नाताळचा सण आला की मुले सांताक्लॉजची आणि तो घेऊन येणाऱ्या भेटवस्तूंची वाट बघत असतात. लालचुटुक कपडे आणि पांढऱ्या गोंडय़ाची लाल टोपी घातलेला हा सांताक्लॉज म्हणजे लहान मुलांच्या भावविश्वातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा! सांताक्लॉज कुठे राहतो आणि नाताळच्या वेळी तो कुठून येतो, याबद्दल मुलांना खूपच उत्सुकता असते. म्हणूनच फिनलंडमध्ये १९८५ मध्ये आíक्टक सर्कलजवळ सांताक्लॉजचे गाव बनवण्यात आलं.

फिनलंडमध्ये याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, सांताक्लॉजचं घर कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. ते गुपित तसंच ठेवण्यासाठी सांताक्लॉज व्हिलेज वसवलं व त्यात त्याचं ऑफिस बनवलं. त्यामुळे सांताच्या मूळ घराचं गुपित तसंच राहून तो आता जगभरातील लोकांना आपल्या ऑफिसमध्ये भेटू शकतो.

इतर गावांप्रमाणेच या गावात दुकानं, खाण्याच्या जागा आणि हॉटेल्स आहेत. पण इथलं वेगळेपण म्हणजे तिथं बनवलेली बर्फाची घरं आणि इग्लू हॉटेल्स. या गावाचं आणखी एक विशेष म्हणजे या गावातून आíक्टक सर्कल जातं व ती काल्पनिक रेषा रंगानं रंगवली आहे. आपण ती रेषा पार करून आíक्टक प्रदेशात प्रवेश करू शकतो. या रेषेच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे फोटो काढण्याची एक लोकप्रिय जागा आहे.

या गावातील सर्वात आवडत्या दोन जागा म्हणजे सांताक्लॉजचं ऑफिस व पोस्ट ऑफिस. गावातल्या मुख्य इमारतीमध्ये सांताचं ऑफिस आहे व तो दिवसातले ठरावीक तास तिथे बसलेला असतो. तिथे जाऊन आपण त्याचं ऑफिस बघू शकतो, त्याच्याशी गप्पा मारू शकतो, तसंच त्याच्याबरोबर फोटो काढून घेऊ शकतो.

गावातील पोस्ट ऑफिसमध्ये ख्रिसमस कार्ड्स, सांताच्या सीडीज्, सोव्हिनियर्स व भेट देण्याजोग्या अनेक वस्तू मिळतात. त्या विकत घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवू शकता. या पोस्टात आलेल्या व तिथून पाठवलेल्या सगळ्या पत्रांवर खास सांताचा पोस्टमार्क/ शिक्का मारला जातो. तसा शिक्का जगात इतर कुठेही मारला जात नाही. खुद्द सांताच्या गावाहून आलेलं आणि सांताचा पोस्टमार्क असलेलं पत्र किंवा पार्सल हे नक्कीच खास असणार यात काही शंकाच नाही. तुम्ही तुमच्या देशातून सांताला या पोस्ट ऑफिसच्या पत्त्यावर पत्र पाठवू शकता व सांता त्या पत्राला उत्तरदेखील पाठवतो. आजपर्यंत त्याला दोनशे देशांतून सुमारे सतरा दशलक्ष पत्रे आली आहेत.

या गावाचं आणखी एक विशेष म्हणजे तिथे आपल्याला फारशी  ऐकिवात नसलेली एक व्यक्ती ‘मिसेस क्लॉज’- तथाकथित सांताक्लॉजची पत्नी भेटते व तिनं बनवलेल्या कुकीज आणि जिंजर ब्रेड आपण खाऊ शकतो. मिसेस क्लॉजप्रमाणेच सांताक्लॉजच्या आवडत्या रुडाल्फला- म्हणजे लाल नाकाच्या रेनडियरलादेखील या गावात भेटता येतं. नाताळच्या वेळी हे गाव रंगीत दिव्यांनी उजळून गेलेलं असतं. ते बघण्यासाठी व गावातून फेरफटका मारण्यासाठी तिथे रेनडियरने ओढणाऱ्या व बर्फावरून घसरणाऱ्या गाडय़ा उपलब्ध असतात.

असं हे सांताक्लॉज व्हिलेज लहान मुलांना तर आवडतेच; पण मोठय़ा माणसांनादेखील भुरळ पाडते. त्यामुळेच दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन लाख लोक या गावाला भेट देतात.