बच्चेकंपनी, सध्या माझे दोन आवडीचे जिन्नस बाजारात मुबलक प्रमाणात मिळताहेत. त्यांचा सीझन संपत आलाय, पण अजूनही ते बाजारात लक्ष वेधून घेताहेत. लालचुटूक रसरशीत स्ट्रॉबेरीज् आणि गोडूस चवीची लाल गाजरं. दोन्ही जिन्नस आपण निरनिराळ्या पाककृतींमध्ये वापरतो. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, गाजराचा हलवा, स्ट्रॉबेरी जॅम, दक्षिण भारतात लोकप्रिय गाजराचं थोरण. एक ना अनेक पदार्थ या दोन्ही जिन्नसांपासून बनवता येतात.

पाश्चात्त्य पदार्थामध्ये डोकावताना मला सापडलं की गाजर आणि संत्र, किंवा गाजर आणि लिंबू या काही खास जोडय़ा आहेत. तसंच स्ट्रॉबेरी आणि मिंट किंवा पुदिना ही देखील जगन्मान्य स्वादिष्ट जोडगोळी आहे. आपल्याकडे फारच कमी असणारी कोल्ड सूप्स किंवा थंड सारांमध्ये देखील हे जिन्नस अनेकदा वापरले जातात. मग मी ठरवलं की, हे जिन्नस एकत्र करायचे आणि त्यापासून एक भन्नाट पेय तयार झालं. कॅरट, स्ट्रॉबेरी, मिंट कोल्ड सूप.

चार जणांकरता साहित्य : साधारण पाव किलो स्ट्रॉबेरीज् आणि लाल, हलव्याची गाजरं- केशरी रंगाची इंग्लिश गाजरं नाही बरं का, आपल्याकडची लांब, लाल गाजरंच घ्या. गाजरं निवडताना पातळ किंवा मध्यम आकाराची निवडा. जाड नको, त्यातल्या मधल्या भागाला चव नसते, किंवा अडूक चव असते. पुदिन्याची ताजी १०-१२ पानं. किंचित मीठ, जिरेपूड किंवा मिरेपूड आणि गरजेपुरतं थंड पाणी.

साहित्य : गाजराचा रस काढण्याकरता ज्युसर. स्ट्रॉबेरीचा रस करण्याकरता मिक्सर ग्राइंडर आणि त्याचं भांडं. गाजराची डेखं कापण्याकरता सुरी. सूप बनवण्याकरता मोठं भांडं. सूप ढवळण्याकरता आणि वाढण्याकरता मोठा डाव किंवा पळी.

कृती : सर्वप्रथम गाजरं, पुदिन्याची पानं स्वच्छ धूवून घ्या. गाजराची डेखं, जिथून पानं फुटायला लागतात, तो भाग कापून टाका. हाताने किंवा सुरीने कापून स्ट्रॉबेरीच्या देठाकडील भाग आणि त्यावरची हिरवी पानांची टोपी वेगळी करा. आता या स्ट्रॉबेरीज् स्वच्छ धुवून घ्या. कधीकधी पानांखाली माती असते, त्यामुळे या देठं वेगळ्या केलेल्या फळांना पुन्हा एकदा धुवून घ्यावं लागतं, त्यामुळे देठं वेगळी केल्यावरच एकदा स्वच्छ धुवून घेणं कधीही चांगलं. सगळे जिन्नस स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये किंवा ओल्या फडक्यात बांधून ठेवलेत म्हणजे छान गार होतील. मग पुढच्या कृतीला लागा.

आता घरच्या मोठय़ा माणसांना मदतीला घ्या. ज्युसर किंवा मिक्सर वापरताना अनवधानाने हात, बोटंच चिरायला नकोत, खरं ना! तेव्हा मोठय़ांची मदत आणि देखरेख असलेली बरी. सर्वप्रथम गाजराचा ज्यूस काढून घ्या. मग मिक्सरमध्ये सर्व स्ट्रॉबेरीज्वाटून घ्या. त्यांचा लगदा तयार होईल. त्यात पाणी घालावं लागणार नाही, आणि अगदी बारीक, करू नका. थोडे चिमुकले तुकडे राहिले तरी चालतील. फार वेळ मिक्सरमध्ये फिरवूही नका, अर्ध्या-एक मिनिटांचं काम आहे. आता गाजराच्या ज्युसमध्ये स्ट्रॉबेरीचा रस मिसळून घ्या. त्यातच पुदिन्याची पानं हातानेच तोडून टाका. आता हे मिश्रण चांगलं ढवळून चव घेऊन पाहा. गाजराच्या गोडव्यामध्ये स्ट्रॉबेरीज् जरा आंबट असतील तरी छान मिसळून जातील. या मिश्रमामध्ये चिमूटभर मीठ आणि चवीपुरती जिरे किंवा मिरेपूड घाला. आता चांगलं अर्धा-एक मिनिट हे मिश्रण डावाने ढवळा, जेणेकरून सारे जिन्नस एकजीव होतील आणि स्वाद अधिक परिणामकारक होईल. फारच घट्ट वाटलं तर एक-दोन डाव पाणी घाला, पण शक्यतो पाणी न घालताच प्यायला द्या. हे सूप शक्यतोवर लागलीच प्या, थोडा वेळ ठेवून प्यायलात तर त्याची चव बिघडत जाईल.

गाजरांसोबत स्ट्रॉबेरीसारखंच संत्र देखील उत्तम लागतं. लिंबू पिळल्याप्रमाणे संत्र आडवं कापून, पिळून त्याचा रस काढता येईल. किंवा महादेवावर संत्र्याचा रस काढता येऊ  शकेल. उन्हाळ्याच्या दिवसातही हे सूप करता येईल. स्ट्रॉबेरीसोबत लाल चिटूक रंगाचं हे सूप संत्र्यासोबत छान केशरी रंगाचं दिसतं. तेव्हा या दोन्ही रेसिपीज् करून पहा आणि घरच्यांना चकित करा. मला खात्री आहे, हे आंबट-गोड चवीचं पौष्टिक असं सूप तुम्हाला नक्कीच आवडेल. शिवाय घरचे मोठे तुमच्यावर फिदा होतील ते वेगळंच!

– श्रीपाद

contact@ascharya.co.in