21 November 2017

News Flash

सुपारीवरचा झटपट गणपती

एका गणपतीसाठी एका गोटी (मार्बल) इतकीच माती लागेल. त्यामुळे खूप माती तयार करू नका.

श्रीनिवास आगवणे | Updated: August 20, 2017 3:17 AM

एका गणपतीसाठी एका गोटी (मार्बल) इतकीच माती लागेल.

छोटय़ा दोस्तांनो, हे मान्य करावेच लागेल, की तुम्ही खूप स्मार्ट व कलाकुशल आहात. मी मात्र जेव्हा लहान होतो त्यावेळी अजिबातच कुशल नव्हतो. हे पाहून माझ्या चित्रकलेच्या बाईंनी सोप्यात सोपा असा गणपती मला शिकवला. त्या वेळी मी केलेला गणपती इतका फुगला की, त्याने सुपारी गिळूनच टाकली.. आणि तो अंडय़ाएवढा झाला. म्हणून मी गणपती करण्यापेक्षा शिकवायला सुरुवात केली. सध्या फोटोत दिसणारे हे ३ गणपती तुमच्याच वयाच्या लहान मुलांनी केलेत. सोप्पं आहे.. बाजारात खूप वेगवेगळ्या आकारांच्या सुपाऱ्या मिळतात. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मोठय़ा आकाराची सुपारी घ्यायची. ती ओल्या फडक्याने पुसावी, म्हणजे त्यावरची धूळ-पावडर निघून जाते.

ती टेबलावर नीट उभी ठेवावी. म्हणजे तिचा तळ सपाट असावा. एका पेनने गणपतीचा साधारण आकार त्यावर चित्रित करावा. डोळे वगैरे काढत बसू नये. ‘एम सील’ किंवा ‘शिल्पीकार’ नावाची माती दुकानात मिळते. दोन्ही सारखाच परिणाम देतात. सुकल्यावर त्या दगडासारख्या कडक होतात. म्हणून ५ मिनिटांच्या आत गणपती करायचाच, हे लक्षात ठेवा.

एका गणपतीसाठी एका गोटी (मार्बल) इतकीच माती लागेल. त्यामुळे खूप माती तयार करू नका. मातीच्या छोटय़ा गोळ्यातून तुम्हाला ८ आकार घडवायचेत. पहिल्यांदा गणपतीच्या पोटासाठी एक गोल बनवा व सुपारीवर चिकटवा. तो असाच चिकटतो, त्यासाठी कुठलाही अतिरिक्त गम लागत नाही.

मग मांडीसाठी २ समान आकारांचे छोटे गोल तयार करून पोटाखाली लावा. आकाराने तितकाच, पण सोंडेसह असणारा डोक्याचा आकार असलेला  पोटावर मध्यभागी लावा. त्याच्या दोन्ही बाजूला अगदी छोटे बारीक गोळे कानासाठी, तर कानाच्या खाली पोटाला चिकटून दोन बाजूला हातासाठी २ गोळे चिकटवा. या वेळी आपण गणपतीला चार हात नको करूयात, चालेल ना!

मग हे सर्व सुकू देत. हे सर्व १० मिनिटांत सुकेल. त्यासाठी सुपारीला फॅनखाली, उन्हात ठेवण्याची आवश्यकता नाही. आपला गणपती तयार झाला.  बाजारात फॅब्रिक किंवा अ‍ॅक्रेलिक रंग मिळतात. त्यात सोनेरी, केशरी किंवा तुम्हाला आवडेल तो एकच रंग विकत घ्या. आणि पूर्ण सुकलेल्या गणपतीवर नीट लावा. तो सुकल्यावर उर्वरित सुपारीला अतिशय कमी प्रमाणात खोबऱ्याचे तेल लावा. त्यामुळे सुपारीला चमक येईल. हा गणपती तुम्ही सोनाराकडे अंगठीसाठी मिळतात तशा (ज्वेलर्स) छोटय़ा पारदर्शक डबीत ठेवून गणपतीच्या दिवसात कोणालाही भेट देऊ  शकता. हा गणपती देवघरात ठेवता आला नाही तरी गाडीत डॅशबोर्डवर, अभ्यासाच्या टेबलवर विराजमान होऊ  शकतो.

श्रीनिवास आगवणे chitrapatang@gmail.com

First Published on August 20, 2017 3:17 am

Web Title: carved supaari ganpati
टॅग Supaari Ganpati