श्रीनिवास बाळकृष्णन

आपल्या ‘कार्टून गाथे’तील दुसरं जुनं व लोकप्रिय पात्र आहे एका पग जातीच्या (pudgy) कुत्र्याचं!

व्होडाफोन मोबाइलच्या जाहिरातीत दिसणारा हाच तो कुत्रा.. ‘बोन्झो’ नावाचा बच्चू कुत्रा!

१९२२ साली, म्हणजे आतापासून ९७ वर्ष आधी ब्रिटिश कॉमिक स्ट्रीप चित्रकार जॉर्ज स्टुडी यांनी तयार केला. तसा १९११ दरम्यान त्याच्या चित्रांतून साधारण असं कुत्र्याचं पिल्लू डोकवत होतंच. पण हा वैशिष्टय़पूर्ण बोन्झो जन्माला यायला दहा वर्ष गेली. याचा एक कान काळा तर एक पांढरा! एक छोटय़ा झुडपासारखी शेपुट, मोठे निळे डोळे, गब्दुल शरीर, मोठं डोकं- त्याला अधिक गोंडस (क्युट) बनवत होतं. तो कधीच चावायचा नाही.

बोन्झो प्राणी असूनही माणसातील राजकारणी, सिनेमातले हिरो-हिरॉइन्स आणि देखण्या स्त्रियांची त्याला जाम ईष्र्या व्हायची. ‘द स्केच’ या मॅगझिनमध्ये तो दिसू लागला. ब्रिटिश मॅगझीनसोबत अमेरिकन मॅगझिनमध्येही त्याने हजेरी लावली. मागील लेखात पाहिलेला ‘फेलिक्स’ बोका आणि हा बोन्झो कुत्रा एकाच वेळी तयार झालेले.

पहिल्या दहा वर्षांत याच्या चित्रांना मुलं तसेच मोठय़ांमध्ये खूप लोकप्रियता मिळाली. कॉमिकव्यतिरिक्त जाहिराती, खेळणी, स्टेशनरी, कोडी, कार मास्कॉट, अ‍ॅशट्रे, पुस्तके, मिठाई यांसारख्या अनेक रूपात तो भेट देऊ  लागला. या वस्तू केवळ बोंझोच्या जन्मभूमीत म्हणजे ‘इंग्लंड’मध्येच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेकोस्लोवाकिया, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि नेदरलँडमध्येही बनवल्या गेल्या, इतका प्रसिद्ध होत होता.

chitrapatang@gmail.com