श्रीनिवास बाळकृष्णन

कार्टून आवडणाऱ्या माझ्या छोटय़ामोठय़ा कार्टून मित्रांनो, कार्टून गाथेचा आजचा शेवटचा लेख. का म्हणून काय विचारता? आपली बहुतेक सगळी कार्टून विदेशी आहेत. आणि अमेरिकेत, युरोपात नाताळ फारच धुमधडाक्यात साजरा होतो. त्याची भलीमोठी सुट्टी सर्वाना असते. त्यामुळे आपली सर्व कार्टूनमंडळी जगभर धमाल करायला निघतात. यावेळी त्यांना विमानतळावर मी सोडायला गेलेलो. त्यातल्या काहींना तुम्ही दिलेले ई-मेलदेखील वाचून दाखवले. ते जामच खूश झाले. मात्र त्यातील काहींनी आमचा उल्लेखच केला नाही म्हणून माझं डोकं खाल्लं.

आम्ही फार ग्रेट नसलो तरी भारतीय मुलं आम्हाला ओळखतात हो! आमच्यासारख्या कार्टूनवीरांबद्दल न बोलणं म्हणजे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्यासारखं होईल म्हणे! तर मग आता मला लिहावंच लागतंय.

‘डोनाल्ड डक’ला त्यांचे भाचे त्रास द्यायचे, पण जेरीस आणलं ते चिप आणि डेल या नावाच्या दोन खारुदादांनी! त्यातला एक चतुर तर एक भाबडा. आता तो चिप की डेल हे सांगता येणं मुश्किल आहे. कारण ते दोघे सारखे दिसतात. हे खूप खातात. फुकट ते पौष्टिक हे त्यांचे जीवनसूत्र! त्यामुळे डोनाल्डच्या फळांच्या शेतीवर, घरातील किचनवर यांचा डोळा. पुढे चिप अँड डेल रेस्क्यू रेंजर्स हे आधुनिक अवतारात आले. साहसी डिटेक्टिव्ह म्हणून नाव कमावलं. हे खारुदादा बघून आपण खऱ्या भित्र्या खारुताईला विसरून जातो.

‘द लायन किंग’ हा तसा गंभीर (सीरियस) कथानक असलेला सिनेमा! पोरक्या झालेल्या सिम्बाला लहानाचा मोठा करणारे टीमॉन आणि पुम्बा या दोघांनी स्वतंत्र कार्टून मालिकेद्वारे आपले अस्तित्व बनवलं. हे कार्टून फारच विनोदी अंगानं जातं. एक चतुर मुंगूस आणि एक भोळा रानडुक्कर! दोघांना आपल्या कळपातून बाहेर काढलेलं असल्यानं या तरुणांचा जंगलात मोकाट उपद्व्याप चालू असतो. त्यात जंगलाचा राजा सिम्बाचे पालक या नात्यानं आणखीनच शेफरले असावेत. यांची गाणी, यांचे परस्परभिन्न व्यक्तिमत्त्व आपल्याला हसवून सोडत.

जापनीज कार्टूनमध्ये कित्रेस्तू, निंजा हातोडी, हागेमारू, पॉकेमोन, बेन टेन हे प्रसिद्ध होतेच. बेन टेन हे सायन्स फिक्शन प्रकारात मोडणारं. त्याच्या जादुई घडय़ाळानं तो एलियन बनायचा आणि एलियनशी लढायचा. हागेमारू म्हणजे शिनचॅनच्या वरचढ! तर ‘कित्रेस्तू’ कार्टून मालिका म्हणजे नोबीताचा सुधारित भाग!

त्याशिवाय कोचिकामे ही पोलिसांवरची कार्टून मालिका. या कार्टूनमध्ये ट्रान्सजेंडर स्त्री पोलीस दाखवली आहे. मोटरसायकलवर बसल्याक्षणीच अंगात हिंमत संचारणारा पोलीसही आहे. आणि यापेक्षा लक्षात राहतो तो कार्टून मालिकेचा नायक कोचिकामे. रेम्याडोक्याचा, धाडसी, आळशी, पैसेखाऊ पोलीस!

फार पूर्वी लागणारा ही-मॅन त्याच्या प्रचंड बॉडीमुळे, शक्तिशाली तलवार व वाघामुळे प्रसिद्ध झालाच, पण त्यातला कवटय़ा महाकाळ म्हणजेच स्केलेटॉन हा व्हिलन लोकप्रिय होता. कुशाग्र आणि चलाख.

टिन टिन, अफाट श्रीमंती असली तर नम्र सुस्वभावी रिची रीच हीदेखील जुनी लोकप्रिय कार्टून्स. त्यांचे एपिसोड आजही यूटय़ूबवर पाहायला मिळतील.

३ ते ६ या वयातील मुलांसाठी पॉवर पॉप गर्ल्स, ओस्वल, थॉमस अँड फ्रेंड, बॉब द बिल्डर ही कार्टून्स होती. पेंग्विनचे ‘पिंगु’ही त्याच्या जवळ जाणारे पण संवादविरहित! माती वापरून स्टॉप मोशन या अ‍ॅनिमेशन प्रकाराने केलेलं. बॉंकर्स, जॉनी ब्राव्हो, डेक्स्टर्स लॅबोरेटरी ही जरा मोठय़ा मुलांची कार्टून्स.

द मास्क आणि मिस्टर बिन ही सिनेमा-टीव्ही मालिकावरून बेतलेली कार्टून मालिका. मुलांना अ‍ॅनिमेशन रूपात पाहायला आवडणार हाच विचार त्यामागे होता.

अलादिन या अ‍ॅनिमेशन सिनेमात अलाउद्दीन त्याच्या दिव्यातल्या जिनीला शेवटी स्वातंत्र्य देतो. सिनेमात जिनी मोठय़ा सुटीवर निघतो. पण मालिकेत मात्र तो पुन्हा मत्रीखातर अलादिनला जॉईन होतो आणि मग पुन्हा ती धमाल सुरू होते.

या सर्वात गावोगावच्या भारतीय मुलांना आणि पालकांना चांगली शिकवण देणारे ‘मीना’ हे कार्टून. हेही खूप आवडीने पाहिलं जायचं. उगाच जादू वगैरे नाही. गावाकडची खरी समस्या मांडणारे, प्रबोधन करणारे हे कार्टून- अस्सल देशी! हनुमान, छोटा भीम, मोटू पतलू ही नवी असली तरी अ‍ॅनिमेशनबाबत तुलनेने कमी दर्जेदार, पण तरीही मुलांच्या आवडीची कार्टून्स!  ही कार्टून निर्मितीची प्रक्रिया खूपच थकवणारी असते. अनेकांची मेहनत तर असतेच, पण मोठाल्या निर्मिती संस्थांचे पैसे यात गुंतलेले असतात, ते केवळ आपल्या मनोरंजनासाठी.

माणसांची जितकी रूपं, जितक्या तऱ्हा तितकी नवी कार्टून्स जन्म घेत राहतील. ही प्रक्रिया न थांबणारी आहे. आपण मोठे झाल्यावरही, आपल्याला लहानपण देण्याची ताकद केवळ कार्टूनमध्ये असते हो!

chitrapatang@gmail.com

(समाप्त)