काही दिवसांपासून विराज आणि वेदांत दोघे एका कामात गढून गेले होते. त्यांच्या शाळेतल्या बाईंनीच त्यांना ते काम सांगितलं होतं. त्याला ‘प्रयोग’ असं म्हटल्यामुळे आपण काहीतरी वेगळं, खूप महत्त्वाचं करत आहोत असंच त्यांना वाटत होतं. बाईंनी दोघांनाही २-३ चमचे  धणे एका पसरट भांडय़ात माती घालून त्यात  पेरायला सांगितले होते आणि त्याचं निरीक्षण करायला सांगितलं होतं. दोघांनी घराभोवतालची माती आणून त्यात धणे टाकून पाणी शिंपडले होते. दोघांचाही आपापल्या घरी स्वतंत्र प्रयोग चालू होता. तरी जे काही घडणार आहे ते दोघांचं सारखंच असणार का वेगवेगळं होणार, या कुतूहलानं दोघंही स्वत:च्या  प्रयोगाबरोबरच दुसऱ्याच्या प्रयोगावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे शाळेतून आल्याबरोबर  पटापट जेवण उरकलं जात होतं. हातावर  पाणी पडताच विराजची स्वारी तिसऱ्या मजल्यावरच्या  वेदांतकडे जायची आणि दोघं मिळून पुन्हा विराजच्या गॅलरीत हजर व्हायचे. माना सगळ्या कोनातून फिरवत दोघेही मातीकडे निरखून बघत राहायचे. दोन-चारदा तरी वरती-खालती निरीक्षणासाठी जा-ये असायचीच. दोन-तीन दिवस झाले तरी काही दिसेना, तेव्हा आईकडे कुरकुर करूनही झाली.

पण नंतर हळूच कोथिंबिरीची  हिरवी पिटुकली पानं दिसली तेव्हा दोघेही खूश झाले. विजयी मुद्रेने सगळ्यांना ते कौतुक दाखवूनही झालं. एक-दोन दिवसांनी आणखीन हिरवंगार झाल्यावर शाळेतल्या बाईंना दाखवलं. बाईंनी एक रोप उपटून मातीतलं  मूळ आणि वरचं नाजूक खोड दाखवलं.

‘‘झाडाचं खोड जमिनीवर असतं, तर मूळ जमिनीच्या खाली असतं. झाडासाठी मूळ अन्न म्हणून जमिनीतील पाण्यातील मूलद्रव्यं पुरवतं, म्हणून झाड जगतं. मुळाचं कार्य  महत्त्वाचं असतं.’’ बाईंचा उद्देश सफल झाला.

‘‘म्हणजे मी कसा वेदांताकडे  वरच्या मजल्यावर जातो, पुन्हा खाली येतो, तसं मुळाला काहीच करता येत नाही. अरेरे! त्याला  कायम जमिनीतच राहावं लागतं.’’ विराजला याचं फार वाईट वाटलं.

कोथिंबिरीच्या नखभर मुळाच्या मनाला विराजचं बोलणं लागलं. त्याने लगेच ब्रह्मदेवाकडे तक्रार नोंदवली. ‘‘मी कायम जमिनीखालीच का राहायचं? मला कधीतरी वरती आणा नं? मला तळपणाऱ्या सूर्याकडून ‘सोनाबाथ’ घ्यायचाय. चंद्राचं शुभ्र चांदणं पांघरून घ्यायचंय. चांदण्याकडे टक लावून बघायचंय. निळ्या ढगांची पकडापकडी बघायचीय. पावसाच्या धारा हातात पकडायच्या आहेत. धुक्याच्या शालीत गुरफटून  घ्यायचंय. वाऱ्याशी  भांडायचंय. रंगीबेरंगी फुलांचे रंग टिपायचेत. त्यांचा सुवास भरभरून हुंगायचाय. हे सगळं न करता मी का सारखं मातीत तोंड खूपसून बसायचं? खोडाने मात्र ताठ मानेनं एकटय़ानं सारखं मिरवायचं!’’

