News Flash

व्यत्यय

मिकी माऊस, डोनल्ड डक, छोटा भीम, मोगली अशा जवळजवळ सगळ्याच कार्टून चॅनेल्सवरच्या मंडळींची हजेरी लागली होती

सुटी लागल्या लागल्या मुलांनी जेव्हा कार्टून्स पहायला म्हणून टी.व्ही. ऑन केले, तेव्हा सगळ्या कार्टून चॅनेल्सवर नुसत्या मुंग्या इकडून तिकडे धावत होत्या. आणि फक्त खरखर ऐकू येत होती. बऱ्याच मुलांच्या आई-बाबांना आठवले ते पंचवीस-तीस वर्षांपूर्वी टी.व्ही. बंद पडण्याचे दिवस! पण या डिजिटल युगात असं होणं अगदीच अजब होतं. टी.व्ही. नाही म्हणून मुलं एकदम बेचन झाली. घरोघरच्या आई-बाबांना तर भलतंच टेन्शन आलं. कारण आता मुलांना रमवण्याचा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला होता.

पण असं झालं तरी का होतं? कार्टून्सच्या चॅनेल्सवर असं व्यत्यय म्हणजे ‘ब्रेक’ का बरं यावा?

..तर मिकी माऊस, डोनल्ड डक, छोटा भीम, मोगली अशा जवळजवळ सगळ्याच कार्टून चॅनेल्सवरच्या मंडळींची हजेरी लागली होती ती शहराच्या धकाधकीपासून लांब- एका हॉलिडे रिसॉर्टवर..

‘‘मुळात मुलं सुटय़ांमध्ये फक्त कार्टून बघतात आणि इतर काही करत नाहीत यात आपला काय दोष?’’ मिकी माऊस एक मोठा चीत्कार देत म्हणाला.

‘‘अगदी बरोबर म्हणालास मिकी! म्हणूनच तर आपण सगळे या चॅनेल्सचा निषेध करून इथे जमलोय सुटी एन्जॉय करायला. मुलांना सुटी म्हणजे आपल्याला ‘ओव्हरटाइम’!’’ रिसॉर्टच्या स्वििमगपूलमधून बाहेर येत डोनल्ड डक म्हणालं आणि चिडून स्वत:शीच काहीतरी पुटपुटलं. मुळातच चिडका-बिब्बा तो!

‘‘अरे, पण त्याचा तोटा आम्हा चॅनेलवाल्यांना का?’’ तितक्यात अंकल स्क्रुज मेकडक- हो हो, तेच ते जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती डक- तिथे येत म्हणाले. त्यांच्या मागोमाग ुई, ल्युई आणि डय़ुई ही पिल्लू बदकं नेहमीप्रमाणे होतीच. अंकल स्क्रुजचं स्वत:च्या मालकीचं एक कार्टून चॅनेल असल्यामुळे त्यांनी असं म्हणणं अगदीच स्वाभाविक होतं.

‘‘अंकल स्क्रुज, तुम्ही नेहमी फक्त फायदा बघता सगळ्यांत! पण तुमच्या या तीन नातवंडांकडे सुद्धा पहा जरा! म्हणता म्हणता भिंगाचे चष्मे लागलेत त्यांना!’’ एकाएकी मोगली कुठल्याशा झाडावरून खाली टुणकन् उडी मारत म्हणाला.

‘‘खरंय! मी नेहमी पशांचाच विचार करतो! पण त्यात माझी काय चूक? हल्लीच्या मुलांना तरी स्मार्टफोन, टी. व्ही., व्हिडीओ-गेम्स यांपलीकडे काही सुचतं का? हे तिघेही त्यांच्यातलेच! पुस्तकं वाचणं, मदानी खेळ खेळणं हे सगळं अगदीच दुरापास्त झालंय.’’ स्क्रुज मेकडक वैतागून म्हणाले.

‘‘असं का म्हणता अंकल स्क्रुज? भर उन्हाचं आम्ही मुलं कुठे खेळायला जाणार?’’ ुई, ल्युई आणि डय़ुईचा कोरसमध्ये प्रतिकार.

‘‘मग कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, स्क्रेबेलसारखे खेळ खेळा घरबसल्या. खरं तर याला जबाबदार आम्ही चॅनेलवाले नसून या कार्टून्सचे जनकच म्हणायला हवेत. त्यांनी आपल्याला निर्माण केलं नसतं तर आजची ही भीषण परिस्थितीच उद्भवली नसती.’’ स्वभावाप्रमाणे अंकल स्क्रुज त्यांचा हेका सोडायला तयार नव्हते.

