21 September 2020

News Flash

खरी मजामस्ती

तेजस चिडून त्याच्या खोलीत निघून गेला. आज त्याला आईचा खूप राग आला होता.

भारती भावसार

‘‘आई, पण असं का करतेस? मी तुझ्या फोनला हात लावला की तू ओरडतेस. तू आणि बाबा नेहमी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकता, सगळ्यांशी गप्पा मारता. मग मी व्हॉट्सअ‍ॅप चालू केलं की काय गं बिघडतं?’’ पाचवीतल्या तेजसचा प्रश्न ऐकून आई वैतागली.

त्यांच्या घरातला हा नेहमीचाच वाद होता, पण आज आईचा नूर काहीसा वेगळाच होता.

‘‘तेजस, नाही म्हणजे नाही. कारण मला विचारू नकोस आणि मुळात वाद घालूच नकोस. तुला हवा असलेला व्हिडिओ गेम आणून दिलाय ना तुला, तरी काय अडतं रे तुझं मोबाईलशिवाय?’’ आईचा पारा अधिकच चढला होता.

तेजस चिडून त्याच्या खोलीत निघून गेला. आज त्याला आईचा खूप राग आला होता. सकाळपासून त्याची चाललेली चिडचिड आजी बघत होती. मोबाईलचा विषय त्याच्या मनातून काही जात नव्हता. आजी दोघांचं भांडण शांतपणे ऐकत होती. तेजसला आता समजविण्यात काही अर्थ नाही हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे सकाळी ती शांतच राहिली. त्या दोघांच्या भांडणात मधे पडली नाही. दुपारी जेवणं झाल्यावर आजी आणि तेजस दोघेच घरी होते. आजीने हळूच सकाळचा विषय काढला तेव्हा तेजसच्या मनातला राग हळूहळू बाहेर येऊ लागला.

‘‘आजी, हे सगळे मोठे स्वत:ला काय समजतात गं? घेतला मी मोबाईल तर काय बिघडलं? मी थोडीच तो दिवसभर वापरणार होतो? आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक

वाईट असेल तर मग आई-बाबा ते का वापरतात? मी काही आता लहान नाही, पाचवीत गेलोय. मग..’’

‘‘अच्छा! म्हणजे मोबाईल न मिळाल्यामुळे तुला आईचा राग आलाय तर..’’ आजी म्हणाली.

‘‘पण मला सांग, तू मोबाईल घेऊन काय रे करणार होतास?’’

‘‘अगं आजी, साधना काकू आणि मनोज काका काश्मिरला गेलेत. त्यांचे फोटो पाहणार होतो.’’

‘‘बरं, हे तू आईला सांगितलंस का? फक्त फोटो पाहण्यापुरता मोबाईल दे, असं म्हणाला असतास तर आईने सहज दिला असता फोन.’’ आजी समजावणीच्या सुरात म्हणाली.

‘‘पण आजी, त्यासोबत व्हॉट्सअ‍ॅप पाहिलं तर काय बिघडलं असतं?’’ तेजस जरा चिडूनच म्हणाला.

‘‘म्हणजे बघ हं, काय बिघडलं असतं हे मला सांगता येणार नाही. पण मला सांग, आई-बाबा फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप वगरे का वापरतात?’’ आजी म्हणाली.

‘‘त्यांच्या ऑफिसचे निरोप वगरे येतात. व्हॉट्सअ‍ॅपवर तर आईच्या शाळेचा ग्रुप आहे, त्यावर आईच्या गप्पा सुरू असतात.’’ तेजस उत्तरला.

‘‘तुझ्या एक लक्षात आलं का, आईच्या मित्र-मत्रिणी व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारतात, कारण ते सगळे दूरदूरच्या गावी आहेत. किंवा जे जवळ आहेत त्यांना रोज भेटणं शक्य नाही म्हणून ते अशी माध्यमं वापरून गप्पा मारतात.’’ आजी तेजसची समजूत काढू लागली.

