आजकाल अथर्व आणि आर्या या भावा-बहिणीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. नेहा ही त्यांची शेजारी आणि आर्याची बेस्ट फ्रेंड. आर्या आपल्यापासून लपवून काहीतरी वेगळ्याच कामात गुंतलीय आणि आपल्याला सांगत नाहीए याचा नेहाला खूप म्हणजे खूपच राग आला होता. तसं तिने आपल्या आईला बोलूनही दाखवलं. पण आईने ‘तुमची भांडणं ना, माहित्येय मला!’ असं म्हणत तिला उडवूनच लावलं होतं. त्यामुळे नेहाची फार चिडचीड होत होती. काहीही करून आर्या नि अथर्व दोघे मिळून कोणतं एवढं मोठं काम करतायत ते समजून घ्यायचा तिने चंगच बांधला होता. म्हणून ती आरतीकाकू- म्हणजे आर्या नि अथर्वची आई ऑफिसमधून यायच्या वेळी गेटपाशी उभी राहिली. नेहा आल्या आल्या तक्रार करणार इतक्यात काकूच तिला म्हणाली, ‘‘अगं, तुलाही नाही घेत का ते दोघे खेळायला? का खेळच बंद केलाय त्यांनी? काय बाई चाललंय त्या दोघांचं काही कळतच नाहीए. बरं, स्वीटकॉर्न खाणारेस का तू, तर चल माझ्याबरोबर.’’

‘‘नाही, नकोय मला.’’ असं पुटपुटत नेहा आपल्या घराकडे वळली.

‘‘अगं, अगं, तुला आवडतात ना, मग चल की!’’ आरतीकाकूच्या हाकांकडे आणि बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत खांदे पाडून निघालेली तिची पाठमोरी आकृती पाहताच काकूलाही वाईट वाटलं. पण सातवीतली आर्या नि पाचवीतला अथर्वही काही फार लहान नव्हते. आणि ते म्हणतायत ना, त्यांना काहीतरी विशेष करून दाखवायचंय; मग त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवाच होता. हे सगळं पटून आरतीकाकूने मानेला एक बारीकसा हेलकावा दिला आणि ‘यांची लुटुपुटुची भांडणं म्हणजे ना..’ असं म्हणत ती गालातल्या गालात हसली आणि आपल्या घराकडे वळली.

घरात शिरली तर हॉलमध्ये चित्रकलेच्या साहित्याचा हा पसारा पडलेला! रंगीत पेन्सिलवर पाय पडून ती तोंडघशीच पडायची; पण थोडक्यात वाचली, एवढंच.

‘‘आता अगदी एक-दोन दिवस. नंतर नाही असा पसारा करणार. प्लीज, रागावू नकोस ना आई.. प्लीज प्लीज.’’ अथर्व-आर्याच्या मनधरणीपुढे तिचा राग विरघळला आणि तिनेच त्यांना हॉल आवरायला मदत केली. काहीतरी चित्रांचं वगैरे चाललं होतं म्हणजे मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा किंवा टीव्हीवर कार्टून्स पाहण्यापेक्षा नक्कीच बरं, असा विचार करत ती कामाला लागली. मुलंही अभ्यासाला बसली.

शेवटी तो दिवस उजाडला. या वर्षीचा शेवटचा रविवार. आर्या नि अथर्वने मित्रमैत्रिणींना घरी बोलवायची आईकडे आधीच परवानगी मागितली होती. त्यांच्यासाठी मस्तपैकी पिझ्झा नि आईस्क्रीमची फर्माईशही बाबांकडे केली होती. थोडय़ाशा नाखुशीनेच नेहाही आलेली पाहून आरतीकाकू हसत हसतच आपल्या कामाला वळली. किचनमध्ये काम करत असताना तिचे कान मात्र बाहेरच होते. सगळे जमले आणि आर्याने सुरुवात केली. ‘आज आम्ही पुढच्या वर्षांसाठी एक गंमत आणलीये तुमच्या-आमच्या सर्वासाठी. ती हॉलमधल्या या पडद्यामागे आहे. अथर्व तुम्हाला ती दाखवेलच. ही गंमत आम्हाला टीव्ही पाहताना सुचली. दत्तजयंतीच्या दिवशी चॅनेल सर्फिग करताना मला नि अथर्वला एक गोष्ट कळली, ती म्हणजे दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते. टीव्हीवर त्यांची यादी व त्यांचे कोणते गुण दत्तात्रेयांना आवडले आणि त्यांनी ते अंगीकारले याबाबची माहिती दाखवत होते. आणि ते निसर्गातले- म्हणजे त्यांच्या परिसरातले होते, असंही वारंवार सांगत होते. मग आम्ही ठरवलं की, आपणा सर्वासाठी आपण का बरं असे गुरू शोधून काढू नयेत? म्हणून आम्ही आपल्या आसपासच्या गुरूंचा शोध सुरू केला. आम्हाला जमतील तशी त्यांची चित्रे काढली. आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्यातले एक किंवा दोन महागुरू निवडावेत. सगळ्यांचे गुण अनुकरणीय आहेतच; पण महागुरूचा गुण आपण कटाक्षाने आचरणात आणावा. तिने असं म्हणताच अथर्वने पडदा सरकवला आणि ‘‘अय्या! कित्ती क्यूट!’’ असा नेहाचा सगळ्यांपेक्षा मोठ्ठा आवाज किचनपर्यंत पोहोचला. ‘काय केलंय मुलांनी पाहू तरी!’ असं मनाशी म्हणत आरतीकाकू लगबगीने बाहेर आली आणि खिडकीतला मोठ्ठा तक्ता पाहून अचंबितच झाली. बापरे, आजूबाजूचे कित्ती गुरू शोधले होते मुलांनी. आई-बाबांपासून वॉचमन काका, कामवाल्या मावशी, विक्रेते, रस्त्याशेजारचं सुरूचं झाड ते अगदी सांताक्लॉज, इंटरनेट नि व्हॉट्स अ‍ॅप सगळेच होते त्यात. प्रत्येकाचं जमेल तसं चित्र आणि वैशिष्टय़ मस्तपैकी लिहिलं होतं आणि साऱ्या फ्रेण्डस्ची ‘महागुरू’ ठरवण्यासाठी धावपळ चालली होती. ती मजा पाहत असतानाच आरतीकाकू म्हणाली, ‘माझी मुलं आता खरंच मोठ्ठी झाली बरं का वाढत्या वर्षांबरोबर!’ हेच नेहाच्या आईला सांगण्यासाठी तिने फोन उचलला.

joshimeghana.23@gmail.com