घराघरांमध्ये अनेकदा घडणाऱ्या सुखसंवादांमध्ये ऐकू येणारा हा वाक्यांश. पुस्तक वाच म्हटल्यावर ‘वाचणारेय ना!’ शुद्धलेखन लिहीत जा, गृहपाठ वेळेत पूर्ण कर, पाठांतर कर, कामात मदत कर, खोली स्वच्छ कर, कपडे नीट ठेव.. एक ना अनेक क्रियांसाठी एकच पर्याय, ‘करणारेय ना!’ बरं, हे असतं भविष्यकाळातलं आश्वासन. त्याला वेळेची मर्यादा नाही. पुरं करणारच याची ग्वाही नाही. किंवा पाळायला हवंच याचं बंधन नाही. पण आश्वासन देणाऱ्याचं नाक मात्र वर असतं. काही वेळा त्याचे ‘नंतर करतो/ करते’ किंवा ‘उद्याच करणारेय’ वगैरे पर्याय असतातच. पण हे असं म्हणता म्हणता किती- तरी दिवस उलटतात. किंवा वेगळाच कोणीतरी ते करून टाकतो आणि आपण मात्र जैसे थेच! लगेच वाटलंच असेल ना, कोणीतरी केलं ना, मग झालं! पसारा आवरणं, कपडे घडी करणं यांचं ठीक आहे, पण गृहपाठ, अभ्यास, पाठांतर यांचं काय? ते इतरांनी कोणीतरी करून तुमचा काय बरं फायदा? ते तुम्हीच करायला पाहिजे. आणि जर केलं नाही

तर पूर्ण आयुष्यावर होणारे वाईट परिणाम तुम्हीच भोगायला पाहिजेत. वाईट परिणाम भोगणं कोणालाही आवडणार नाही, तसंच तुम्हालाही आवडणार नाही. त्यामुळे काय करायचं- तर आजपासून आपल्या मनातून हे दोन शब्दच हद्दपार करण्याचा प्रयत्न करायचा. मग ते हळूहळू जिभेवरूनही हद्दपार होतील तुमच्या. यांच्या जागी ‘आत्ता लगेचच करतो’ हे विचार रुजवायचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सवयही. हे वाचल्यावर काय म्हटलंत लगेच? करणारेय ना! असं नक्कीच

नाही म्हणणार तुम्ही. खात्री आहे मला. ‘आत्तापासूनच करतो’ असं म्हणताय ना?

joshimeghana231@yahoo.in