मृणालिनी तुळपुळे

mrinaltul@hotmail.com

एकदा मिनू नावाची हरिणी आपल्या लहानग्या पाडसाला- चिंकूला घेऊन जंगलातील तळ्याकाठी पाणी प्यायला आली होती. तळ्याभोवती खूप झाडे होती. त्या झाडांवर माकडं, सरडे, खारोटय़ा असे प्राणी व वेगवेगळे पक्षी राहत. त्यातल्याच एका झाडावर खारोटी बसली होती. सकाळपासून तिला खेळायला कोणीच भेटले नव्हते, त्यामुळे ती अगदी कंटाळून गेली होती. चिंकूला बघितल्यावर ती झाडावरून सरसर खाली आली आणि त्याच्याशी बोलायला गेली.

थोडय़ा गप्पा मारल्यावर खारोटीने चिंकूला विचारले, ‘‘आपण दोघे पकडापकडी खेळूया का?’’ चिंकूही लगेच ‘हो’ म्हणाला.

त्याला वाटले, या एवढय़ाशा खारोटीला आपण सहज पकडू. तो म्हणाला, ‘‘पहिल्यांदा तू पळ, मी तुला पकडतो.’’

खारोटीला ते मान्य झाले. ती चिंकूपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘पकड आता मला.’’ खारोटी पुढे आणि चिंकू तिला पकडायला तिच्या मागे असे पळू लागले. चिंकूला वाटले त्याच्यापेक्षा खारोटी खूपच जोरात पळत होती. बराच वेळ इकडून तिकडे पळाल्यानंतर चिंकूने एकदाचे खारोटीला पकडले.

पकडापकडी खेळताना ते दोघे तळ्यापासून खूपच लांब आले होती. पळून पळून दोघे खूप दमले होते. त्यांना पाणी प्यायचे होते; पण जवळपास पाणी दिसले नाही. तळ्यावर पुन्हा जाऊ या म्हटलं तर तळेदेखील खूपच दूर राहिले होते. चिंकूला आपली आईही कुठे दिसेना. तो घाबरून आईला हाका मारू लागला. आई दिसली नाही त्यामुळे चिंकू रडायला लागला व रडत रडत खारोटीला म्हणाला, ‘‘मला आईकडे जायचंय. मी तिला न सांगताच तुझ्याबरोबर पकडापकडी खेळायला लागलो.’’ चिंकूला रडताना बघून खारोटीलाही काय करावे ते सुचेना.

ती चिंकूला म्हणाली, ‘‘तू इथे बस. मी झाडावर जाऊन तुझी आई कुठे दिसतेय का ते बघते.’’ ती सरसर शेजारच्या झाडावर चढली आणि चिंकूची आई कुठे दिसते का ते बघायला लागली. तिला दूरवर तळे दिसले, पण तळ्याकाठी चिंकूची आई काही दिसली नाही. त्या झाडावर एक माकड बसलं होतं. त्याने खारोटीला ‘काय झालं?’ असं विचारले. खारोटीने माकडाला रडणारा चिंकू दाखवला आणि म्हणाली, ‘‘मी त्याच्या आईला शोधत होते.’’

माकड म्हणाले, ‘‘एवढेच ना? मग मी आणखी वर चढतो आणि बघतो.’’ उडय़ा मारत माकड झाडाच्या आणखी वर गेले आणि इकडेतिकडे बघू लागले. दूरवर त्याला एका कुरणाच्या बाजूला चिंकूची आई दिसली. ती चिंकूला शोधत होती. माकडाने आनंदाने एक चीत्कार केला आणि मोठी उडी मारून ते खाली आले. त्याने खारोटीला आपल्या पाठीवर बसायला सांगितले आणि चिंकूला म्हणाले, ‘‘चल, माझ्याबरोबर. मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो.’’

बराच वेळ चालल्यानंतर ते तिघे एका कुरणाशी आले. लांबवर त्यांना मिनू हरिणी दिसली. आईला बघितल्यावर चिंकू इतका खूश झाला की तो तिच्याकडे धावत सुटला. मिनूने चिंकूला जवळ घेतले. चिंकूदेखील तिला बिलगला. एवढय़ात माकड आणि खारोटी तिथे पोहोचले. चिंकूने आईला पकडापकडी खेळताना तो कसा हरवला व माकडाने तिला कसे शोधले ते सांगितले.

मिनूने माकडाचे व खारोटीचे खूप खूप आभार मानले आणि त्या दोघांना आग्रहाने आपल्या घरी घेऊन गेली. त्यांच्या घराशेजारी एक सफरचंदाचे झाड होते. मिनूने माकडाला ते झाड दाखवले आणि म्हणाली, ‘‘तुम्ही दोघे या झाडावरती चढा आणि तुम्हाला हवी तेवढी सफरचंदे खा.’’ पडत्या फळाची आज्ञा मानून दोघे झाडावर चढले आणि त्यांनी मिनू आणि चिंकूसाठी चार-पाच सफरचंदे तोडून खाली टाकली. सर्वानी सफरचंदावर यथेच्छ ताव मारला आणि शेजारच्या झऱ्यातले पाणी प्यायले.

चिंकूला शोधून दिल्याबद्दल मिनूने परत एकदा त्या दोघांचे आभार मानले. तेव्हापासून माकड खारोटीला आपल्या पाठीवर बसवून मधूनमधून चिंकूच्या घरी यायचे. ते तिघे मिळून झऱ्यातले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवायचे, झाडावरची सफरचंदे खायचे आणि खूप खेळायचे.

आता माकड, खारोटी आणि चिंकू यांची अगदी घट्ट मत्री झाली होती.