‘‘पण तुझी मित्रमंडळी तर तुला रोज भेटतातच की. सागर, अमोघ, रॉकी, वर्षां, खुशी सारेच तुला रोज भेटतात.’’ तेजसने आजीच्या बोलण्याला मानेने होकार दिला.

‘‘आणि शिवाय तुझे काही स्विमिंग क्लासचेही मित्र आहेत. त्यांनाही तू रविवारी भेटतोस. या सगळ्यांसोबत वेळ घालवतोस, मजा-मस्ती करतोस. बरोबर की नाही? ही मजामस्ती आई-बाबा करतात का?’’

‘‘नाही. पण आईच्यासुद्धा काही मत्रिणी घरी येतातच की!’’ तेजसने जरा फुरंगटूनच प्रश्न विचारला.

‘‘हो, पण त्या रोज येतात का? नाही ना! आणि अरे ऑफिस, घर, तुझी शाळा, तुझे प्रोजेक्ट, स्पर्धा असे सगळे करून आई-बाबा थकतात. आणि थोडा विरंगुळा म्हणून ते फोन वापरत असतील तर त्यांनी का वापरू नये फोन? तेजस, तुम्ही याक्षणी सगळ्यात सुखी आहात, कारण मित्रांसोबत तुम्ही रोज शाळेत दंगा करता, मदानावर याची-त्याची खोड काढता. खेळ, मजामस्ती, गोंधळ हेच तुमचं जग आहे. परवा त्या रजतची तुम्ही किती रे चेष्टा केलीत? पुरता रडवेला झाला होता तो.’’आजीला रजतची गोष्ट कळाल्याचे लक्षात आल्यावर तेजस ओशाळला.

‘‘तसेच स्वीमिंग क्लास आहेच- जो खास तुझ्या आग्रहाखातर आईने लावलाय. शिवाय तुला चित्रकला आवडते, पण अलीकडे किती कमी चित्रं काढतोस तू! सारखं मोबाईलवर गेम्स खेळण्यात रमलेला असतोस.’’ तेजसला आजीचं म्हणणं थोडं थोडं पटू लागलं होतं.

‘‘आणि तू विसरलास का, अमोघदादाकडून हस्तकलेतून बनवलेले विविध प्राणी करायला शिकायचे आहेत. त्यासाठी मे महिन्याची वाट का पाहायची? ते आत्ताच शिकून घे की! कित्तीतरी पुस्तकं वाचायची आहेत. गाणी ऐकायची आहेत. कुणी नवीन भाषा शिकतंय, कुणी नवीन नृत्यप्रकार. तुला फिरायला जायला आवडतं म्हणून आईने तुला चांगल्या पर्यटन स्थळांची माहिती गोळा करायला सांगितली होती ना, त्याचं काय झालं? बघ, आता इतक्या गोष्टी करायच्या आहेत, पण या धमाल मस्तीपेक्षा तुला फोन वापरणं अधिक भारी वाटत असेल तर मग ठीक आहे!’’ आजी उगाच त्याची फिरकी घेत म्हणाली.

..आणि खरंच तेजसला जाणवलं की इतक्या छान छान गोष्टी करायच्या तर अजून कुठल्याच गोष्टीला आपण सुरुवात केलेली नाही. आता एक नवीन चित्रं काढून आजी आणि आई-बाबांना सरप्राइज द्यायचं असं ठरवून तेजस आपल्याच विचारात नकळत चित्रकलेची वही कधी उघडून बसला ते त्यालाही कळलं नाही.

bkhairnar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:03 am

Web Title: children related article
Next Stories
1 सर्फिग : नाटुकल्या आणि शॉर्ट फिल्म्स 
2 लिंबूटिंबू चटकदार : फंडू फालुदा
3 ..ओम आणि मुंगीबाई
Just Now!
X