राची बेल वाजली आणि आगीत तेल पडलं. आधीच सकाळपासून चिन्मयीने घरात आरडाओरडा चालवला होता; त्यात आता कोण आलं म्हणून सगळ्यांच्या कपाळावर आठय़ा पडल्या. हातातलं पाककृतीचं पुस्तक lok07सोफ्यावर ठेवत ताईआजीने-म्हणजे चिन्मयीच्या आजीने दरवाजा उघडला आणि ती नकळतपणे आश्चर्याने ओरडणार होती, ‘‘चिनू, कोण आलं पाहिलंस का? बँकआज्जी आली बघ सांगलीहून.’’ पण ताईआजीचे हे शब्द ओठातच विरले, कारण चिन्मयी दारासमोरच उभी राहून प्रचंड वैतागलेल्या चेहऱ्याने दोघींकडे पाहत होती. ‘‘या..’’ चिन्मयीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत ताईआजीने सांगलीच्या आजीचं स्वागत केलं. सांगलीची आजी म्हणजे बँकआजी- जी चिन्मयीच्या वडिलांची आत्या आणि बँकेत नोकरी करायची म्हणून बँकआजी. ताईआजी म्हणजे चिन्मयीची आजी. जी सगळ्यांची ताई होती म्हणून चिन्मयीची ताईआजी. पण चिन्मयी आणि बँकआजी यांचं गूळपीठ होतं. तिला ताईआजीपेक्षा बँकआजी खूप म्हणजे खूपच आवडायची. बँकआजी आली की चिन्मयीचा जोरदार दंगा असायचा, पण आज तिचा मूड काही ठीक नव्हता, हे बँकआजीच्या लक्षात यायला काही फार वेळ लागला नाही. एकंदर परिस्थिती पाहून तिनेही चिन्मयीकडे दुर्लक्ष करायचंच ठरवलं. आणि ‘तुम्हा सर्वाना सरप्राइझ दिलं की नाही?’ वगरे गप्पा ताईआजी, आई-बाबा आणि सागरशी- चिन्मयीच्या भावाशी सुरू केल्या.
खोलीतून चिन्मयी ऐकत होती. ताईआजी खास दिवाळीसाठी आली होती. कारण चिन्मयीची चुलतबहीण मनाली हिचा दिवाळसण होता ना. मनातल्या मनात चिन्मयीने हुश्श केलं. पण परत एकदा तो अर्धवट आकाशकंदील, कसंतरी उरकलेलं भेटकार्ड, उटण्याचा झालेला पसारा, विखुरलेले मावळे.. सगळं सगळं पाहून तिची परिस्थिती ‘आता माझी सटकली’ अशीच झाली. ‘‘आई, आता मी काय करू?’’ तिने खोलीतून जोरातच विचारलं. त्यावर आईनं हॉलमधूनच उत्तर दिलं- ‘‘जे जसं आहे तसंच घेऊन जा.’’ चिन्मयीने चडफडतच दप्तर भरलं आणि पाय आपटतच बाबाच्या बाइकवर जाऊन बसली. ताईआजीला मनातून वाईट वाटलं. पण या वेळी तिला सगळ्यांनी दम भरला होता, की चिन्मयीची बाजू तिने अजिबात म्हणजे अजिबात घ्यायची नाही. चिन्मयी शाळेत गेली आणि ताईआजी, आई आणि सागरने एक एक गोष्ट बँकआज्जीसमोर उलगडायला सुरुवात केली.
दिवाळी जवळ आल्यावर शाळेत दिवाळी सेलिब्रेशनची घोषणा केली गेली. आणि चिन्मयीने दिवाळीसाठी अनेक गोष्टी- जशा की भेटकार्ड, आकाशकंदील, किल्ल्याची तयारी, रांगोळीचे ठसे वगरे वगरे करायचा घाट घातला आणि एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली. बरं, घरातल्या सर्वानी पूर्वीपासूनच ठरवलं होतं- शाळेतले प्रोजेक्ट, सगळ्या सेलिब्रेशनची तयारी वगरे ज्याची त्याने करायची. सागरलाही हाच नियम लागू होता. आई चिन्मयीला म्हणत होती- ‘जे काही तुला मनापासून करायला आवडेल ते तू कर. इतर गोष्टींसाठी तुझ्या मित्रमत्रिणींची मदत घे.’ पण हे ऐकेल तर ती चिन्मयी कसली! ती एकटीच सगळं करायला निघाली होती आणि सगळ्याचा बोजवारा उडाला म्हणून सकाळपासून आकांडतांडव आरंभलं होतं. आवडती बँकआजी आली तरी तिच्याकडे पाहिलंही नव्हतं. हे सारं ऐकल्यावर बँकआजीने गालातल्या गालात हसून आपला मोर्चा सागरचं कॉलेज, ताईआजीची तब्येत, आईचं ऑफिस वगरेकडे वळवला होता.