ब्रह्मदेवाने त्या अजाण मूलाला हलकेच गोंजारलं. ‘‘अरे वेडय़ा, तू आहेस तिथेच चांगला आहेस. तू भक्कम आहेस म्हणून हे झाड जमिनीवर टिकून आहे. तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. तुझ्यावर झाडाचं जगणं अवलंबून आहे. तू मातीत  विरघळलेली मूलद्रव्ये झाडाच्या शेंडय़ापर्यंत पाठवतोस. पानांना अन्न तयार करायला कच्चा माल पुरवतोस. त्यामुळे झाडाची वाढ होते. पानं, फुलं, फळं यांनी ते बहरून येतं. तूच आपली जागा सोडलीस तर झाड उभंसुद्धा राहू शकणार नाही. वनस्पतीसृष्टीवरच सगळ्या माणसांचं, प्राण्यांचं जीवन अवलंबून आहे. तुझं स्थान इतकं महत्त्वाचं आहे, की तुला जागा सोडून चालणार नाही. तू आहेस तिथेच छान आहेस. वर आलास तर पस्तावशील.’’

ब्रह्मदेव मुळाची समजूत काढत असताना  कोणीतरी उसासे टाकत  समोर आले. वाळून चिपाड झालेल्या त्या मुळाची अवस्था बघून ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘अरे, तुला काय झालं असं वाळायला?’’

‘‘काय सांगू ब्रह्मदेवा, अलीकडे मातीत खाली जाण्याच्या वाटेत फार अडथळे येऊ लागले आहेत. अख्ख्या दुनियेचा कचरा जिथे टाकला जातो त्या जागेत नंदनवन फुलवण्यासाठी आमची तिथे लागवड केली गेली. झाडांना आधार देण्यासाठी आम्ही खोल खोल जाण्याचा मार्ग शोधू लागलो, पण आम्हाला जाताच येईना. कितीही जोर लावला तरी पुढचा मार्ग सापडेना. मग लक्षात आलं की, हा सगळा प्लॅस्टिकच्या पिशव्या, पॉलीएस्टरच्या साडय़ांचा प्रताप. आमच्याभोवती ते धागे गुंडाळले गेल्यामुळे आमची नाकाबंदीच झाली. जमिनीला समांतर, आडवं पसरून  झाडाला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; पण व्यर्थ! झाड कलू लागलं. आम्ही जमिनीच्या पोटातून बाहेर उघडे पडलो. उन्हातान्हाची आम्हाला सवय नव्हती. होरपळून जाऊ लागलो. आमच्यातला ओलावा, जीवनरसच आटून गेला, झाडाला तो पुरवणं दूरच राहिलं. थंडी-वाऱ्याने शुष्क झालो. पावसाळा यायच्या आधीच झाड कोसळलं. जमिनीच्या वर आमचे हाल हाल झाले. झाडाला वाचवू शकलो नाही म्हणून खंतावलो आहे.’’

आपल्या मोठय़ा भावंडांची कैफियत ऐकून जमिनीच्या वर येण्याचा हट्ट करणारे मूळ धास्तावले होते.

तेवढय़ात ब्रह्मदेवाने फटकारले, ‘‘ ऐकलीस ना याची कथा? माणसाच्या प्लॅस्टिक  वापरण्याच्या हट्टापायी थोडे दिवसच मातीतून ते वर आले तरी त्याची काय दुर्दशा झाली. तुला तर वरच यायचे आहे, मग तुझा कसा टिकाव लागणार सांग बघू? त्याऐवजी निसर्गाने जे काम सोपवलंय ते आनंदाने कर. आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद घे. ही माणसं कधी शहाणी होणार कोणास ठाऊक!’’

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा!’ हे सत्य स्विकारून मुळाने गुपचूप मातीत खोल खोल वाट शोधली.