‘‘अंकल स्क्रुज, १९२८ मध्ये जेव्हा वॉल्ट डिस्नी आणि अबे आयवर्क्‍स यांनी माझी पहिल्यांदा निर्मिती केली, तेव्हा तो माणसाच्या विचारशक्तीचा एक विलक्षण मोठा आविष्कार होता. अलीकडच्या काळात निर्माण झालेली मल्टीमीडिया प्रणाली, व्ही. एफ. एक्स. किंवा अगदी मोबाईल, स्मार्ट फोनसारखी उपकरणं हेसुद्धा माणसाच्या बुद्धिमत्तेची पावतीच आहेत. प्रश्न आहे तो या सगळ्या माध्यमांचा वापर कसा होतो त्याचा.’’ सगळ्यांना मिकीच्या बोलण्यात तथ्य वाटलं.

‘‘मिकी, आता हेच बघ ना! म्हणता म्हणता तूसुद्धा नव्वदीला येऊन पोहोचलायस. नंतरच्या काळात आमच्यासारखे कितीतरी नवीन नवीन कार्टून्स उदयास आले. ओघाने तुझ्यातही बरेच बदल झाले. पण तुझा आयुष्याबद्दलचा आनंदी दृष्टिकोन मात्र तसाच राहिला. सगळे हेच विसरतात की कार्टून फक्त बघण्यासाठी नाहीत तर आपल्याकडून शिकण्यासारखं देखील खूप काही आहे!’’ टेबलापाशी आपल्या मित्रांबरोबर थंडगार कोकम सरबत पीत बसलेला छोटा भीम उदाहरण देत म्हणाला.

‘‘म्हणजे कसं रे भीम?’’ मिकीचा प्रश्न. आता सगळेच लक्ष देऊन ऐकू लागले.

पण भीम पुढे काही म्हणणार एवढय़ात कॉम्प्लिमेंटरी लंच सव्‍‌र्ह झाला आणि रंगात येत आलेली ही सभा तात्पुरती बरखास्त झाली. खरंच! कार्टून्सकडून आपण काही शिकू शकतो?

* * * * *

संध्याकाळच्या स्नॅक्सला जेव्हा सगळे भेटले तेव्हा जेवणाच्या वेळी अर्धवट राहिलेला विषय पुन्हा छेडला गेला..

‘‘मिकी, मी दुपारी म्हणत होतो की आजकालची ही मुलं अगदी छोटय़ा-छोटय़ा कारणांनी निराश होताना दिसतात. पण तुला पहा ना! अनेक एपिसोडमधून तू तुझ्यापुढे आलेल्या प्रत्येक अवघड प्रसंगातून नेहमी मार्ग शोधताना दिसतोस. पुढे येऊ घातलेल्या आव्हानांना सामोरं जाण्याची तुझ्याकडे आधीपासूनच तयारी असते. ‘पॉझिटीव्ह अ‍ॅटीटय़ुड’चा केवढा मोठा विचार तू देतोस! त्याचप्रमाणे तुझ्या चेहऱ्यावर नेहमी झळकत असलेलं स्मितहास्य तुझ्या इतर मित्रांनाही आनंद देतो. तुझ्याकडला संयमही शिकण्यासारखा आहे. लहान वयात जर मुलांनी हे आत्मसात केलं तर त्यांचंच आयुष्य पुढे किती सोपं होईल! नुसती ‘टाइमपास’ म्हणून आपली कार्टून्स पाहण्यापेक्षा ही मुलं, अगदी त्यांचे पालकसुद्धा बरंच काही शिकू शकतात, शिकवू शकतात आणि तेसुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात.’’ छोटा भीम पोटतिडिकीने म्हणाला.

‘‘परफेक्ट भीम! अगदी साध्या गोष्टी जसं की आपली खोली, पुस्तकं, अभ्यासाचं टेबल नेटकं ठेवणं, मोठय़ांचा आदर करणं, सगळ्यांशी प्रेमानं बोलणं अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या कार्टून्समधून शिकवत असतो. मात्र, समोरचा ते कसं घेतो यावर सगळं अवलंबून असतं.’’ मोगली म्हणाला. निसर्गाच्या सान्निध्यात बालपण घालवलेला मोगली जेव्हापासून माणसाळला तेव्हापासून माणसांच्या वाईट सवयींची प्रचीती त्यालाही आली होती.

‘‘पण माझ्या एपिसोड, फिल्म्समधून मी चुकाही करताना दिसतो.’’ मिकी उद्गारला.