सगळं आवरेपर्यंत संध्याकाळ झालीच आणि चिन्मयी शाळेतून परतली. बाईसाहेबांचा मूड काही फारसा ठीक नव्हता, पण सकाळएवढा वाईटही नव्हता. तिलाच काय ते बोलू दे म्हणून कोणी फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. दूध वगरे पिऊन झालं आणि दोन्ही आज्या बागेत जायला निघाल्या, तशी चिन्मयीही त्यांच्याबरोबर निघाली. जाताना सारख्या मनालीच्या दिवाळ-सणाच्याच गप्पा चालल्या होत्या. मावशीआजी म्हणे अनारसे मस्त करते म्हणून ती ते करून आणणार होती. पुण्याची आत्या कशिदा काढून साडी आणणार होती. चिपळूणच्या मावशीच्या करंज्या सुंदर असतात म्हणून ते काम तिच्यावर सोपवलं होतं, वगरे वगरे. सारं काही चिन्मयी ऐकून न ऐकल्यासारखं करीत होती. बोलता बोलता तिघीही बागेत पोहोचल्या. तिथे चिन्मयीचं मित्रमंडळ हजर होतंच. त्या साऱ्यांचा ताबा बँकआजीने कधी घेतला, ते समजलंच नाही. कित्ती मस्त मस्त खेळ घेतले तिने आणि छान छान गाणीही शिकवली. शेवटी उद्या सगळ्यांनी चिन्मयीच्या घरी भेटायचं, या अटीवरच सगळे आपापल्या घरी जायला कबूल झाले. नाही तर बँकआजीला सोडून कोणालाही जायचं नव्हतं घरी.
दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजल्यापासूनच सारं बालगोपाळ मंडळ चिन्मयीच्या घरी जमायला लागलं आणि बँकआजीने कित्ती कित्ती वस्तू काढल्या आपल्या पोतडीतून. त्यात नरकासूर बनवण्याचं साहित्य होतं, रांगोळीचे रंग होते, ग्रीटिंग बनवायचे कागद नि रंग होते, कोरी एन्व्हलप्स होती, किल्ला करायला पुठ्ठे, मावळे, वाळू, माती होतं, आकाशकंदिलाचं साहित्य होतं, आंबेहळद, चंदन, गवलाकचरा वगरे उटण्याचं साहित्य होतं. आणि मुख्य म्हणजे ज्याला जे करायला आवडेल ते करायची मुभा होती. बघता बघता सारी वानरसेना कामाला लागली. मिहीर आणि त्याच्या ग्रुपनं मोराची सुंदर रांगोळी काढली, तर राजसीने ठिपक्यांची रांगोळी काढून रंग भरले. मानस, हर्षदा, दीपिका वगरेंनी लहान-मोठे आकाशकंदील, चांदण्या वगरे बनवल्या. मंदार, चिन्मयी, राजस यांनी सुंदर सुंदर ग्रीटिंग्ज् बनवली. प्राजक्ता, अथर्व, कुणाल वगरे सारे किल्ला करण्यात एवढे गुंग झाले होते की, ताईआजी त्यांच्यात कधी सामील झाली हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. वरुण, आíचस यांनी ग्रीटिंग्ज्साठीच्या पाकिटांवर छान सजावट केली. मीनल, अमला, कीर्ती यांनी सुंदर उटणं बनवून त्याची पाकिटं भरली आणि सर्वाच्या हातभारातून अक्राळविक्राळ नरकासूर तयार झाला. शेवटी आदित्यने त्याला लालभडक जीभ लावली तेव्हा त्याचं रूप बघून सारे क्षणभर हबकलेच. बघता बघता काही तासांत सारी दिवाळीच चिन्मयीच्या अंगणात उभी राहिली.
सारं मस्त झालं.. तेव्हा बँकआजीने सगळ्यांना एक मस्त आईस्क्रीम पार्टी दिली. आईस्क्रीम खाता खाता ती सांगत होती की, अनेक हातांमध्ये ही निर्मितीची किमया असते आणि ती किमया जाणून घेण्यासाठीच आपले सण असतात. म्हणूनच सगळ्या सणांना आपण सगेसोयरे, इष्टमित्र, नातेवाईक सारे एकत्र जमतो, एकत्र राहतो. शाळेमध्ये सण साजरे करण्यामागेही हाच उद्देश असतो. सर्वाना एकत्र कामाची सवय लागावी. स्वत:ला जे येत असेल- म्हणजे स्वत:मध्ये जे कौशल्य असेल ते ओळखण्याची आणि विकसित करण्याची संधी मिळावी. घरीही दिवाळीसारखे मोठे सण अनेक गोष्टींच्या मिलाफातून साजरे करण्यामागे हाच उद्देश असतो. त्याचा मोठेपणीही उपयोग होतो बरं का.’’
‘‘तो कसा?’’ सारे प्रश्नांकित नजरेने पाहू लागले.
तेव्हा बँकआजी म्हणाली, ‘‘आज बघा नं, माझ्या बॅँकेतले सगळे एकत्रित काम करतात म्हणून मला सुट्टी मिळाली. बरं, नेहमीही आम्ही आमचं आवडतं काम वाटून घेतो म्हणून आनंद आणि उत्साहात काम पार पडत असतं. तेव्हा आता येणाऱ्या दिवाळीचाही तुम्ही असा फायदा करून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनीही असंच सांगितलंय-
मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी॥
त योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥
म्हणजे अविवेकाचा काळा अंधार नष्ट करते आणि विवेकाचे दीप उजळते, ती ही ज्ञानाची दिवाळी. सारं समजून चिन्मयीने कान पकडत ‘‘आज्जी, माझी चूक झाली बरं,’’ असं म्हटलं आणि एक ज्यादाचं आईस्क्रीम पदरात पाडून घेतलं.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता