‘सांगायला काय जातंय?’.. दातओठ खात किंवा हातपाय आपटत म्हटलं जाणारं हे वाक्य. कुणी काही सुचवलेलं एकतर आपल्याला आवडत तरी नसतं किंवा नावडत्या सूचना ऐकण्याची आपल्याला इच्छाच नसते. या दोहोंमधल्या एकातून या हितशत्रूचं रोपटं मनात मूळ धरतं. बहुधा हे ज्या व्यक्तीबाबत म्हटलं जातं ती वयाने आणि मानाने मोठी असणारी व्यक्ती असते. अनुभवाच्या, आपुलकीच्या किंवा अधिकाराच्या जोरावर ती काही सुचवू पाहते. जसा- एखादा बदल, एखादी नवी सुरुवात, एखादा प्रकल्प वा तसंच काही. त्या वेळी झटकन् असं विधान केलं जातं, तेही अगदी डोळेझाकपणे. मला ती कृती करणं कित्ती कठीण आहे, ते मला कसं जमणार नाही आणि ती कृती कष्टप्रद किंवा त्रासदायक आहे, पण सांगणारी व्यक्ती ती कशी क्षुल्लक ठरवतेय, तिला त्यामागच्या कष्टांची वा त्रासाची जाणीव नाहीएच मुळी.. अशा सगळ्या एकमार्गी विचारांमधून हा हितशत्रू नागोबासारखा फणा काढतो. या फण्याला ठेचायचं असेल तर हा एकांगी विचार बाजूला सारला पाहिजे आणि ‘हे सारं ते मला का सांगतायत’ किंवा ‘‘मला’च का सांगतायत’ याचा विचार करा. या छोटय़ा विचारापासून हे जे काही सांगतायत त्यातलं किती मला शक्य आहे, कोणत्या प्रकारे ते पूर्णत्वास नेता येईल, जे मला येणार नाही किंवा जे माझ्या आवाक्यापलीकडचं असेल त्यासाठी त्यांचीच मदत मी कशी घेऊ शकेन, असा जर साखळीबद्ध विचार केला तर- ‘यांचं काय जातंय सांगायला’ पासून ‘हे सांगतायत ते करून पाहायला काय हरकत आहे?’  इथपर्यंतचा सुंदर प्रवास आपण करू शकतो. मग काय, करायची ना या प्रवासाची सुरुवात आजपासूनच!

joshimeghana231@yahoo.in