‘‘मग त्यातून काय करू नये, हे शिकण्यासारखं आहे. आता माझंच बघा की! मला चिडका बिब्बा म्हणतात. मी इतकं तोंडातल्या तोंडात बोलतो की समोरच्याला काहीच कळत नाही. मी हाती घेतलेलं काम पूर्ण न करता बऱ्याचदा अर्धवट सोडून देतो. चिडणं, अस्पष्ट बोलणं, हाती घेतलेली गोष्ट पूर्ण न करणं- या गोष्टी आपण करू नयेत हे जर मुलं शिकली तर तेच माझ्या कॅरेक्टरचं यश आहे.’’ डोनल्ड डक बऱ्याच वेळाने पुटपुटला. सुदैवाने त्याचं बोलणं यावेळी सर्वाना बऱ्यापकी समजलं.

‘‘हो! पण तू एक अत्यंत विश्वासू मित्र आहेस, डोनल्ड!’’ मिकी डोनल्डच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

‘‘आणि सारखं काहीतरी नवं करू पहात असतोस! यश मिळो न मिळो, तुझा प्रयत्न सुरूच असतो. बगीराही मला सारखं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मी जेव्हा त्याचं ऐकत नाही तेव्हा बरोबर संकटात सापडतो. आणि पुन्हा बगीराच मला त्यातून सोडवतो. थोडक्यात काय, तर आपण नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी तत्पर असायला हवं. सुटीचा वेळ त्यासाठीच तर असतो.’’ मोगली विचार करत म्हणाला.

‘‘म्हणजे, या मुलांना अशी दृष्टी देणारा बगीरादेखील प्रत्येक घरी असायला हवा, नाही का? एकेकटे असल्यामुळे हल्ली मुलं एकतर व्हिडीओ गेम्समध्ये डोकं खुपसून असतात, नाहीतर त्या पोकेमॉन खेळासारखे जीवघेणे खेळ खेळत बसतात.’’ मिकीच्या बोलण्यावर विचार करताना सगळेच शहारले.

‘‘सुटीमध्ये टी. व्ही. जरूर पहावा, पण त्याचबरोबर नवीन काहीतरी शिकायला सुद्धा हवं. चित्रकला, नाटक, पपेट्री, अ‍ॅनिमेशन, संगीत असे कितीतरी पर्याय हल्ली उपलब्ध आहेत. त्यातून मुलांनी स्वत:ला चाचपून पहायला हवं. कदाचित ते शिकता शिकता कशाची तरी गोडी निर्माण होईल. यंदा तर आमच्या ढोलकपूरमध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून पुस्तक वाचनाचं शिबिर सुरू केलंय. अशी चांगल्या दर्जाची शिबिरं शोधून तिथेही मुलं जाऊ शकतात.’’ भीम अधिकारवाणीने म्हणाला. त्याचा मुळी स्वभावच इतरांना मदत करण्याचा!

‘‘मी तर सुटीत माझं हस्ताक्षर सुधारायचं ठरवलंय.’’ छुटकी निर्धाराने म्हणाली.

‘‘थोडक्यात काय, तर ही टी. व्ही. नावाची खिडकी असो किंवा कम्प्युटर मधील िवडोज्, मुलांना या डिजिटल खिडक्यांमधून देखील स्वत: मधले गुण-अवगुण ‘एक्सप्लोअर’ करता येतील. गरज आहे ती डोळे उघडे ठेवून पाहण्याची.’’ मिकीच्या या म्हणण्यावर सगळ्यांनीच दुजोरा दिला.

‘‘आणि तुम्हीसुद्धा आता आपापल्या कामाला लागा! मुलांनी काय शिकायचं ते प्रवचन दिलंत खरं, पण असा निषेध व्यक्त करून तुम्ही काय आदर्श देताय त्यांना? आपण केव्हाही आपलं काम चोखच केलं पाहिजे.’’ अंकल स्क्रुज रागावून म्हणाले. सगळ्यांना हे पटलं.

मग काही क्षणातच सगळे टी. व्ही. ‘रीसेट’ झाले. कार्टून चॅनेल्स पूर्ववत सुरू झाले आणि समस्त कार्टून कॅरॅक्टर्सनी निषेध म्हणून आणलेल्या व्यत्ययाबद्दल दिलगिरी व्यक्त करणारी ‘स्लाइड’ सर्व चॅनेल्सवर झळकली..

mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2018 12:13 am

Web Title: children story 3
Next Stories
1 फुलपाखरू फोटोफ्रेम
2 डोकॅलिटी
3 ‘होम’वर्क
Just Now!
X