पुस्तकाशी जितकी गट्टी जास्त तितकं आपलं अनुभवविश्व, भावविश्व व्यापक होत जातं. बालवाचकांची मानसिकता, त्यांचं भावविश्व नेमकेपणाने समजून घेऊन मराठी प्रकाशक पुस्तकांची योजना करताना दिसतात. अशीच काही उत्तम पुस्तकं बालवाचकांच्या भेटीला आली आहेत.

अमर चित्रकथा
अमर चित्रकथांच्या रूपाने भारतातील बालकांसाठी गोष्टींचा खजिनाच उघडला गेला. छोटय़ांचे भावविश्व गोष्टीरूपाने समृद्ध करण्यात अमर चित्रकथांचा मोलाचा वाटा आहे. लहानग्यांच्या मनाला भावतील अशा चित्रांसह बालकांना छोटेखानी गोष्टींच्या रूपाने अमर चित्रकथांनी छोटय़ांच्याच नव्हे, तर मोठय़ांच्या मनावरही गारूड केले. या चित्ररूपी कथांनी अनेक बालमनं विकसित झाली, संस्कारित झाली. याच अमर चित्रकथा मराठीत पुन्हा एकदा उपलब्ध झाल्या आहेत.
जातककथा, पौराणिक कथा, पंचतंत्रातील कथांची चित्रशब्द मांडणी ही मराठी बालवाचकांसाठी पर्वणीच ठरेल. सध्या केवळ १२ पुस्तके मराठीत अनुवादित करण्यात आली आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद, साईबाबांच्या कथा, कोल्ह्य़ाने हत्तीला कसे खाल्ले, हत्तीच्या गोष्टी, सोनेरी मुंगूस, कावळे आणि घुबडे, शंखोबा आणि इतर कथा अशा १२ पुस्तकांचा समावेश आहे.
चित्ररूपी कथा मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी आणि गोष्टीचे आकलन होण्यासाठी खूप प्रभावी ठरते.  ही पुस्तकं त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. मराठीतील अमर चित्रकथांची ही पुस्तके वाचणे हा लहानग्यांबरोबरच मोठय़ांसाठीही निश्चितच आनंददायी अनुभव आहे.
‘अमर चित्रकथा’  
(१२ पुस्तकांचा संच), संपादक – अनंत पै, नवता प्रकाशन, मुंबई, प्रत्येकी पृष्ठे  – ३२,
 प्रत्येकी मूल्य – ४० रुपये.

सौरऊर्जेविषयी…
भारतात सूर्यप्रकाश जास्तच आहे. परंतु त्याला नमस्कार करण्यापलीकडे त्याचं फारसं महत्त्व आपल्याला नाही किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या फुकट ऊर्जेचा आपण हवा तसा उपयोग करून घेत नाही. बच्चेकंपनीसाठी सोप्या-साध्या शब्दांत मुलांना विज्ञानाची गंमत उलगडून दाखविणारे अरविंद गुप्ता यांचं ‘सौरपुराण’ हे पुस्तक सौरऊर्जेची माहिती करून देतं.  सौरऊर्जेची रंजक माहिती चित्ररूपाने उलगडणारं हे पुस्तक सौरऊर्जा ही पर्यावरणस्नेही कशी आहे, तसेच तिचा वापर कशा प्रकारे करता येईल, हेही सांगतं. ही माहिती समजून घेताना रेश्मा बर्वे यांच्या चित्रांची मोलाची साथ मिळते.
 साधी- सरळ सोपी भाषा आणि त्याला उत्तम चित्रांची साथ, हा या पुस्तकाचा विशेष आहे. सौरऊर्जेची परिपूर्ण माहिती देणारं हे पुस्तक वाचायलाच हवं. लहानग्यांबरोबरच मोठय़ांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
‘सौरपुराण’ – अरविंद गुप्ता, ऊर्जा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ५१, मूल्य – ६० रुपये.

बालसुलभ काव्यविश्व
ज्योती कपिले यांचा ‘रागोबा नि वाघोबा’ हा बालकाव्यसंग्रह म्हणजे लहानग्यांच्या भावविश्वाचा वेध, तसेच त्यांच्या जगात घडणाऱ्या गमतीजमतीच आहेत. या कवितांमध्ये सण येतात, छोटय़ांना सुखावणारा पाऊस येतो, परीक्षेनंतरची हवीहवीशी सुट्टी यांचे बालसुलभ अनुभवच! लहानग्यांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या कविता आहेत.
‘रागोबा नि वाघोबा’ – ज्योती कपिले, दिलीपराज प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ४३,
 मूल्य – ५० रुपये.

फ्रँकलिनच्या मजेशीर गोष्टी
फ्रँकलिन हा कासव  आहे. पण त्याचं विश्व तुमच्यासारखंच! तो शाळेत जातो, खेळतो, दंगामस्ती करतो, तुमच्यासारखाच अंधाराला घाबरतो. फ्रँकलिनच्या गोष्टींमध्ये प्राण्यांचेच विश्व आहे. गाढव, अस्वल, उंदीर.. ती माणसांसारखीच बोलतात, त्यांचं वागणंही आपल्यासारखंच असल्याने ते सारे जवळचेच वाटतात. फ्रँकलिनचं हॉस्पिटलमध्ये भरती होणं, देवाचे आभार मानणं, त्यांच्या पिटुकल्या बहिणीशी असलेलं त्याचं नातं, त्याचा शेजार अशा गोष्टी वाचताना मज्जा येते. दहा पुस्तकांचा हा संच  वाचनीय आहे.
मूळ लेखक- पोलेत बूज्र्वा, अनुवाद- मंजूषा आमडेकर, चित्रकार- ब्रेन्डा क्लार्क
मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य- ५० रुपये (प्रत्येकी).

संस्कारक्षम कथा
लीला शिंदे यांचे ‘मजेदार कथा’, अनिल वाघ यांचे ‘मजेदार खेळांचा खजिना’, मुकेश नादान यांचे ‘पुराणातील श्रेष्ठ बालकथा’,  दि. वि. जोशी यांचे ‘पुराणातील संस्कारकथा’ ही पुस्तके म्हणजे संस्कारक्षम कथांचा खजिनाच.
‘मजेदार कथा’ या पुस्तकातील कथा माणूस, प्राणी-पक्ष्यांच्या विश्वात घेऊन जातात. याचं जग या कथांमधून उलगडलं आहे.
‘मजेदार खेळांचा खजिना’ हे पुस्तक दोन चित्रांतील फरक ओळखा, भाज्यांचा रंग कोणता, सावली कोणाची अशा प्रकारचे मुलांच्या बुद्धीला चालना देणारे पुस्तक आहे.  हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आहे. वेद, पुराणातील बालकथांचा समावेश असलेलं ‘पुराणातील श्रेष्ठ बालकथा’ हे पुस्तकही रंजक आहे.  ‘पुराणातील संस्कारकथा’ या पुस्तकात बालमनं संस्कारित करण्यात उपयुक्त अशा गोष्टी आहेत. ही सर्व पुस्तके साकेत प्रकाशनाची आहेत.