12 December 2019

News Flash

ब्रेन-गेम

येथे तुम्हाला नद्या, हिमनद्या, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेता येईल

दोस्तांनो, भूगोल विषयाच्या पुस्तकात तुम्ही पर्यावरण, वातावरण, भूरचना, जलावरण, लोकजीवन इत्यादींबद्दल प्राथमिक माहिती जाणून घेता. परंतु ही सर्व माहिती आपल्याला वाचून किंवा चित्र

पाहून समजून घ्यावी लागते. विविध देशांनुसार वर्गीकरण केलेली हीच माहिती जर 3D मॉडेल्स, नयनयरम्य व्हिडिओ क्लिप्स यांच्या जोडीने पहायची असेल तर http://www.3dgeography.co.uk/ ही साइट तुमच्या सेवेला हजर आहे.
येथे तुम्हाला नद्या, हिमनद्या, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेता येईल. उदाहरणार्थ, नदी म्हणजे काय? जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी कोणती? यासारखी मनोरंजक माहिती मिळेल. जसे की, इजिप्तमधील नाइल ही सर्वात लांब तर अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन ही सर्वात मोठी नदी आहे. अ‍ॅमेझॉनच्या खालोखाल असलेल्या पाच सर्वा त मोठय़ा नद्या एकत्र केल्या तरी त्यापेक्षा अ‍ॅमेझॉनचे खोरे मोठेच आहे.
येथे नद्यांशी संबंधित वापरले जाणारे विविध शब्द, त्यांच्या अर्थासह समजावून सांगितलेले आहेत. आवश्यक तिथे व्हिडिओज, फोटो, डायग्रॅम वापरून (उदा. जलचक्र) प्रत्येक संकल्पना स्पष्ट केलेली आहे. विशेष म्हणजे अभ्यास पक्का करण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्कशीट दिलेल्या आहेत. त्या डाऊनलोड करून तुम्ही सराव करू शकता. तसेच विविध प्रकारची क्विझ, पझल्सही सोडवण्यासाठी दिलेली आहेत.
शाळेमधे संकल्पना समजावून सांगणारी मॉडेल्स बनवायची असतात. त्यासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पनांचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. उदाहरणार्थ, जमिनीतील प्लेटस् हलल्याने भूकंप कसा होतो हे दाखवणारे मॉडेल येथे वास्तवाची कल्पना देते. याच पद्धतीने ज्वालामुखी, नदीचे पात्र गाळामुळे कसे आक्रसत जाते यासारखी अनेक मॉडेल्स प्रत्यक्ष तयार करण्याची कृती दाखवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना भूगोलामधे रुची आहे त्यांना ही साइट निश्चितच उपयुक्त ठरेल. याशिवाय भूगोलाशी संबंधित खालील दोन साइट्सही तुम्हाला आवडू शकतील.
http://world-geography-games.com/ या साइटवर अनेक इंटरअ‍ॅक्टिव्ह गेम्स आहेत. विविध खंडातील देश, त्यांच्या राजधान्या, समुद्र, पर्वतरांगा, वाळवंटे इत्यांदींचे नकाशावरील स्थान ओळखणे, विविध देशांचे झेंडे ओळखणे असे विविध खेळ आहेत.
http://online.seterra.net/ या साइटच्या माध्यमातून जगाचा नकाशा पक्का करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. मग काय, या सुट्टीत भौगोलिक फेरफटका मारणार ना!
manaliranade84@gmail.com

 

bal-3

First Published on November 15, 2015 12:09 am

Web Title: brain game 2
टॅग Brain,Game
Just Now!
X