूपात ही कादंबरी मिळायची नाही, मात्र नव्वदीच्या दशकात प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी या कादंबरीवर आधारित ‘गोटय़ा’ या नावाचीच मालिका दूरदर्शनकरता बनवली. पुस्तकरूपात ही गोष्ट वाचलेल्या आम्हा लहान मुलांना गोटय़ा, त्याचं घर आणि थोडंसं आयुष्य का होईना दूरदर्शनच्या पडद्यावर पहायला मिळालं. जॉय घाणेकरच्या रूपात आम्ही मनात रंगवलेला गोटय़ा प्रत्यक्षात, घराघरात पाहायला मिळाला. आजच्या माझ्या छोटय़ा दोस्तांना पुस्तक आणि डीव्हीडी अशा दोन्ही रूपात ही गोष्ट अनुभवता येईल.. पण मला विचाराल तर विकत घेऊन किंवा एखाद्या वाचनालयातून मिळवून गोटय़ा वाचण्याची मजा नक्कीच अनुभवा.
हे पुस्तक कुणासाठी? ‘गोटय़ा’चे लेखक ताम्हनकरांच्याच भाषेत.. ‘माझ्या छोटय़ा सवंगडय़ांसाठी’!
पुस्तक : ‘गोटय़ा’, ‘खडकावरला अंकूर’ आणि ‘चिंगी’
लेखक : ना. धों. ताम्हनकर
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे
श्रीपाद – ideas@ascharya.co.in

गावाकडची थंडी
किलबिलणारे पक्षी गाती, झाडावरचे गाणे
थुईथुईणारी हिरवी-पिवळी नाच नाचती पाने!

कुठे मनोहर झुळझुळणारा, वारा लोळण घेतो
रंगीबेरंगी फुले सुगंधी स्वत:च माळून येतो!

प्राची सजली, लाल लाजली, गाली लाली आली
रविवारची सोनपावली अलगद स्वारी आली!

हिरवे हिरवे शेत डोलते, दाणे भरलेत गच्च
बांधावरचे जुनेपुराणे झाडही हिरवेकंच!

झाडाखाली होते न्याहरी, घेऊन येते मामी
ती चटणी, तो ठेचा, अन् मिश्र धान्याची दशमी!

त्या गल्लीमधली शाळा सुंदर, मोहक रंगवलेली
त्रिवार वंदन तिजला, जेथे आई माझी शिकली!

असे आठवे गाव माझे, जेव्हा पडते थंडी
लागे धावू मन हे माझे, आठवणींच्या पंखी!
– पद्माकर के. भावे

माझा नवा दोस्त

एकदा ना मोठी
गंमत झाली
चांदोबा हळूच
उतरला खाली

गळ्यात माझ्या
घालून हात
म्हणाला मला
फिरू चांदण्यात

त्याच्या सोबत मी
रात्रभर फिरलो
गप्पा, गोष्टी
लपाछपी खेळलो
तेवढय़ात सूर्य
डोकावला जरा
आमचा खेळ
संपला सारा

चांदोबा निघाला
घाईने नभात
म्हणाला मित्रा
सोडू नको साथ

तेव्हापासून चांदोबा
दोस्त माझा झाला
हाक मारी तेव्हा तो
सोबतीस आला
– एकनाथ आव्हाड